आर या पार… राज्य सरकारबाबत राजू शेट्टींचा आज फैसला!

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेत शेतकऱ्यांच्या (frp) प्रश्नांना न्याय मिळत नसल्याची खदखद कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर शिरोळ येथे आज झालेल्या बैठकीत सत्तेबाहेर राहून शेतकऱ्यांना न्याय देण्याची तीव्र भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडीकडून होणाऱ्या अन्यायाचा पाढा वाचला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी रविवारीच शेट्टी यांची नाराजी दूर करू, अशी ग्वाही दिली होती. तरीही ‘स्वाभिमानी’ने सत्ता सोडण्याची मानसिकता दर्शविली आहे. कोल्हापुरात मंगळवारी (ता. ५) होणाऱ्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत श्री. शेट्टी यासंदर्भातील निर्णय जाहीर करणार आहेत.
शेतीला दिवसा वीजपुरवठा, पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईबाबत सरकारने केलेले घूमजाव आणि ऊस एफआरपी (frp) दोन टप्प्यांत अशा काही मुद्द्यांवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसताना सत्तेत राहूनदेखील सरकार ‘स्वाभिमानी’च्या मागण्यांचा विचार करत नसल्याची सल स्वाभिमानीला सतावत आहे. त्यामुळे संघटनेत गेल्या काही दिवसांपासून सत्तेतून बाहेर पडण्याबाबत खलबते सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी कोल्हापुरात संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होत आहे. या बैठकीपूर्वी श्री. शेट्टी यांनी आज आपल्या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांच्या भावना समजून घेतल्या.
यावेळी पदाधिकाऱ्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. सत्तेत गेल्याशिवाय शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नसल्याच्या भावनेतून स्वाभिमानी महाविकास आघाडीचा घटक पक्ष बनला; पण सरकारने स्वाभिमानीच्या कोणत्याही मागणीकडे गांभीर्याने पाहिले नाही की त्या सोडविण्यासाठी प्रयत्न केला नाही, अशा तीव्र भावना मांडण्यात आली. महाविकास आघाडीने शेतकऱ्यांच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. सरकारने शेतकऱ्यांचा पूर्णपणे भ्रमनिरास केला आहे. त्यामुळे सत्तेत राहणे शक्य नाही, असेही सांगण्यात आले. यापुढे शासनाला सळो की पळो करून सोडून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देऊया, अशा भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. या बैठकीला माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, संदीप जगताप यांच्यासह राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
पदाधिकाऱ्यांचे मुद्दे
दुर्लक्षित राहत असेल तर सत्ता काय कामाची?
ज्या शेतकऱ्यांनी आपल्यावर विश्वास ठेवला, त्यांच्या विश्वासाचे काय?
संघटना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी; सत्तेसाठी नाही
सत्तेत राहून घुसमट करून घेण्यापेक्षा रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू
भाजपची संगत नकोच!
दरम्यान, बैठकीत महाविकास आघाडीतून बाहेर पडत असताना स्वाभिमानी भाजपकडे जाणार का, अशी चर्चा सुरू आहे; पण भाजपशी संगत नको, अशा भावनाही पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. काहींनी त्या त्या वेळी निर्णय घेण्याचे सूचित केले.
हेही वाचा :