कोल्हापूर : भीषण अपघातात दोन तरुण जागीच ठार!
रत्नागिरी रस्त्यावरील बजागेवाडी फाटा येथे भरधाव दुचाकी (two wheeler accident) घसरून दोन तरुण जागीच ठार झाले. ऋतुराज सुनील कुंभार (वय २७, रा. बोरपाडळे , ता. पन्हाळा) आणि युवराज पांडुरंग कुंभार (वय ३६, रा. ओकोली, ता. शाहूवाडी ) अशी त्यांची नावे आहेत. आज (रविवार) दुपारी ही भीषण दुर्घटना घडली. घटनास्थळी नातेवाईकांची मोठी गर्दी झाली होती. ऐनउमेदीत आलेल्या दोन्ही तरुणांचा अपघातात मृत्यू झाल्याने गावात शोककळा पसरली आहे.
नात्यातील दोन तरुणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात हंबरडा फोडला. दोन्ही गावातील ग्रामस्थांसह नातेवाईकांनी रुग्णालयात गर्दी केली होती. उत्तरीय तपासणीनंतर नातेवाईकांनी मृतदेहाचा ताबा घेतला. ऋतुराज हा विद्युत वितरण कंपनीमध्ये वायरमन म्हणून कामाला होता. तर युवराज शेती करत होता.(two wheeler accident)
युवराज कुंभार हा बोरपाडळे येथील नातेवाईक ऋतुराजच्या घरी आला होता. आज दुपारी दोघेही जेवण करून दुचाकीवरून शाहूवाडीकडे निघाले होते. बोरपाडळे शाहूवाडी दरम्यानच्या रस्त्यावर बजागेवाडी फाटा येथे रस्त्यावर पडलेल्या नारळामुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि दोघेही रस्त्यावर जोरात आदळले. सुमारे पंचवीस ते तीस फूट दोघंही फरपटत गेल्याने डोक्याला गंभीर इजा झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
हेही वाचा :