इचलकरंजी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नर्सिंग कॉलेज मंजूर

इचलकरंजीच्या(Ichalkaranji) इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात नर्सिंग कॉलेज मंजूर करण्यात आले आहे. खासदार आणि आमदारांच्या प्रयत्नांना यश मिळाल्याने हा निर्णय घेण्यात आला. आमदार डॉ. राहुल आवाडे, माजी आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, खासदार धैर्यशील माने, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि सुरेश हाळवणकर यांच्या पाठपुराव्यामुळे ही सुविधा इचलकरंजीसाठी उपलब्ध होणार आहे.

नर्सिंग कॉलेज मंजूर झाल्याने आरोग्य सेवेसाठी ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. या रुग्णालयात अद्याप मोठ्या शस्त्रक्रिया होत नाहीत. त्यामुळे गंभीर रुग्णांना कोल्हापूर किंवा सांगली येथे हलवले जाते. यामुळे रुग्णांच्या उपचाराला उशीर होतो आणि त्यांचे हाल होतात. फक्त नर्सिंग कॉलेज मंजूर करून उपयोग नाही, तर मोठ्या शस्त्रक्रियांसाठी आवश्यक सुविधा आणि डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.

सामाजिक संघटनांच्या गटांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. नर्सिंग कॉलेज सुरू झाल्यानंतर रुग्णांसाठी आवश्यक साधनसामग्री आणि तज्ज्ञ डॉक्टर पुरवले जातील का, हा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णालयाचा दर्जा उंचावण्यासाठी आधुनिक उपकरणे, शस्त्रक्रियांसाठी लागणारी सुविधा आणि सर्व प्रकारचे तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी नागरिक आणि कार्यकर्ते करत आहेत.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुढील टप्प्यात रुग्णालयाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इचलकरंजी(Ichalkaranji) आणि परिसरातील नागरिकांना दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळण्यासाठी हे रुग्णालय सीपीआर रुग्णालयाच्या धर्तीवर उभारण्यात यावे, अशी मागणी वाढू लागली आहे. नर्सिंग कॉलेज मंजुरी हा एक महत्त्वाचा निर्णय असला तरी त्यासोबतच मोठ्या शस्त्रक्रिया आणि इतर वैद्यकीय उपचारांची सोय करणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे स्थानिक नेते आणि प्रशासनाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचा :

प्रचंड वेगात लाट आली अन्…! खवळलेल्या सागरात भली-मोठी बोट झाली पलटी Video Viral

सांगलीतील धक्कादायक घटना : रक्ताच्या उलट्या झाल्याने बर्फ गोळा विक्रेत्याचा मृत्यू;

माता न तू वैरिणी! आईने केली १७ वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या, आजीने लावली मृतदेहाची विल्हेवाट