भाजपमध्ये घुसमट होत असेल तर काँग्रेसमध्ये या, आम्ही साथ देऊ! नाना पटोलेंची गडकरींना ऑफर

Nitin Gadkari

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. भाजपमध्ये घुसमट होत असेल तर नितीन गडकरी यांनी काँग्रेसमध्ये यावे.

आम्ही त्यांना ताकद देऊ, असे विधान नाना पटोले यांनी केले आहे. ते अकोल्यामध्ये पत्रकारांशी बोलत होते.

नितीन गडकरी यांना भाजपकडून डाववले जात असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय निवडणूक समिती आणि भाजपच्या संसदीय मंडळातून नितीन गडकरी यांचा पत्ता कट करण्यात आला होता. भाजपकडून गडकरी यांचे पंख छाटण्याचा प्रयत्न होत असल्याची चर्चा सुरू असताना नाना पटोले यांनी त्यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

गडकरी नाराज असून भाजपमध्ये त्यांचे मत ऐकून घेतले जात नाहीय. भाजपमध्ये त्यांची घुसमट होत असून त्यांनी काँग्रेसमध्ये यावे. आम्ही तुमची साथ देऊ असे नाना पटोले म्हणाले. तसेच लवकरच आपण गडकरी(Nitin Gadkari) यांची भेट घेणार असून देशात भाजपविरोधात बोलणाऱ्यांच्या मागे ईडी, सीबीआय लावली जाते तशी पद्धत आमच्याकडे नसल्याचा टोलाही नाना पटोले यांनी लगावला.

काँग्रेस हा लोकशाही व्यवस्था मानणारा पक्ष आहे. त्यामुळेच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत निवडणूक घेतली जाते. काँग्रेसमध्ये प्रत्येक नेत्याला मत व्यक्त करण्याचा अधिकारी आहे, परंतु भाजपमध्ये तसे होत नाही. तसेच गेल्या काही दिवसात नितीन गडकरी(Nitin Gadkari) यांचे पक्षाकडून जे हाल सुरू आहे ते पाहून सर्वकाही ठिक आहे, असे म्हणता येणार नाही, असेही ते म्हणाले.

भाजपवर निशाणा

राहुल गांधी यांनी भारत जोडे यात्रेदरम्यान घातलेल्या टी-शर्टच्या किमतीवरुन भाजपने रान उठवले आहे. यालाही नाना पटोले यांनी उत्तर दिले. काँग्रेसच्या ‘भारत जोडो’ यात्रेमुळे भाजपला धडकी भरली असून त्यामुळेच टी-शर्टच्या किमतीसारखे टुकार मुद्दे भाजपाला काढावे लागत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 लाखांचा सूट, दीड लाखांचा चष्मा, 80 हजारांची शाल, 8 हजार कोटी रुपयांचे विमान वापरतात आणि फकीर असल्याचा कांगावा करतात, अशी टिकाही त्यांनी केली.

Smart News:-