नवरात्रोत्सवात पेड ई पासला दिवाणी न्यायालयाची तात्पुरती स्थगिती;

Paid E-pass

सोमवारी होणार पुढील सुनावणी

कोल्हापूर: दि.२३(बी.टी.एन.प्रतिनिधी) करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात यंदा प.महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने व्हीआयपी दर्शनांतर्गत घेतलेल्या पेड ई पासला (Paid E-pass) आज येथील दिवाणी न्यायालयाकडुन तात्पुरती स्थगिती मिळाली.जिल्हा प्रशासनाने यावर भूमिका स्पष्ट करण्यास वेळ मागितल्याने,याची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.याचा निकाल येईपर्यंत असे पास देण्यास दिवाणी न्यायालयाने मनाई केली आहे.

श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी या निर्णया विरोधात हि याचिका दाखल केली आहे.यामध्ये जिल्हा पोलिस अधीक्षक,प.महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती,तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या विरोधात कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीर निवासिनी श्रीअंबाबाई मंदिरात दररोज देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. शारदीय नवरात्रौत्सवात दरवर्षी व्हीआयपी दर्शन रांगेवरून वादविवाद होण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे यंदा प.महाराष्ट्र देवस्थान समितीकडून श्रीअंबाबाई मंदिरात प्रति पास दोनशे रूपये प्रमाणे दिवसाला एक हजार पेड ई पास (Paid E-pass) देण्याचा निर्णय घेण्यात आला.याला विविध हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध करण्यात आला.श्रीपूजक गजानन मुनीश्वर यांनी दिवाणी न्यायालयात आव्हान दिले.

श्रीअंबाबाई मंदिरात महाराष्ट्र सरकारने देवीच्या दर्शनासाठी कोणत्याही देवस्थानने भाविकांसाठी नियमित रांगेव्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने दर्शन घेण्यास परवानगी घेण्यात येऊ नये.तशी कोणतीही स्वतंत्र व्यवस्था करण्यात येऊ नये. कोणत्याही मार्गाने रक्कम आकारून दर्शनास प्रवेश देऊ नये.पासेस,प्रवेशपत्रिका वितरित करू नये.अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना सन २०१० मध्ये जाहीर व मंजूर करून,या मार्गदर्शक सूचनां -व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने कोणालाही दर्शन देऊ नये म्हणून शासनाने मनाई केली आहे. याबाबतचे पत्र देऊनही त्याचा विचार झाला नसल्याचे मुनीश्वर यांच्याकडून निदर्शनास आणून देण्यात आले.

* तर दररोजचे दोन लाख उत्पन्न बुडणार ?

नवरात्रोत्सवात श्रीअंबाबाई मंदिरात दररोज एक हजार भाविकांसाठी प्रति पास दोनशे रुपये प्रमाणे पेड-ई पासद्वारे दर्शन देण्याची व्यवस्था प. महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून करण्यात आली आहे.त्यानुसार दररोज किमान दोन लाख रुपयांची रक्कम या पासद्वारे जमा होणार आहे.पण आता या पेड इ पास विरोधातच न्यायालयात धाव घेण्यात आली आहे.आज न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली असली तरी आता येत्या सोमवारी होणाऱ्या न्यायालयाच्या निकालावर पेंड ई पासद्वारे मिळणारे उत्पन्न बुडणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

Smart News:-