जयसिंगपूर : अन्यथा, पूरग्रस्तांचा एल्गार महागात पडेल!

महापुराचे समूळ उच्चाटन झाल्याशिवाय शिरोळ तालुक्याला पुन्हा समृद्धता लाभणार नाही. दरवर्षी पावसाळा आला की महापुराची धडकी नदीकाठच्या लोकांना भरते. त्यामुळे शासनाने आता पूरग्रस्त गावांचा अंत न पाहता तातडीने उपाययोजना (measures) राबवाव्यात. अन्यथा येणाऱ्या काळात पूरबाधित ग्रामस्थांचा शासनाविरोधात एल्गार महागात पडेल, असा इशारा माजी जिल्हा परिषद सदस्य विजय भोजे यांनी दिला. यावेळी त्यांनी शुक्रवारी (ता.३) नृसिंहवाडी-कुरुंदवाड मार्गावर होणाऱ्या महापूरविरोधी मानवी साखळीत ग्रामस्थांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
अब्दुललाट (ता. शिरोळ) येथील ग्रामपंचायतीच्या आवारात असणाऱ्या श्री. भोजे यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी (ता.३०) झालेल्या बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘२००५ पासून शिरोळ तालुक्याला महापुराचा फटका बसू लागला आहे. तेव्हापासून आजवर पावसाळा सुरू झाला की पूरग्रस्त गावांमध्ये भीती निर्माण होते.
प्रशासकीय पातळीवर पंचनामे आणि नुकसानभरपाईचे घोडे नाचवले जातात, पण दरवर्षी नुकसानभरपाई देण्यापेक्षा पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी विदर्भ, मराठवाड्यात वळवल्यास कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांना महापुराचा फटका बसणार नाही; पण शासनाला उपायोजना (measures) राबवण्यापेक्षा नुकसानभरपाई देण्यात रस वाटतो; पण हाच महापूर काहींसाठी कुरण ठरत आहे.’
येणाऱ्या काळात ठोस उपाययोजना राबवल्या नाहीत तर शिरोळ तालुक्यातील संतप्त जनता सरकार उलथून टाकेल. गेल्या काही वर्षांतील या महापुराने शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, लघुउद्योजकांसह सर्वसामान्यांचे कंबरडे मोडलेआहे; पण शासनाला दया येत नाही.
येणाऱ्या काळात जनताच शासनाला ताळ्यावर आणेल, असा इशारा त्यांनी दिला. निंगाप्पा कांबळे, बाबूराव परीट, उमेश पाटील, विष्णू कोळी, कल्लापा कोळी, सागर लोहार, अर्जुन कांबळे, धर्मेंद्र कुरणे, ओंकार कुंभार, योगेश आवळे, रोहित कोळी, घनश्याम कोळी, राहुल कोळी उपस्थित होते.
हेही वाचा :