बंडखोर नेत्यांचा राजमार्ग खडतरच, शिंदेंच्या निर्णयावर राजकीय भवितव्य!

जिल्ह्यातील यापूर्वीच्या बंडखोरांचा अनुभव लक्षात घेता मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील बंडखोरांचा भविष्यातील राजकीय मार्ग खडतरच राहणार आहे. बंडखोरांना शिवसैनिकांसह सामान्य मतदारांचीही नाराजी भोवण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे पुढचा निर्णय काय घेतात यावर या बंडखोरांचे भवितव्य अवलंबून आहे.(maharashtra politics news)

राज्यातील शिवसेनेत मोठ्या प्रमाणात बंडखोरी पुढे आल्यानंतर सुरुवातीला आमदार प्रकाश आबिटकर यांनी बंडखोर गटासोबत जाणे पसंत केले. (maharashtra politics news) त्यांच्यानंतर दुसऱ्याच दिवशी सेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही बंडखोर गटाची वाट धरली. या दोघांची चर्चा सुरू असतानाच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दैवत तर शिंदे यांना गुरू मानणारे राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनीही गुवाहाटी गाठली.

यापूर्वी सेनेचे माजी आमदार बाबासाहेब पाटील-सरूडकर, (कै.) दिलीप देसाई यांनी बंडखोरी केली; पण त्यानंतरच्या निवडणुकीत हे दोघेही पराभूत झाले. पण पुढच्या निवडणुकीत सरूडकर यांचे पुत्र सत्यजित विजयी झाले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली पण दक्षिणमधून सलग २५ वर्षे आमदार राहिलेले राष्ट्रवादीचे नेते (कै.) दिग्विजय खानविलकर यांनी तत्कालीन काँग्रेसचे उमेदवार पालकमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात शड्डू ठोकला; पण त्यांचाही मोठ्या फरकाने पराभव झाला.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या तिकिटावर दोनवेळा शहरातून आमदार झालेले सुरेश साळोखे यांनी कोल्हापूर उत्तरमधून ‘मनसे’च्या तिकिटावर रिंगणात उडी घेतली; पण त्यांना अवघी १२८० मते मिळाली. जिल्ह्याचा हा पूर्वेतिहास पाहता आता शिवसेना सोडून बंडखोरी केलेल्यांना २०२४ च्या निवडणुकीत विजय मिळवताना दमछाक करावी लागणार आहे.

मुळात आता शिवसेनेसोबत असलेले यड्रावकर मूळचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, त्यातही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्‍वासू. पर्याय नाही म्हणून ते अपक्ष लढले आणि विजयी झाल्यानंतर सेनेच्या कोट्यातून मंत्री झाले. त्याच पद्धतीने आबिटकर हेही सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, खासदार प्रा. संजय मंडलिक हे काँग्रेससोबत गेल्यानंतर तेही काही काळ काँग्रेसमध्ये राहिले.

मतदारसंघात पर्याय नाही म्हणून प्रा. मंडलिक यांनी शिवसेनेते प्रवेश केल्यानंतर तेही शिवसैनिक झाले आणि दोनवेळा आमदार झाले. क्षीरसागर हेही सेनेत पूर्वीपासून कार्यरत असलेल्या नेत्यांना ‘ओव्हरटेक’ करून आंदोलनाच्या माध्यमातून पुढे आले, त्याच जोरावर त्यांनी विधानसभेची उमेदवारी मिळवली आणि दोनवेळा आमदारकी जिंकली.

(कै.) मंडलिक यांचा अपवाद

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने उमेदवारी नाकारल्यानंतर (कै.) सदाशिवराव मंडलिक यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. त्यात विजयी झाले, त्यांच्या विजयामागे अनेक कारणे होती; पण बंडखोरीनंतर विजयी ठरलेल्यांत (कै.) मंडलिक यांचा अपवाद आहे.

सरूडकरांची अडचण

शाहूवाडी मतदारसंघात सेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांचे पारंपरिक विरोधक आमदार डॉ. विनय कोरे सध्‍या भाजपसोबत आहेत. त्यामुळे आता सेनेशी बंडखोरी करून दुसरीकडे जायचे म्हटले तर दुसऱ्या बाजूला डॉ. कोरे विरोधकांसोबत आहेत, ही श्री. सरूडकर यांच्यासमोरची अडचण आहे. करवीरमध्ये भाजपची ताकदच मर्यादित असल्याने पुढची निवडणूक डोळ्यांपुढे ठेवून या मतदारसंघाचे सेनेचे माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी या वादात न पडता शांत राहणे पसंत केले आहे. अशीच काहीशी अवस्था सेनेचे शिरोळ व हातकणंगलेचे माजी आमदार उल्हास पाटील व डॉ. सुजित मिणचेकर यांची आहे.

हेही वाचा :


१२ वर्ष मोठी, पदरी मुल तरीही अर्जुन कपूरचा मलायकासाठी का तुटतो जीव?

Leave a Reply

Your email address will not be published.