नाशिक : अंबड लिंक रोडवरील प्रभाग क्रमांक २६ येथील माजी नगरसेवक(political leaders) व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी नगरसेवक मधुकर जाधव व मनसेचे शहर संघटक बाजीराव दातीर यांनी रविवारी (दि.५) शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी प्रभाग २६ मधील माजी नगरसेवक भागवत आरोटे, माजी नगरसेविका हर्षदा गायकर यांनीही शिंदे गटात प्रवेश केला होता.

रविवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे(political leaders) यांच्या उपस्थितीत मुंबईत मधुकर जाधव व बाजीराव दातीर यांनी प्रवेश केल्याची माहिती महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी दिली. यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना उपनेते विजय करंजकर, सहसंपर्क प्रमुख राजू लवटे, आरोटे, गायकर उपस्थित होते.
याआधी, नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून इच्छुक असलेले माजी जिल्हाध्यक्ष दिलीप दातीर यांना डावलून राज ठाकरे यांनी भाजपचे माजी सभागृह नेते दिनकर पाटील यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे दातीर यांनी तडकाफडकी पक्षाचा राजीनामा दिला होता.
दिलीप दातीर यांना २०१९ मध्ये शिवसेनेने नाशिक पश्चिममधून आमदारकीचे तिकीट नाकारल्याने त्यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर दातीरांवर मनसेने नाशिक जिल्हाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवली होती. दातीर यांनी मनसेकडून विधानसभेची निवडणूकही लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा झटका बसला होता.
विधानसभा निवडणुकीच्या हंगामात मनसेच्या काही नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत ठाकरे गटात प्रवेश केला आहे. अखिल चित्रे यांनी मनसेला रामराम ठोकून ठाकरे गटात प्रवेश केला. त्याआधी कीर्तिकुमार शिंदे, निलेश जंगमही मनसे सोडून ठाकरे गटात आले होते. तर पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरेही व्हाया वंचित बहुजन आघाडी ठाकरेंच्या शिवसेनेत आले होते. तर माजी महापौर अशोक मुर्तडक यांनीही मनसेला रामराम ठोकला होता.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मनसेची दाणादाण उडाली. मनसेचे एकमेव आमदार अशी ओळख असलेले राजू पाटील यांच्यासह बाळा नांदगावकर, अविनाश जाधव यांच्यासह विविध मतदारसंघातही पक्षाच्या उमेदवारांचा दारुण पराभव झाला. राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरेही निवडून येऊ शकले नाहीत. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मनसैनिकांनी पक्षीय बांधणीवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अशातच राजीनामे पडत असल्याने मनसेची वाट अधिकच बिकट झाली आहे.
हेही वाचा :
HMPV व्हायरसमुळे महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर
बुमराहच्या शूजमधून पडलेल्या ‘त्या’ गोष्टीमुळे टीम इंडिया अडचणीत? सर्वांची चौकशी होणार?
मनोज जरांगे कोणाच्या फोननंतर पुण्यातील मोर्चा सोडून माघारी, समोर आलं कारण