कोल्हापूर :’उत्तर’साठी ‘मातोश्री’वरून हलली सूत्रं..!

तीन वर्षांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघात लक्षवेधी मते घेऊन जिल्ह्याच्या राजकारणाचे लक्ष वेधून घेतलेल्या अस्लम सय्यद यांनी ‘उत्तर’च्या रणांगणातून घेतलेली माघार (sources) चर्चेचा विषय ठरली. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर मुंबईत भेटीचे दिलेले निमंत्रण आणि त्यानंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सय्यद यांनी माघार घेतली.
२०१९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत हातकणंगले मतदारसंघातून सय्यद वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार होते. त्यांना या निवडणुकीत दीड लाखाच्या आसपास मते मिळाली. सय्यद शहरात राहतात पण त्यांना या मतदारसंघाची ओळख नसतानाही मिळालेली मते धक्कादायक होती. दुसरीकडे या मतदारसंघाचे तत्कालीन खासदार राजू शेट्टी सुमारे ९० हजार मतांनी पराभूत झाले. सय्यद यांची उमेदवारी या मतदारसंघात शिवसेनेच्या पथ्यावर पडल्याचे तर शेट्टी यांच्यादृष्टीने धोकादायक ठरल्याची चर्चा त्यावेळी झाली.
या पार्श्वभूमीवर सय्यद यांनी उत्तरच्या पोटनिवडणुकीत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. लोकसभेत लक्षवेधी मते घेतल्याने त्यांना थांबवण्यासाठी दोन दिवसांपासून शिवसेनेची यंत्रणा कामाला लागली होती. त्यात काल मंत्री शिंदे यांच्याशी त्यांचा संपर्क झाला, त्यांनी सय्यद यांना मुंबईत येण्याचे आवाहन केले. मुंबईत सय्यद यांनी शिंदे यांच्या मध्यस्थीने थेट (sources) मुख्यमंत्री ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आज कोल्हापुरात येऊन उमेदवारी अर्ज मागे घेतला. भविष्यात कोणत्या तरी पदावर संधी देण्याचे आश्वासन त्यांना ठाकरे यांनी दिल्याचे समजते. पण या निवडणुकीतील आपली भूमिका त्यांनी अद्याप जाहीर केलेली नाही.
मतविभागणी टाळण्यासाठी
लोकसभेचा मतदारसंघ नवखा, त्यात प्रचाराला कमी कालावधी तरीही सय्यद यांनी ७२२ गावांपैकी १०० गावांत प्रचार करून त्यांनी राज्याचे लक्ष वेधून घेणारी मते घेतली. निवडणुकीत ते स्थानिक रहिवाशी असल्याने व त्यांना मानणारा वर्गही मोठा असल्याने मतांची विभागणी होऊन धोका होण्याची शक्यता होती.
उत्तरसाठी १५ जण निवडणूक रिंगणात
विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी आज दोन इच्छुकांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे १५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उत्तरची निवडणूक बहुरंगी होत असली तरीही खरी लढत महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव व भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांच्यातच होणार आहे. आता लक्ष मतदान व मतमोजणीकडे लागले आहे. १२ एप्रिलला मतदान व १६ एप्रिलला मतमोजणी होणार आहे.
उत्तर मतदारसंघासाठी अर्ज छाननीनंतर १७ उमेदवार निवडणुकीसाठी पात्र ठरले होते. दरम्यान, आज अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी संतोष बिसुरे व अस्लम सय्यद या अपक्ष उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने पंधरा उमेदवार निवडणूक रिंगणात शिल्लक राहिले. दरम्यान, अर्ज माघारीनंतर चिन्ह वाटपही केले. मान्यता प्राप्त राष्ट्रीय व राजकीय पक्षाच्या उमेदवारांना त्या-त्या पक्षाचे चिन्ह वाटप केले आहे. नोंदणीकृत राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार ज्यामध्ये मान्यताप्राप्त राष्ट्रीय आणि राज्य राजकीय पक्षा व्यतिरिक्त असणाऱ्या उमेदवारांनाही त्यांच्या पसंतीने चिन्ह वाटप झाले. यामध्ये कॉंग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव ‘हात’ तर भाजपचे सत्यजित कदम ‘कमळ’ या चिन्हावर निवडणूक लढवतील. यशवंत शेळके (कपबशी), विजय केसरकर (ॲटो रिक्षा), शाहीद शेख (गॅस सिलिंडर), सुभाष देसाई (रोड रोलर), बाजीराव नाईक (एअर कंडिशनर), भारत भोसले (कपाट), मनीषा कारंडे (दुरदर्शन संच), अरविंद माने (कॅरम बोर्ड), अजीज मुस्ताक (हेलिकॉप्टर), करुणा मुंडे (शिवणयंत्र), राजेश कांबळे (शिट्टी) व संजय मागाडे (सफरचंद) या पद्धतीने चिन्ह वाटप केले आहे.(sources)
आचारसंहितेचे पालन करा
उत्तर मतदार संघामध्ये आचारसंहित पाळली जावी यासाठी सर्व यंत्रणा तैनात केली आहे. यामध्ये नागरिकांनी आणि स्वत: उमेदवार व पक्षांनीही आचार संहितेचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. जे लोक आचारसंहितेचा भंग करतील त्यांच्या तातडीने कारवाई करावी, अशा सूचना निवडणूक निरीक्षक राजू नारायण स्वामी यांनी आज दिल्या.
हेही वाचा :