कोल्हापूरला खंडपीठ होणे गरजेचे राऊत यांचे वक्तव्य

कोल्हापूरला खंडपीठ होणे गरजेचे राऊत यांचे वक्तव्य

कोल्हापूर: कोल्हापूर, सांगलीसह सहा जिल्ह्यांतील प्रलंबित खटले मार्गी लागण्यासाठी आणि सर्वसामान्य जनतेला न्याय मिळण्यासाठी कोल्हापूर येथे खंडपीठ(Bench) होणे ही काळाजी गरज आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करून आपण शासन व न्याय यंत्रणेकडे निश्चित पाठपुरावा करू, त्यामुळे हा तिढा लवकरच सुटेल. संजय पवारही या लढ्याला बळ देतील, असे खासदार संजय राऊत यांनी खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासित केले. ते कोल्हापुरात आल्यानंतर कृती समितीने भेटून निवेदन देऊन चर्चा केली. कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष तथा कृती समितीचे निमंत्रक अॅड. गिरीश खडके, ज्येष्ठ विधिज्ञ महादेवराव आडगुळे व इतर पदाधिकाऱ्यांनी शनिवारी सकाळी सयाजी हॉटेल येथे खासदार राऊत यांची भेट घेऊन पस्तीस वर्षांपासून सुरू असलेला खंडपीठाचा लढा व त्याची पार्श्वभूमी विशद केली.

राऊत म्हणाले, कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर या मध्यवर्ती जिल्ह्यात खंडपीठाची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. यासाठी वकीलांनी केलेल्या आंदोलनाची मला माहिती आहे. लवकरात लवकर हा प्रश्न सुटल्यानंतर सहाही जिल्ह्यांतील पक्षकारांना न्याय मिळणार आहे. लोकभावनांचा विचार करून मी निश्चितच त्यासाठी प्रयत्न करतो.

संजय पवार यांच्या रूपाने शिवसेनेचा कोल्हापुरात खासदार देत आहोत. त्यांचा खंडपीठाच्या(Bench) आंदोलनात पूर्वीपासून सहभाग आहे. खासदार झाल्यानंतर या लढ्याला ते बळ देतील. खासदार राऊत यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, या लढ्यासाठी आजपर्यंत अनेक आंदोलने, मोर्चे झाले. सहा जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले, तरीही अद्याप प्रश्न प्रलंबित आहे. मुख्यमंत्री व उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांची चर्चाही झाली आहे. सहा जिल्हे व मुंबई हे अंतर, तेथील राहणीमान याचा विचार उच्च न्यायालयाने करावा. प्रलंबित खटले व न्यायासाठी वंचित असलेल्या पक्षकारांचा विचार होणे गरजेचे आहे.

या बैठकीला माजी अध्यक्ष अॅड प्रशांत चिटणीस, प्रकाश मोरे, अजित मोहिते, व्ही. आर. पाटील, शिवाजीराव राणे, अफजल पिरजादे, बाळासाहेब शेळके, सुशांत चेंडके, प्रमोद दाभाडे, इंद्रजित चव्हाण, राजेंद्र किंकर, महांतेश कोल्हे, प्रतिक कब्बूर, अजित मोरबाळे आदी हजर होते.

 

Smart News:-

‘क्‍वाड’ बैठकीतून काय साधले?


निखतच्या जिद्दीची कहाणी


सतत थकल्यासारखं वाटतं? १५ दिवसात रक्ताची कमतरता दूर करतील रोजच्या जेवणातले ४ ‘फूड कॉम्बिनेशन्स’


उत्तर प्रदेशात महिलांना रात्री डय़ुटी करता येणार नाही


बाजारात बनावट नोटांचा सुळसुळाट; सर्वाधिक बनावट नोटा ५०० रुपयांच्या,


 

Leave a Reply

Your email address will not be published.