तुमचा चेहराच होणार तुमचा बोर्डिंग पास, ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते डिजियात्राचं अनावरण

देशांतर्गत विमानसेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी आता त्यांचा चेहराच त्यांचा बोर्डिंग पास(boarding pass) असणार आहे. नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी दिल्ली विमानतळावर डिजियात्रा या अॅप्लिकेशनचं अनावरण केलं आहे.

या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून फेशियल रेकग्निशन (चेहऱ्याची ओळख) करण्यात येणार आहे.

या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून चेहऱ्याची ओळख पटवून विमानतळावरील सर्व चेकपॉईंटवर प्रवाशांना प्रवेश दिला जाईल. विमानतळावर प्रवेश, सुरक्षा तपासणी आणि विमानात प्रवेशापूर्वीचा बोर्डिंग गेट अशा तिन्ही जागांवर अॅप्लिकेशनच्या माध्यमातून प्रवेश सोपा होईल. या अॅप्लिकेशनमध्ये आधार कार्डाच्या माध्यमातून प्रवाशाची नोंद केली जाईल.

तेव्हा प्रवाशाला आपला फोटोही काढावा लागेल. एअरपोर्टच्या ई-गेटवर प्रवाशाला आधी बारकोड असलेला बोर्डिंग पास(boarding pass) स्कॅन करावा लागेल. त्यानंतर तिथे असलेल्या फेशिअल रेकग्निशन प्रणालीवर प्रवाशाची ओळख पटवण्यात येईल आणि संबंधित प्रवासाच्या दस्तऐवजाची पुष्टी करण्यात येईल. त्यानंतरच प्रवाशाला विमानतळावर प्रवेश देण्यात येईल.
सध्या ही प्रणाली दिल्ली, वाराणसी आणि बेंगळुरू विमानतळांवर राबवण्यात येत आहे.

Smart News:-