मतदानाला 6 दिवस शिल्लक असतानाच राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!

विधानसभा(Assembly) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांकडून सुरु आहे. प्रचारसभांमध्ये थेट एकमेकांचा उल्लेख करत केली जाणारी टीका, एकमेकांना टोले-टोमणे मारण्याचे प्रकार दिसून येत आहेत. त्यातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे त्यांच्या पहिल्या सभेपासूनच माजी मुख्यमंत्री आणि चुलत बंधू उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत असल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता या दोन्ही सेनांमध्ये पुन्हा एकदा जुंपल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. अशातच आता राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला निवडणुकीचा प्रचार संपण्याआधीच एक मोठा धक्का दिला आहे. विशेष म्हणजे दोन्ही सेनेंकडून ज्या परिसरावर दावा केला जातो तिथेच राज ठाकरेंनी उद्धव यांच्यावर कुरघोडी केल्याचं दिसत आहे.

झालं असं की विधानसभेच्या(Assembly) निवडणुकीचं मतदान 20 तारखेला आहे. त्याच्या 48 तास आधी प्रचाराच्या तोफा थंडावणार असल्याने 17 नोव्हेंबर ही तारीख प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतीदिनही आहे. याच दिवशी दादरमधील शिवाजी पार्क मैदानामध्ये सभा घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबरच मनसेला सुद्धा रस होता. यासाठी दोन्ही सेनांमध्ये चुरस सुरु होती. मात्र आता मुंबई महानगरपालिकेने आपलं मत राज ठाकरेंच्या पक्षाच्या पारड्यात टाकलं आहे. खरं तर शिवाजी पार्कात कुणाची सभा होणार यावरून मनसे आणि ठाकरे गटात चढाओढ सुरु होती. त्यामुळे हे मैदान कोणाला मिळणार याबद्दल उत्सुकता कायम होती. राज ठाकरेंना शिवाजी पार्कात सभा घेण्याची परवानगी देण्यात आली असून याची लेखी परवानगी 14 तारखेला दुपारपर्यंत मनसेला दिली जाणार आहे. तसेच उद्धव ठाकरे कुठे सभा घेणार हे सुद्धा निश्चित झालं आहे.

राज आणि उद्धव यांच्या पक्षांमध्ये शिवाजी पार्कवरुन चुरस सुरु असतानाच राज यांना परवानगी का देण्यात आली याबद्दलचा खुलासा महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे. एकाच वेळी एकाच दिवशी कार्यक्रम घेण्यासाठी अर्ज आले तर महापालिका अशावेळी पहिलं प्राधान्य पहिला अर्ज करणाऱ्याला देते. त्यानुसार 17 नोव्हेंबरसाठी मनसेनं आधी अर्ज केल्याने त्यांना परवानगी देण्यात आली आहे.

राज ठाकरेंच्या पक्षाला शिवाजी पार्क मैदानातील सभेसाठी परवानगी देण्यात आल्याने आता उद्धव ठाकरेंचा पक्ष त्यांच्या प्रचाराची शेवटी म्हणजेच 17 नोव्हेंबरची मुंबईतील शेवटची सभा बीकेसीच्या मैदानावर घेणार असं ठरलं आहे. उद्धव ठाकरेंच्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकातही बीकेसीतील सभेचा उल्लेख आहे.

17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन असल्याने शिवाजी पार्कच्या स्मृतीस्थळावर शिवसैनिकांची गर्दी होऊन त्यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांत वाद होवू शकतो. त्यामुळं मैदान आपल्याला द्यावे असे पत्र ठाकरेंच्या पक्षाने पालिकेला दिले होते. परंतु पालिकेने फर्स्ट कम फर्स्ट बेसेसवर मनसेला शिवाजी पार्क मैदान दिले आहे.

हेही वाचा :

Jio यूजर्ससाठी मुकेश अंबानींचं खास गिफ्ट!

मोठी बातमी! काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या कारचा भीषण अपघात, प्रचारावरून परततानाच..

सासरा सुनेवर शारीरिक संबंध ठेवण्यासाठी करायचा बळजबरी, जाणून घ्या हायकोर्टाने काय म्हटलं?