कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : इथे कोल्हापुरात(kolhapur) “मोक्का”च्या गुन्ह्यातून सुटलेल्या गावगुंडाची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. त्याला दुग्धाभिषेक घातला जातो. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई केली जाते. ऐतिहासिक पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावामध्ये भाचीने मनाविरुद्ध लग्न केलं म्हणून मामाने लग्न समारंभाच्या
जेवणात चक्क विष मिसळले. या घटनेने कोल्हापूरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली. तर तिकडे छत्रपती संभाजीराजे चुलत भावाकडून एका तरुणीची डोंगरावरून ढकलून हत्या केली जाते.
पुण्यातील एका माध्यमिक शाळेत विद्यार्थिनींच्या चेंजिंग रूम मधील व्हिडिओ शूटिंग केले जाते. तर लाडकी बहीण योजनेच्या तालुका समितीचे अध्यक्ष पद वाल्मीक कराड यांच्याकडे दिले जाते. काय चाललंय काय शाहू, फुले,
आंबेडकरांच्या राज्यात? इथे पोलिसांची आणि कायद्याची भीतीच उरलेली नाही. याबद्दल आत्मचिंतन करायची जबाबदारी कोणाची?
कोल्हापुरातील(kolhapur) कुणा एका गुंडाची अडीच तीन वर्षानंतर कळंबा मध्यवर्ती कारागृहातून सुटका होते. कितीतरी गंभीर गुन्हे केलेल्या अनिकेत सूर्यवंशी याची कळंबा मध्यवर्ती कारागृहापासून त्याच्या घरापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढली जाते. या मिरवणुकीत आलिशान गाड्या असतात, मोठ्या संख्येने युवक असतात. फार मोठा पराक्रम केल्यासारखे त्याचे तो राहत असलेल्या भागात स्वागत केले जाते.
इतकेच नव्हे तर त्याच्याकडे परमेश्वराचा अंश आहे असे समजून त्याला दुधाने अभिषेक घातला जातो. दुधाची अंघोळ घातली जाते. यूपी किंवा बिहारची पार्श्वभूमी असलेला एखादा भडक हिंदी चित्रपट तर आपण पाहत नाही ना असे वाटावे अशी ती मिरवणूक होती. पोलिसांच्या आणि कायद्याच्या नाकावर टिच्चून मी बाहेर आलो. माझे कोणी काही वाईट करू शकत नाही असा एक संदेशच त्यांने समाजाला दिला आहे. पोलिसांचे भय गुंडांना वाटले पाहिजे पण या गुंडांचेच समाजात भय वाढले आहे.
काही वर्षांपूर्वी सोलापुरात एका गुंडाची दहशत खूप वाढली होती मात्र सोलापूरच्या जेल रोड पोलीस स्टेशन मधील एका कठोर अधिकाऱ्याने त्या गुंडाची सोलापूर शहरातून मिरवणूक काढली होती. नंतर हाच गुंड माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली असा ठपका ठेवून संबंधित पोलीस अधिकाऱ्यांच्या विरुद्ध न्यायालय गाठले होते. गंमत अशी की हाच गुंड नंतर कर्नाटक विधानसभेचा सदस्य बनला.
काही वर्षांपूर्वी कोल्हापूर(kolhapur) शहरात एका सावकाराची गुंडागर्दी प्रचंड प्रमाणावर वाढली होती. शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या एका कठोर पोलीस अधिकाऱ्याने त्या गुंड सावकाराची मे महिन्यातील कडकडीत उन्हाळ्यात अनवाणी पोलीस ठाणे ते न्यायालय अशी धिंड काढली होती. त्यानंतर या गुंडाची मस्ती उतरली, पण तो नंतर कोल्हापूर महापालिकेचा नगरसेवक बनला. पोलीस अधिकाऱ्यांच्या मनात आले तर गुंड कोणताही असो, त्याच्या मागे कोणतीही राजकीय शक्ती असो त्याला वठणीवर आणता येते. अशी कितीतरी उदाहरणे कोल्हापूर आणि इतर जिल्ह्यातील सांगता येतील.
अलीकडच्या काळात मात्र पोलीस किंवा पोलीस अधिकारी यांच्याकडून कातडी बचाव धोरण स्वीकारले जाते. जाऊदे, मरू दे, आपल्याला काय करायचे? अशी बचावात्मक भूमिका घेतली जाते. आणि त्यामुळे गुंडांना पोलिसांचे भय उरत नाही.
बहिणीने आंतरजातीय विवाह केला म्हणून कसबा बावडा(kolhapur) परिसरातील दोघा बंधूंनी बहीण आणि तिचा नवरा या दोघांचीही हत्या केली होती. आज हे बंधू जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. पन्हाळा तालुक्यातील उत्रे गावच्या एका तरुणीने मामाच्या इच्छेविरुद्ध एका तरुणाशी लग्न केले. महेश पाटील नावाचा हा मामा भलताच संतप्त झाला त्याने मग लग्न समारंभा निमित्त आयोजित केलेल्या भोजन समारंभातील जेवणातच विष कालवले. सदैव इतकेच हे कुणाला तरी समजले आणि मग मोठा अनर्थ टळला. समजा जेवणात विष कालवले असल्याचे कुणाच्या लक्षात आलेच नसते तर गावावर काय आपत्ती ओढवली असती याची कल्पनाच केलेली बरी.
छत्रपती संभाजी नगर मध्ये एका तरुणीचे परजातीय तरुणाशी प्रेम संबंध जुळले. तिच्या चुलत भावाला हे कळाल्यानंतर त्याने तिला गोड बोलून डोंगर माथ्यावर नेले आणि तेथून 200 फूट खोल असलेल्या दरीत तिला ढकलून दिले. तिची हत्या केली. या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली. या घटनेवरून किंवा अशाच प्रकारच्या अनेक घटनांवरून जाती अंताची लढाई किती कठीण आहे हे लक्षात येईल.
सध्या महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण गाजते आहे. याच कांडातील एक आरोपी वाल्मीक कराड हा लाडकी बहीण योजनेच्या परळी वैजनाथ येथील समितीचा अध्यक्ष असल्याचे पुढे आले आहे. यावरून गावगुंडांना राजाश्रय किती भक्कमपणे मिळतो हे लक्षात यावे. या व इतर प्रकारच्या घटनांवरून असे लक्षात येईल की इथे पोलिसांचे भय उरले नाही, इथे कायद्याची भीती राहिलेली नाही. वास्तविक “यहॉ, पुलीस और कानून से डरना जरुरी है”अशा प्रकारचे वातावरण तयार केले पाहिजे तसे झाले तरच समाज भयमुक्त होईल.
हेही वाचा :
लाडक्या बहिणी अन् दीदींना केंद्राकडून मिळेल ओवाळणी, अर्थमंत्री तिजोरी उघडणार!
समलैंगिक विवाह नाही म्हणजे नाहीच; पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
अभियांत्रिकी शिक्षण झालंय? मग ‘ही’ भरती खास तुमच्यासाठी