शिवसेनेच्या हॅट्ट्रिकसाठी दक्षिण मुंबईकर सज्ज, दक्षिण मुंबई लोकसभा वार्तापत्र

दक्षिण मुंबई(mumbai) लोकसभा मतदारसंघात यावेळी शिवसेना हॅटट्रिक करणार असा राजकीय निरीक्षकांचा होरा आहे. गेल्या दहा वर्षांत शिवसेनेच्या माध्यमातून दक्षिण मुंबईत झालेली कामे, खासदारांचा दांडगा जनसंपर्क, शिवसेनेच्या पारंपरिक मतांच्या जोडीला महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस व मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते यांनी शिवसेना उमेदवाराच्या विजयावर निश्चितच शिक्कामोर्तब होणार आहे.

शिवडी, वरळी, भायखळा असा कामगारांचा गिरणगाव, उच्चभ्रूंचा मलबार हिल, डोंगरी, पायधुणी, मस्जिद बंदर, मोहम्मद अली रोड, नागपाडा, मुंबादेवीचा मुस्लिमबहुल पट्टा, किनारपट्टीजवळचे कोळीवाडे, दाक्षिणात्यबहुल कामाठीपुरा असे वैविध्य दक्षिण मुंबई (mumbai)लोकसभा मतदारसंघात आहे. सुरुवातीच्या काळात स. का. पाटील, जॉर्ज फर्नांडिस अशा दिग्गजांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. काँग्रेस, जनता पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेचा खासदार या मतदारसंघाने दिला.

एकगठ्ठा मुस्लिम मतांचे बेरजेचे गणित
युती असताना शिवसेना किंवा भाजपाचा खासदार या मतदारसंघात झाला तेव्हा मुस्लिमांची अपेक्षित मते मिळत नव्हती. यावेळची परिस्थिती वेगळी आहे. यावेळी शिवसेना महाविकास आघाडीत आहे आणि मुस्लिम पट्टय़ात भाजपाच्या हुकूमशाहीविरुद्ध चीड आहे. मुस्लिम वस्त्यांमध्ये शिवसेनेच्या प्रचारफेऱयांना मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि मुस्लिम तरुणांच्या हाती डौलाने फडकणारा भगवा परिवर्तनाचे संकेत देत आहे. एकही मोठा मुस्लिम नेता दक्षिण मुंबईत रिंगणात उतरलेला नाही हीसुद्धा शिवसेनेसाठी जमेची बाजू ठरणार आहे.

शिवसेनेचे प्राबल्य
शिवसेनेचे मोहन रावले हे मतदारसंघांच्या पुनर्रचनेपूर्वीपासून पाच वेळा दक्षिण मुंबईचे खासदार होते. अरविंद सावंत हे यंदा सलग तिसऱयांदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 2014 मध्ये ते 1 लाख 28 हजार 568 इतक्या मताधिक्याने विजयी झाले होते. 2019 ची निवडणूकही सावंत यांनी 1 लाख 67 मताधिक्याने जिंकली.

काँग्रेसचा पारंपरिक मतदार
दक्षिण मुंबई एकेकाळी काँग्रेसच्या अधिपत्याखाली होती. कुलाबा, मलबार हिल, भायखळा भागात काँग्रेसचा पारंपरिक मतदार आजही आहे. यावेळी ती मते शिवसेनेच्या पारडय़ात पडणार यात वादच नाही.

गद्दार विरुद्ध खुद्दार
शिवसेनेच्या विरोधात इथे मिंधे गटाने यामिनी जाधव यांना उमेदवारी दिली आहे. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी परळ-लालबाग-वरळीचा शिवसैनिक आतूर आहे. आमदार असल्याने जाधव यांचा आवाका केवळ भायखळय़ापुरता मर्यादित आहे. शिवसेनेशी गद्दारी केल्याने तिथेही त्यांच्याबद्दल नाराजी आहे. दक्षिण मुंबईतील बहुतांश मतदारांसाठी त्यांचा चेहराही नवखा आहे. दुसरीकडे अरविंद सावंत यांचा चेहरा घराघरात पोहोचलेला आहे.

ही बातमी वाचा: 

पेट्रोल-डिझेल होणार स्वस्त? सरकारचा ‘टॅक्स’संदर्भात मोठा निर्णय

कमळाला मतदान केलं म्हणून कुटुंबाला बेदम मारहाण

राजकारणात भूकंप येणार? शंभूराज देसाई यांच्याकडून मोठा गौप्यस्फोट