विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयांचे अनुदान – शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड

पहिली ते बारावीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाख रुपयांचे सानुग्रह दिले जाणार आहे . याबाबत सुधारित राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना लागू करण्यास शासनाने मान्यता दिल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा . वर्षा गायकवाड यांनी दिली.

सुधारित योजनेअंतर्गत विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास दीड लाख रुपये रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे . अपघातामुळे विद्यार्थ्यांना कायमचे अपंगत्व झाल्यास एक लाख रुपये , अपघातामुळे एक अवयव किंवा एक डोळा कायम निकामी झाल्यास 75 हजार रुपये , अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये , विद्यार्थी आजारी पडून सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास दीड लाख रुपये तसेच विद्यार्थी कोणत्याही कारणाने ( क्रीडा स्पर्धेत खेळताना , शाळेतील जड वस्तू पडून , आगीमुळे , विजेचा धक्का , वीज अंगावर पडून ) जखमी झाल्यास प्रत्यक्ष हॉस्पिटलचा खर्च किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्यात येईल.

आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करणे , गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात , अमली पदार्थांच्या अमलाखाली असताना झालेला अपघात , नैसर्गिक मृत्यू , मोटार शर्यतीतील अपघात याबाबींचा यामध्ये समावेश राहणार नाही . या योजनेतील प्रस्ताव निकाली काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात येत आहे . या समितीसमोर इयत्ता पहिली ते आठवी व इयत्ता नववी ते बारावीमध्ये शिकणाऱ्या मुला – मुलींसाठी प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) व शिक्षणाधिकारी ( माध्यमिक ) यांची राहील . तर , बृहन्मुंबई शहरांसाठी संबंधित शिक्षण निरीक्षक यांनी प्रस्तावांची छाननी करून समितीसमोर सादर करावे लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.