मंगळसूत्राचं महत्त्व मोदींना कधीपासून कळायला लागलं?

‘‘शेतमालाला भाव मिळत नाही. भाव मिळण्यासाठी आंदोलन (infinity)करणाऱया शेतकऱयांवर बंदुका रोखल्या जातात. अनंत अडचणींचे डोंगर पार करून शिक्षण घेणाऱया तरुणांच्या हाताला काम नाही. अवकाळी, गारपिटीने आमचा बळीराजा मेटाकुटीला आला आहे. पोट भरण्यासाठी अनेक शेतकरी माताभगिनींवर स्वतःचे मंगळसूत्र गहाण ठेवण्याची वेळ आली. पंतप्रधान मोदीजी, डोळे उघडून ही परिस्थिती बघा आणि हिंमत असेल तर या गहाण पडलेल्या मंगळसूत्राबद्दल बोला!’’ अशा कडक शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ठणकावले. मंगळसूत्राचे महत्त्व मोदींना कधीपासून कळायला लागलं, असा खोचक सवालही उद्धव ठाकरे यांनी केला.

हिंगोली मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पाटील-आष्टीकर यांच्या प्रचारासाठी आज हदगाव येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची रणरणत्या उन्हात जंगी सभा झाली. (infinity)उद्धव ठाकरे यांचे सभास्थळी आगमन होताच ‘जय भवानी, जय शिवाजी’चा गगनभेदी गजर झाला. भाषणाला सुरुवात करतानाच उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकेचा आसूड ओढला. पंतप्रधान मोदी यांनी नकली शिवसेना असा शब्द वापरला. भाजपचे असली काय आहे हे मोदी सांगायला विसरले. भ्रष्टाचाऱयांची खोगीर भरती करून फुगलेला भाजप म्हणजे भेकडांचा पक्ष असल्याचे खडे बोल उद्धव ठाकरे यांनी सुनावले.

भाजपच्या हुकूमशाहीची देशात दहशत आहे. अतिशय कठीण काळात साथ देणाऱया शिवसेनेचा सातबारा गद्दारांच्या नावावर करून देण्याचे पाप भाजपने केले. आता पुन्हा भाजप सत्तेत आली तर आपल्या सातबारावर कोणा उपऱयाचे नाव लावतील, अशी भीती शेतकऱयांना सतावते आहे. मोदींच्या हुकूमशाहीला उत्तर द्यायचे असेल तर महाविकास आघाडी हा एकच पर्याय असल्याचेही ते म्हणाले.

शेतमालाला भाव मिळावा म्हणून आंदोलन करणाऱया शेतकऱयांच्या वाटेत खिळे ठोकणारे, सिमेंटच्या भिंती उभारणारे हे सरकार! शेतकरी दिल्लीत येऊ नयेत म्हणून त्यांच्यावर बंदुका रोखण्यात आल्या. कशाची भीती वाटते तुम्हाला? का रस्ता रोखलात शेतकऱयांचा? आता देशभरातील शेतकऱयांनी एकजुटीने भाजपचा सत्तेकडे जाणारा रस्ता रोखावा, नव्हे शेतकऱयांना हा रस्ता रोखावाच लागेल. जर या निवडणुकीत शेतकऱयांनी हे काम केले नाही तर हुकूमशाहीचा शिरकाव झालाच आहे, ती आपल्या मानगुटीवर बसेल, असा स्पष्ट इशारा या वेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.

भाजप हा भेकडांचा पक्ष आहे. भ्रष्टाचाऱयांना अंगाखांद्यावर घेऊन मिरवणारा हा भाजप! 2019च्या निवडणुकीत याच मोदींनी अशोक चव्हाणांवर आदर्श प्रकरणात ‘डीलर’ अशी टीका केली होती. आता त्याच अशोक चव्हाणांचे गुणगान करत आहेत. जेवढा मोठा घोटाळा तेवढे मोठे पद अशी स्कीमच आहे! आदर्श घोटाळा केला, त्यांना राज्यसभा मिळाली. सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा करणाराला उपमुख्यमंत्री पद! मुख्यमंत्री पदाचा घोटाळा तर केवढा मोठा असेल! त्यामुळे आता लोकशाही की हुकूमशाही याचा विचार करण्याची गरज आहे. चारशे पार म्हणजे घटनाबदलाची धोक्याची घंटा आहे. हा धोका वेळीच ओळखा, असे आवाहन या वेळी उद्धव ठाकरे यांनी केले.

या वेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे शिवसेना उपनेते लक्ष्मणराव वडले, माजी खासदार सुभाष वानखेडे, आमदार माधवराव पाटील-जवळगावकर, विधानसभा संपर्कप्रमुख सचिन तराटे-पाटील यांचीही भाषणे झाली.

या सभेला संपर्कप्रमुख बबनराक थोरात, शिकसेना जिल्हाप्रमुख संदेश देशमुख, अजय उैर्फ गोपू पाटील, नांदेडचे जिल्हाप्रमुख प्रमोद खेडकर, माजी मंत्री जयप्रकाश दांडेगाककर, माजी आमदार प्रदीप नाईक, डॉ. संतोष टारफे, किजयराक खडसे, रोहिदास चक्हाण, प्रकाश पाटील-देकसरकर, तातू देशमुख, डॉ. जयप्रकाश मुंदडा, शिकसेनेचे राज्य संघटक एकनाथ पकार, संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे आदींची उपस्थिती होती.

मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्वात प्रथम शेतकऱयांना कर्जमुक्त केले. नियमित कर्जफेड करणाऱया शेतकऱयांना प्रोत्साहनपर म्हणून 50 हजार रुपयांचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला. आता आपले सरकार आले की सर्वात अगोदर राज्यातून गुजरातला पळवण्यात आलेले उद्योग पुन्हा परत आणणार, महागाई कमी करणार तसेच शेतमालाला हमीभाव देणार… ही माझी गॅरंटी आहे! आहे का तुम्हाला विश्वास, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी करताच उपस्थित जनसमुदायाने वज्रमूठ आवळून ग्वाहीच दिली!

हिंगोली जिल्हय़ात गुंडगिरी वाढल्याचा उल्लेख इतर वक्त्यांनी केला होता. तोच धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी गुंडगिरी वाढली आहे आणि ती कशी संपवायची हे हिंगोलीकरांना सांगण्याची गरज नाही. या गुंडगिरीवर नांगर फिरवा, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच टाळय़ांचा कडकडाट झाला.

हेही वाचा :

लतादीदींचा स्वर म्हणजे आत्मा-परमात्म्याला जोडणारी तार!

PM मोदींच्या ‘त्या’ वक्तव्याची निवडणूक आयोगाने घेतली दखल, अडचणी वाढणार?

दारू पिऊन लिव्हर डॅमेज झाल्यास टेन्शन घेऊ नका, डॉ सरीनने घरगुती उपाय