शिवरायांचा अवमान करणाऱ्यांना गुडघे टेकायला लावणार!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या(about chhatrapati shivaji maharaj) काळात महिलांवर अत्याचार करणाऱयाचे हातपात तोडले जायचे. आज मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदी तिथे गेले नाहीत. हजारो महिलांवर अत्याचार करणाऱया प्रज्वल रेवण्णासाठी मते मागत आहेत. अशा मोदींच्या डोक्यावर प्रफुल्ल पटेल यांनी जिरेटोप घातला हा शिवरायांचा अवमान आहे आणि महाराष्ट्रात शिवरायांचा अवमान करणाऱ्याला गुडघे टेकायला लावल्याशिवाय राहणार नाही, याद राखा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज ठणकावून सांगितले.
नाशिक लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेनेचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्या प्रचारासाठी हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सभा आयोजित करण्यात आली होती. या विराट सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपसह अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांचाही ठाकरी भाषेत समाचार घेतला.
काही पावटे शिवसेनेला नकली म्हणतात…
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः शिवसेनेची जबाबदारी माझ्याकडे सोपवली होती. तरीही काही पावटे… त्याच्याआधी एक शब्द जोडतात पण मला जोडायचा नाही. पावटय़ाचा गुणधर्म सर्वांना माहीत आहे. ते पावटे शिवसेनेला नकली म्हणत आहेत. त्यांना कुठे मोड फुटलेत माहीत नाही, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपावर टीका केली. मोदी झोपत नाहीत असे सांगतात, झोप अपुरी झाली की माणसाच्या मेंदूवर परिणाम होतो आणि तो भ्रमिष्टासारखा बोलायला लागतो, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.(about chhatrapati shivaji maharaj)

मोदी नकली संताने दत्तक घेतात
प्रफुल्ल पटेल यांनी पंतप्रधान मोदी यांना जिरेटोप घालून शिवरायांचा अवमान केल्याची भावना महाराष्ट्रातील तमाम शिवप्रेमींमध्ये निर्माण झाली आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयात पटेल यांच्याबद्दल प्रचंड संताप व्यक्त होत आहे. त्या घटनेचा धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी यावेळी मोदींसह पटेल यांचाही शेलक्या शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, एका बाजूला भ्रष्टाचाराचे आरोप करायचे आणि नकली संताने दत्तक घ्यायची, तशीच एक वाह्यात संतान मोदींनी मांडीवर घेतली आहे, तिचे नाव प्रफुल्ल पटेल. जरी तुम्ही पटेल असाल तरी असे काही कराल तर जनता तुम्हाला आपटेल, असे सांगतानाच, जिरेटोप कुणाच्या डोक्यावर ठेवता? मोदींच्या? त्यांची पात्रता काय महाराजांची बरोबरी करण्याची? थोडी तरी पात्रता आहे का? असा संतप्त सवाल उद्धव ठाकरे यांनी पटेल यांना उद्देशून केला.

इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचे अनेक चेहरे आहेत, दरवर्षी नवा पंतप्रधान करतील अशी टीका पंतप्रधान मोदी आमच्यावर करतात. होय, आमच्याकडे चेहरे आहेत, तुमच्याकडे तर चेहराच नाही. दोन वर्षानंतर भाजपची अवस्था काय होईल ते पहाच. 5 जूनलाच अर्धाअधिक भाजपा फुटल्याशिवाय राहणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यानंतर जे उंदीर भाजपात पळाले आहेत त्यांच्या शेपटय़ा कशा पकडतो ते पाहा, असा इशाराही त्यांनी दिला.

शेतकऱ्यांची ताकद दाखवून द्या
गद्दारी केली म्हणून नाशकातल्या एका कांद्याला भाजपने खोके दिले. आता शेतकरी बनून तुमची ताकद मोदी सरकारला दाखवा, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी नाशिकमधील शेतकऱयांना केले. इंडिया आघाडीचे सरकार आल्यानंतर शेतकऱयांच्या हिताचे निर्णय प्राधान्याने घेतल्याशिवाय राहणार नाही, अशा अभिवचनाचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

हेही वाचा :

सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची नाराजी, कोल्हापुरात पडसाद?; सतेज पाटील काय म्हणाले?

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट; ४ याचिकांवर स्वतंत्र सुनावणी होणार, छगन भुजबळांच्या अडचणी वाढल्या?

अमरावतीत होणार तिरंगी लढत! बच्चू कडूंच्या उमेदवारामुळं महायुती की मविआचा होणार गेम?