Weather Update : रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस

weather today

जिल्ह्यात आज दिवसभरात ठिकठिकाणी दमदार पाऊस झाला. चिपळूण, संगमेश्‍वरसह रत्नागिरी तालुक्यात मुसळधार सरी कोसळल्या तर इतर तालुक्यांत हलका पाऊस झाला. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळाला आहे. माजगाव येथे घरावर झाड पडून नुकसान झाले. शनिवारी (ता. १०) सकाळी साडेआठपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी १८ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यात मंडणगड १, दापोली २७, खेड २६, गुहागर ५, चिपळूण ३९, संगमेश्वर ९, रत्नागिरी १७, लांजा ३०, राजापूर ८ मि.मी. पाऊस झाला.(weather today)

गेले दोन दिवस चिपळूण, संगमेश्‍वरसह रत्नागिरी, लांजा तालुक्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडत आहे. शुक्रवारी दुपारनंतर संगमेश्वर, चिपळूणला पावसाने झोडपून काढले. रात्री पावसाचा जोर कमी झाला. शनिवारी दुपारपासून पुन्हा संततधार सुरू राहिली. पावसामुळे विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. काल रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास माजगाव येथे इरफान मुकादम, फिरोज मुकादम यांच्या घरावर हापूसचे कलम पडले. मुकादम कुटुंबीय अर्ध्या झोपेत होते. मोठा आवाज झाल्यानंतर घरातील सगळी लोकं बाहेर धावली. भलेमोठे झाड घरावर कोसळलेले होते. सुदैवाने यामध्ये कुणालाच दुखापत झाली नाही.(weather today)

आतमध्ये मुकादम कुटुंबातील सहाजण होते. यामध्ये घराची एकबाजू पूर्णतः कोसळली असून, एक लाखापर्यंत नुकसान झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. हा प्रकार समजल्यानंतर माजगांवचे सरपंच फय्याज मुकादम यांच्यासह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. तातडीने वीज कर्मचाऱ्यां‍ना बोलावून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मागील आठवड्यात पावसाने पाठ फिरवल्यामुळे भातशेती करपण्याची भीती होती. दिवसा पडणाऱ्या कडकडीत उन्हामुळे शेतकऱ्यांची पंचाईत झाली होती. कातळावरील शेतीला सर्वाधिक फटका बसला असता; परंतु पावसाने जोर धरल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Smart News:-