कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष युतीने(candidates) इसवी सन 1995 मध्ये महाराष्ट्रात सत्ता संपादन केल्यानंतरही त्यांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या पक्षातून किंवा उसने उमेदवार घ्यावे लागले होते. ती परंपरा आजही थोड्याफार फरकाने सुरूच आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अभिनेते रमेश देव, निवृत्त मेजर जनरल शिवाजीराव पाटील, विक्रम सिंह घाटगे, माझी महापौर रामभाऊ फाळके असे उमेदवार लोकसभा निवडणुकीसाठी बाहेरून आयात केले होते.
विशेष म्हणजे हे सर्व उमेदवार निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेत(candidates) कधीच दिसले नाहीत. विक्रम सिंह घाटगे यांनी तर गांधी मैदानावर घेतलेली शपथ आजही लोकांच्या स्मरणात आहे. शिवसेनेने कोल्हापुरात चांगले मुसंडी मारलेली होती. कोल्हापूर विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेला आमदार मिळालेले होते. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वास दुणावला होता. त्यांना करवीर निवासिनी अंबाबाई आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या कोल्हापुरातून खासदार हवा होता.
1998 सालच्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या वतीने कागलचे विक्रम सिंह घाटगे यांना शिवसेनेची उमेदवारी दिली होती. विक्रम सिंह घाटगे हे कागल विधानसभा मतदारसंघातून निवडून गेलेले होते. ते राजर्षी शाहू सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्षही होते. त्यांच्याबद्दल जनमत चांगले होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमधील सहा तालुक्यांमध्ये त्यांचा प्रभाव होता. अशा प्रकारची निवडून येण्याची गुणवत्ता लक्षात घेऊन बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना उमेदवारी दिली होती.
इसवी सन 1998 सालच्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या वतीने सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून आखाड्यात होते. विक्रमसिंह घाटगे विरुद्ध सदाशिवराव मंडलिक असा सामना होता. विशेष म्हणजे या दोघांनीही परस्पर विरुद्ध कागल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या दोघांनाही कागल विधानसभा मतदारसंघातून कधी यश तर कधी अपयश मिळाले होते.
आता याच दोघांमधील सामना कोल्हापूर लोकसभा या व्यापक मतदारसंघात रंगणार होता. सदाशिवराव मंडलिक यांचे वडील दादोबा मंडलिक हे कागलच्या जहागीरदार घराण्यात इंजिन ड्रायव्हर म्हणून सेवेत होते. इंजिन ड्रायव्हरचा मुलगा विरुद्ध राजे अशी लढत अनेकदा झालेली होती. 1998 च्या लोकसभा निवडणुकीत हे दोघे एकमेकांसमोर ठाकले होते. विक्रम सिंह घाटगे हे रक्ताचे वारसदार असले तरी मी राजर्षी शाहूंच्या विचारांचा वारसदार आहे हे सदाशिवराव मंडलिक यांच्या प्रचार सभेतील भाषणाचे सूत्र होते.
विक्रम सिंह घाटगे यांच्या प्रचारासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एक विक्रमी गर्दीची सभा गांधी मैदानावर झाली होती. ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात करताना विक्रम सिंह घाटगे पाटील असा अनावधानाने उल्लेख केला होता. कारण त्यांना विक्रम सिंह घाटगे यांच्यापेक्षा कोल्हापुरातील घाटगे पाटील या कंपनीचे नाव त्यांच्या परिचयाच्या होते. याच जाहीर सभेत विक्रम सिंह घाटगे यांचेही उमेदवार म्हणून प्रभावी भाषण झाले. भाषणाचा शेवट करताना त्यांनी”मी शेवटपर्यंत शिवसेनेत सक्रिय राहणार. कारण हे घाटगे घराण्याचे रक्त आहे”अशा आशयाची शपथ घेतली होती.
ही लोकसभा निवडणूक अतिशय अटीतटीची आणि चुरशीची झाली. काँग्रेसचे सदाशिवराव मंडलिक यांना तीन लाख 67 हजार 951 मते मिळाली. त्यांच्या मतांची टक्केवारी 51 टक्क्याच्या आसपास होती तर विक्रम सिंह घाटगे यांना तीन लाख 6 हजार 353 मते मिळाली. त्यांची मतांची टक्केवारी 42% च्या आसपास होती. सदाशिवराव मंडलिक हे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार बनले. नंतर एकाच वर्षात शरद पवार यांनी काँग्रेसशी असलेली सोयरीक तोडली आणि 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. खासदार सदाशिवराव मंडलिक हे सुद्धा शरद पवार यांच्याबरोबर काँग्रेस मधून बाहेर पडले होते.
विक्रम सिंह घाटगे यांना पराभवास सामोरे जावे लागले. हा पराभव त्यांना अतिशय जिव्हारी लागला होता. त्यानंतर त्यांनी सक्रिय राजकारणच सोडले. त्यांनी साखर कारखान्यामध्येच लक्ष केंद्रित केले. त्यानंतर ते शिवसेनेमध्ये कधीच दिसले नाहीत. शिवसेनेच्या व्यासपीठावरही ते दिसले नाहीत. शिवसेनेकडे पाठ फिरवल्यानंतर, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य मतदार हा विक्रम सिंह घाटगे यांनी गांधी मैदानावर घेतलेल्या जाहीर शपथेबद्दल चर्चा करत राहिला होता.
सदाशिवराव मंडलिक आणि विक्रम सिंह घाटगे हे दोघेही एकमेकाला राजकीय शत्रू मानत होते. तेव्हा कागल मध्ये मंडलिक गट आणि घाटगे गट, हे दोनच गट प्रभावशाली होते. जवळपास 25 वर्षे त्यांच्या तर राजकीय वैर होते. नंतर ते कागल मधील गैबी चौकात झालेल्या एका कार्यक्रमात एकत्र दिसले होते. विक्रमसिंह घाटगे यांच्या निधनानंतर राजकीय वैराची परंपरा संपुष्टात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या वाट्याला आला होता तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला आला होता. भारतीय जनता पक्षाला सुद्धा या मतदारसंघात स्व पक्षातून एकही उमेदवार देता आला नाही. त्यांनाही उसने उमेदवाराचं घ्यावे लागले. विशेष म्हणजे शिवसेनेला 2019 च्या निवडणुकीत दोन खासदार मिळाले होते पण भारतीय जनता पक्षाला हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आपल्या विजयाचे खाते उघडता आले नाही.
हेही वाचा :
सांगलीत २६ लाखाची चांदी जप्त, आष्टातील वाहन चालकाची चाैकशी सुरु
मोदींचा फोटो लावून प्रकाशअण्णा आवाडेंनी हातकणंगलेत महायुतीविरोधात ठोकला शड्डू!
भाविकांसाठी आनंदाची बातमी! ‘चैत्रोत्सवात’ सत्पश्रृंगी देवीचं मंदिर २४ तास राहणार खुलं