संस्कृतीच्या माहेर घरात सावित्रीच्या लेकी असुरक्षित

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : पुणे येथील स्वारगेट परिसराला एक ऐतिहासिक महत्त्व आहे. एसटी बस मधून उतरलेल्या प्रवाशांना घोडागाडीतून अर्थात टांग्यातून पुणे शहरातील त्याच्या इच्छित स्थळी सुखरूप पोहोचवले जात होते. एकट्या दुखट्या स्त्रीने सुद्धा अगदी बिनधास्त रात्री अपरात्री या घोडा गाडीत बसावे इतके सुरक्षित वातावरण तेव्हा होते. अशा या पुण्याच्या स्वारगेट बस(bus) स्थानकाच्या परिसरात एका युवतीवर बलात्कार झाला आणि तो “शिवशाही” नावाच्या बस मध्ये.

ज्या भूमीत छत्रपती शिवरायांच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवला गेला त्याच भूमीवर कोणी दत्ता गाडे नावाच्या सराईत गुन्हेगाराने विकृतीचा नांगर फिरवून मानवतेला सुद्धा लाजेने मान खाली घालायला लावली. हा मानवी चेहऱ्यातील सैतान आज किंवा उद्या पोलिसांना सापडेल पण सावित्रीच्या लेकी आज असुरक्षित बनत चालल्या आहेत त्याचे काय?

नवी दिल्लीत काही वर्षांपूर्वी बसमध्येच निर्भया कांड घडले होते. त्या घटनेने अवघा देश हादरला होता. त्यानंतर स्त्री संबंधित गुन्ह्यातील कायदे अधिक कठोर करण्यात आले. त्या चौघांना फासावर चढवण्यात आले, पण मलाच करा सारख्या गुन्ह्यात घट झालेली नाही. पुण्यात बस(bus) मध्येच घडलेला बलात्कार हा निर्भया कांड इतकाच गंभीर म्हटला पाहिजे. त्यातून प्रस्थापित व्यवस्थेचे सुद्धा धिंडवडे निघाले आहेत.

स्वारगेट बस स्थानक परिसर हा प्रचंड गर्दीचा. आत आणि बाहेर तितकीच गर्दी. या गर्दीतला प्रत्येकजण असुरक्षित. कारण सुरक्षिततेचा मागमुसही या परिसरात दिसत नाही. एसटी महामंडळाकडे स्वतःची अशी भरवशाची सुरक्षा व्यवस्था नाही. तिथे रामभरोसे सुरक्षा व्यवस्था. वर्दीतला पोलीस या गर्दीतच कुठेतरी हरवलेला. तू कुठेतरी ठळकपणे दिसला असता तर”दादा, फलटण कडे जाणारी बस कुठे लागते?”अशी त्याच्याकडे त्या अभागी तरुणीने विचारणा तरी केली असती. आता कोणतीही तरुणी किंवा महिला अनोळखी पुरुषाकडे साधा पत्ता सुद्धा विचारण्याचे धाडस करणार नाही परिवहन मंत्री प्रतापसरमाईक यांनी या घटनेनंतर कारवाईचा बडगा उगारला आहे.

काही जणांना निलंबित केले आहे तर काही जणांची चौकशी लावली आहे. त्यानंतर आगार प्रमुखांनी आपण पोलीस आयुक्तालयास पोलीस बंदोबस्त मिळवण्यासाठी पत्रव्यवहार केल्याचे समोर आले आहे. आम्ही पोलीस बंदोबस्त मागितला होता पण तो मिळाला नाही असा त्यांचा एकूण युक्तिवाद दिसतो. तथापि स्वारगेट पोलीस ठाण्याकडून या बसस्थानकासाठी किती पोलीस बळ दिले होते?

खाजगी सुरक्षा रक्षक काय करत होते? आगारातील नादुरुस्त किंवा भंगार बस गाड्यांमध्ये साड्या आणि कंडोम्स आढळले आहेत. त्यावरून तेथे रात्रीस काय खेळ चालत होता हे लक्षात येईल. एका तरुणीच्या अब्रूवर दरोडा पडल्यानंतर प्रस्थापित व्यवस्था खडबडून जाग्या झाल्या आहेत. एसटी बस(bus) स्थानक परिसरातील विदारक अव्यवस्था समोर आली आहे. मुख्यमंत्र्यांसह सर्वच मंत्र्यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे.

