‘बंडखोर आमदारांना परिणाम भोगावे लागतील’, शरद पवारांचा मोठा इशारा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद (press conference) घेऊन सध्याच्या राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली. शिवसेनेविरोधात बंड पुकारुन गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना परिणाम भोगावे लागतील, असं विधान शरद पवार यांनी केलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बंडखोर आमदारांमागे भाजपचा हात नाही, असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानावर शरद पवार यांना प्रश्न विचारला असता शरद पवारांनी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या व्हिडीओचा दाखला देत राष्ट्रीय पक्षांची यादीच वाचली. त्यातून शरद पवारांनी सध्याच्या या राजकीय घडामोडींमागे भाजपच असल्याचं अप्रत्यक्षपणे सांगितलं.

“बंडखोर आमदारांची निधी न मिळण्याबाबतचा आरोप हे वस्तूस्थितीला धरुन नाही. त्यांनी जो निर्णय घेतला आहे तो कायद्याविरोधात आहे. त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. त्यांनी मतदारसंघाचं फक्त कारण दिलं.

छगन भुजबळ यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्यासोबत 12 ते 15 जण होती. त्यानंतर जी निवडणूक झाली होती त्यामध्ये एक-दोन जण सोडला तर बाकी सर्वांचा पराभव झाला होता, असा महाराष्ट्रातला अनुभव आहे. त्यामुळे जे लोक आता आसामला गेले आहेत त्यांच्यासोबत तसंच होऊ शकतं. त्यासाठी त्यांनी आपल्या मतदारांना निधीचा मुद्दा सांगितला आहे”, असं शरद पवार (press conference) म्हणाले.

“अजित पवारांनी महाराष्ट्रातील मुंबईची स्थिती पाहून विधान केलं असावं. इथून प्रत्यक्ष लोक हलवणं आणि ऑपरेशन करणं यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांचे सहकारी दिसत आहेत. अजित पवारांना इतकी माहिती जरुर आहे. पण गुजरात आणि आसाम इथली परिस्थिती राज्याच्या बाहेरची  आम्हाला अधिक माहिती. एकनाथ शिंदे यांनी एका राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असल्याचं विधान केलं आहे.

माझ्याकडे सर्व राष्ट्रीय पक्षांची यादी आहे. यामध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, टीएमसी, कम्युनिस्ट पार्टी, सीपीएन ही सहा अधिकृत पक्षांची यादी आहे. या सगळ्यांचा यात हात आहे का? जे नाहीत याचा विचार केला तर कोण आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही”, असं शरद पवार म्हणाले.

हेही वाचा :


शाळा सिद्धी स्वयंमूल्यमापनात कोल्हापूर जिल्हा राज्यात प्रथम..!

Leave a Reply

Your email address will not be published.