मुंबईत मोठा गोंधळ, ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; शिवसैनिक आक्रमक

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील १३ जागांसाठी महाराष्ट्रात आज मतदान पार पडतंय. यामध्ये मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. अशातच ईशान्य मुंबईतून एक मोठी अपडेट समोर आली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मतदान केंद्राबाहेर उमेदवारांच्या नावाची चिठ्ठी घेऊन बसल्यामुळे कांजूर मार्ग पोलिसांनी ठाकरे गटाच्या दोन कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे. दोन्ही कार्यकर्त्यांना घेऊन पोलीस निघून गेले आहेत. या प्रकारामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. पोलिसांकडून दडपशाही सुरू असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या नेत्यांनी केला आहे.

कार्यकर्त्यांना नेमक्या कोणत्या कलमाखाली ताब्यात घेतलं, त्यांची चूक काय होती. ते मतदान केंद्राच्या १०० मीटर बाहेर होते, असा जाब शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विचारला आहे. दुसरीकडे ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी १० मिनिटाच्या आत सोडून द्यावं, अन्यथा पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन करू, असा इशारा ठाकरे गटाचे नेते सुनील राऊत यांनी दिला आहे.

सुनील राऊत म्हणाले, “सध्या पोलीस दोन्ही कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहेत. निवडणूक कार्यालयात जाऊन ते नियम समजून घेणार आहेत. जर कार्यकर्ते निवडणूक केंद्राच्या १०० मीटरच्या बाहेर असेल, तर आम्ही त्यांना सोडून देऊ, असं पोलिसांनी आम्हाला सांगितलं आहे”.

“पोलीस यंत्रणा भाजपच्या दबावाखाली आहे. ते भाजपचे गुलाम म्हणून काम करीत आहेत. पण मी पोलिसांना सांगतो, की ४ जून रोजी सरकार बदलणार आहेत. त्यावेळी तुम्ही काय करणार? आमच्या कार्यकर्त्यांना तत्काळ सोडून द्यावं, अन्यथा आंदोलन करू”, असा इशाराही सुनील राऊत यांनी दिला आहे.

हेही वाचा :

संघाशी नाते, आता सांगण्यापुरते

डमी मशीनवर मतदानाबाबत मार्गदर्शन, ठाकरेंचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; संजय राऊत आक्रमक!

“एमएस धोनीने मॅनेजमेंटला सांगितले…” थालाच्या निवृत्तीवर CSK अधिकाऱ्याचा मोठा खुलासा