आता मंत्र्यांच्या फेऱ्या वाढतील. पण अशाच प्रकारची अव्यवस्था साऱ्या महाराष्ट्रातील बस स्थानक परिसरात दिसेल. कोल्हापूर बस स्थानक परिसरात पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेने रात्री अपरात्री महिलांना सुरक्षित रिक्षा प्रवासाची यंत्रणा राबवली होती. सध्या ती दिसत नाही. स्वारगेट घटनेनंतर आता सर्वच ठिकाणी सुरक्षिततेचे वातावरण तयार केले जाईल पण ते किती दिवस टिकणार हे सांगता येणार नाही.

पुणे येथील ससून रुग्णालयात ड्रग माफिया ललित पाटील याच्यासाठी सर्व सोयी सुविधा कशा पुरवल्या जात होत्या, तो रात्री कायदेशीर रखवालीत असताना सुद्धा नजीकच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये कसा जायचा, त्याला सर्व प्रकारच्या भौतिक सुविधा कशा उपलब्ध करून दिल्या जायच्या हे सारे नंतर काही महिन्यांनी उघडकीस आले तेव्हा महाराष्ट्र हादरून गेला होता. याच पुण्यात हिट अँड रन प्रकरण घडते.

धनिक पुत्राला वाचवण्यासाठी कोण कसे प्रयत्न करत होते? हे साऱ्या महाराष्ट्राला नंतर माहित पडले. बोपदेव घाटातील सामूहिक बलात्कार प्रकरण अगदी ताजे आहे. गेल्या दोन वर्षात पुणे जिल्ह्यात मलाच करायच्या जवळपास 900 हून अधिक घटना घडलेल्या आहेत. विनयभंगाच्या घटना एक हजार पेक्षा अधिक झालेल्या आहेत. पुणे तिथे गुन्हेच गुन्हे अशी ओळख गेल्या काही वर्षात एकेकाच्या सांस्कृतिक श्रीमंती असलेल्या पुण्याची बनली आहे.

पुण्यामध्ये निर्भया कांड सदृश्य प्रकरण घडल्यानंतर महायुती सरकारला विरोधकांच्याकडून शक्ती कायद्याची आठवण करून दिली जात आहे. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री होते तेव्हा या शक्ति कायद्याचे प्रारूप जाहीर करण्यात आले होते, पण नंतर शक्ती कायदा अस्तित्वात आणण्यासाठी कुणीच प्रयत्न केलेले दिसत नाहीत. कारण त्यानंतरचा काळ हा सत्ता संघर्षाचा होता हे नाकारता येत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावरचा. मोगलांनी पुण्याचे वाळवंट केल्यानंतर त्याच भूमीत राजमाता जिजाऊ यांनी बाल शिवाजींच्या हस्ते सोन्याचा नांगर फिरवला होता. आता त्या काळी अवतरलेल्या खऱ्या खुऱ्या शिवशाहीतील आजच्या पुण्यात शिवशाही नावाच्या बसमध्ये(bus) एका असहाय तरुणीवर बलात्कार केला जातो हा दैव दुर्वीलास म्हटला पाहिजे. याच भूमीत सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढून स्त्रीत्वाचा सन्मान केला त्याच पुण्यात आणि महाराष्ट्रात सुद्धा सावित्रीच्या लेकी आज किती सुरक्षित आहेत? हा प्रश्न विकृत दत्ता गाडे या नराधमाने अधोरेखित केला आहे.

हेही वाचा :

‘महिलेच्या गालाला, शरिराला हात लावणं म्हणजे…’; न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

भारतीय संघ अडचणीत, न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडियाचा कर्णधार बदलणार? 

राणीसारखं आयुष्य जगतेय प्रियांका चोप्रा; संपत्तीचा आकडा ऐकून थक्क व्हाल