इचलकरंजी शहरात वाहन उचलण्यासाठी कार्यरत असलेल्या क्रेन(Crane) व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये नाराजी वाढत चालली आहे. प्रशासनाच्या नियमानुसार क्रेन हा व्यवसाय असल्याने त्याच्या मालकाकडे व्यवसाय नोंदणी दाखला असणे आवश्यक आहे, तसेच त्याचा शहरातील पत्ता अनिवार्य आहे. मात्र, अनेक क्रेन मालकांकडे ही नोंदणी नसल्याची तक्रार आहे. उद्या जर या क्रेनने चुकीच्या पद्धतीने काम केले किंवा कोणाला अन्यायकारक दंड लावला, तर नागरिकांनी तक्रार कुठे करायची आणि या क्रेनधारकांना शोधायचे कुठे, असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नियमानुसार प्रत्येक क्रेनवर(Crane) तीन कर्मचारी असणे गरजेचे आहे, मात्र प्रत्यक्षात चार किंवा पाच कर्मचारी कार्यरत असल्याचे वारंवार दिसून येत आहे. एका क्रेनवर चार कामगार आणि एक ड्रायव्हर असे पाच जण असतात. प्रत्येकाला ५०० रुपये पगार गृहित धरला, तर एकूण २५०० रुपये खर्च होतो. मात्र, प्रत्यक्षात दररोज सात ते आठ अधिकृत पावत्या दिल्या जातात, तर वास्तवात २५ ते ५० वाहने उचलली जात असल्याचे निरीक्षण करण्यात आले आहे. प्रत्येक वाहनासाठी १०० रुपये शुल्क आकारले जाते, त्यामुळे एकूण उत्पन्न अधिक असताना क्रेनचे मालक एवढा मोठा पगार आणि देखभाल खर्च कसा भागवतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
याशिवाय, वाहनधारकांना लावलेला दंड हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्वतःकडे घ्यायचा असतो, पण प्रत्यक्षात क्रेनवरील कर्मचारी किंवा ड्रायव्हर हे पैसे घेत असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. त्यामुळे हे पैसे कोठे जातात आणि त्याचा हिशोब कसा ठेवला जातो, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. काही ठिकाणी ही प्रक्रिया सिग्नल जवळ गाड्या थांबवून पान टपरी किंवा चहा टपरीवर पैसे द्यायला लावण्यासारखी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे यामध्ये आर्थिक अपहार किंवा चिरीमीरीचा प्रकार होत आहे का, याची चौकशी करणे आवश्यक ठरते.
शहरवासीयांच्या वाहन शिस्तीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेली क्रेन सेवा आता पांढरा हत्ती ठरत आहे. याचा प्रत्यक्ष फायदा प्रशासनाला कमी होत असून नागरिकांच्या खिशातून मोठ्या प्रमाणात पैसे जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या अतिरिक्त रकमेचा हिशोब कुठे जातो, हा प्रश्न इचलकरंजीतील प्रत्येक नागरिकाला पडत आहे. प्रशासनाने यावर तत्काळ लक्ष घालून योग्य तोडगा काढावा, अन्यथा याबाबत नागरिकांमध्ये तीव्र रोष निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करून ही अनियमितता थांबवावी, अशी मागणी इचलकरंजी नागरिक मंचतर्फे करण्यात येत आहे.
हेही वाचा :
स्मार्टफोनलाही कान असतात! तुमचा फोन ऐकतोय सर्व सीक्रेट गोष्टी, त्वरित बंद करा ही सेटिंग
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी करा ‘या’ भिजवलेल्या सुक्या मेव्याचे सेवन
महामुकाबल्याच्या काही तासांआधी टीम इंडियाशी संबंधित मोठी बातमी