तुमच्याही बाळाला अशी जन्मखूण असेल तर दुर्लक्ष करू नका! काहींचे असतात वेगळे संकेत

नवजात (newborn) बालकाचं आरोग्य अगदी नाजूक असतं. त्याची खूप काळजी घ्यावी लागते. प्रकृतीशी संबंधित काही समस्या निर्माण होऊ नये म्हणून कुटुंबीयांना सदैव सतर्क राहणं गरजेचं असतं. अनेक नवजात शिशूंच्या  शरीरावर जन्मत: काही खुणा असतात; मात्र तशा प्रकारच्या सर्वच खुणा जन्मखुणा नसतात. त्यातून भविष्यात त्या बालकाच्या आरोग्याशी संबंधित अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काही विशिष्ट लक्षणं दिसल्यास वेळीच उपचार घ्यायला हवेत. ‘ब्रेन रिमांड डॉट कॉम’ने या संदर्भात माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

कुटुंबामध्ये जन्माला आलेल्या बाळाच्या (newborn) रूपाने कोणत्या पूर्वजाने पुनर्जन्म घेतला, याचा अंदाज बांधायचं एक साधन म्हणून त्यांच्या शरीरावरच्या जन्मखुणांकडे पाहिलं जातं. बाळाच्या शरीरावर लाल किंवा काळ्या रंगाच्या खुणा असू शकतात. काही बाळांच्या चेहऱ्यावर किंवा कपाळावर लाल चट्टा किंवा लाल रंगाचं पुरळ किंवा फोड दिसतात. या सर्व जन्मखुणाच आहेत असं कुटुंबातल्या व्यक्ती गृहीत धरतात. परंतु, त्यापैकी काही स्ट्रॉबेरी मार्क  किंवा एक्स्टर्नल हेमँजिओमास  असू शकतात.

हेमँजिओमास म्हणजे एक प्रकारचा ट्यूमर  असतो. तो बेनाइन ट्यूमर असतो, म्हणजे निरुपद्रवी ट्यूमर असतो. शरीरात एकाच जागी खूप साऱ्या रक्तवाहिन्या  येतात त्या वेळी हा ट्यूमर होण्याची शक्यता अधिक असते. बाळ जेव्हा जन्म घेतं तेव्हा असे ट्यूमर दिसतात. परंतु कालांतराने हे कमी होत जातात. काही बाळांमध्ये तर जन्मानंतर काही दिवसांनंतरच हेमँजिओमास दिसतात. हे ट्यूमर किंवा चट्टे बाळाचं कपाळ, गळा किंवा कमरेवर अधिक प्रमाणात दिसून येतात.

वेळेआधी जन्म घेणाऱ्या बाळांमध्ये हेमँजिओमास ट्यूमर आढळण्याचं प्रमाण मोठं असतं. बहुतांश वेळा हेमँजिओमास ट्यूमरवर उपचार घेण्याची गरज पडत नाही. परंतु याचा त्रास होत असल्यास आवश्यक उपचार घेणं चांगलं असतं. या ट्यूमरमुळे बाळाला वेदना होत असल्याचं लक्षात आलं किंवा खरचटल्यावर त्यातून वारंवार रक्तस्राव होत असेल, तर अशा वेळी वैद्यकीय उपचार महत्त्वाचे आहेत. कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणंही यासाठी त्रासदायक ठरू शकतं. अल्सरेशन  होत असल्यास त्यावर वेगवेगळ्या प्रकारचे उपचार होऊ शकतात.

दरम्यान, सामुद्रिक शास्त्रात व्यक्तीच्या जन्मखुणांवरून त्याच्या स्वभावाची व व्यक्तिमत्त्वाविषयी माहिती जाणून घेतली जाते. यावर विश्वास ठेवणाऱ्या खूप व्यक्ती असतात. परंतु, एखाद्या व्यक्तीचा चेहरा किंवा शरीरावर कुठलीही खूण असली म्हणजे ती जन्मखूणच असते, असं मानणं चुकीचं आहे. त्यामुळे आरोग्यावर काही अपायकारक परिणाम होणार असतील तर उपचार करून घेणं अत्यंत गरजेचं असतं.

Smart News :


Leave a Reply

Your email address will not be published.