लग्नाच्या सोनेरी क्षणासाठी चक्क चांदीची पत्रिका, कोल्हापूरच्या पठ्ठ्याची कमाल

सध्या सर्वत्र लग्नाची धामधूम पाहायला मिळत आहे. लग्न म्हटलं की, सर्वच गोष्टींची तयारी करावी लागते. जेवणापासून ते अगदी नवरा नवरीचा पोशाख, डेकोरेशन अशा सर्वच गोष्टी हटके करण्याचा अनेक जण प्रयत्न करतात. यात वेगवेगळ्या (design) डिझाईन असलेल्या आकर्षक लग्नपत्रिका छापण्याचा सध्या ट्रेन्ड सुरु आहे. अशात कोल्हापुरातील एका सराफ व्यवसायिकाने चक्क चांदीची लग्नपत्रिका बनवली आहे.

चांदीच्या या लग्नपत्रिकेची संपूर्ण राज्यभर चर्चा रंगली आहे. संदीप सांगावकर असे चांदीची  लग्नपत्रिका बनवलेल्या सराफाचे नाव आहे. कोल्हापूरमधील  गुजरी येथे त्यांचे सांगावकर सराफचे दुकान आहे. हे तेच सांगावकर आहेत ज्यांनी कोरोनामध्ये चांदीचा मास्क बनवून सर्वांनी अचंबित केलं होतं. त्यांनी आता ही संकल्पना लग्नपत्रिकेसाठी देखील वापरली आहे.

सांगावकर यांनी या पत्रिकेविषयी सांगितले आहे की, अनेक व्यक्ती विविध प्रकारच्या महागड्या पत्रिका छापत असतात. यात अगदी मुलाचं बारसं, गृह प्रवेश समारंभ, लग्न अशा विविध कामांसाठी महागड्या पत्रिका बनवून घेतात. कागदासाठी जास्तीचे पैसे खर्च करून ती पत्रिका नंतर कशासाठी वापरता येत नाही. त्यामुळे मी ही चांदीची पत्रिका तयार केली. ही पत्रिका प्रत्येकासाठी पुढे उपयोगी ठरू शकते. अशात सांगावकरांनी पत्रिकेच्या तीन (design) डिझाईन बाजारात विक्रीसाठी काढल्या आहेत.

या पत्रिकेचा वापर सर्व व्यक्तींना देण्यासाठीच करावा असे नाही. तुम्ही अशी एखादी पत्रिका तुमच्या चिरकाळ आठवणीत राहावी म्हणून देखील बनवू शकता. अनेक व्यक्ती कुलदैवताला लग्नपत्रिका देताना त्याबरोबर काही महागड्या वस्तू किंवा सोन, चांदी देखील दान करतात. अशा वेळी देखील ही पत्रिका उपयुक्त ठरू शकते.

या पत्रिकेचं वजन ६० ते ८० ग्रॅम इतकं आहे. तसेच ७ बाय १० इंच असा तिचा आकार आहे. ही पत्रिका खरेदी करण्यासाठी तुम्हाला साधारणत: ४ ते ५ हजार रुपये मोजावे लागतील. गुजरी रोड, सी वॉर्ड, कोल्हापूर येथे सांगावकरांचे दुकान आहे. या दुकानात ही पत्रिका तुम्हाला खरेदी करता येईल.

हेही वाचा: