कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : दर बारा वर्षानंतर नाशिक येथील कुंभ मेळा येतो. आता त्याचे नाशिक त्र्यंबक कुंभमेळा असे नामकरण करण्यात येणार असून आणखी दोन वर्षानंतर होणाऱ्या या कुंभमेळ्यासाठी राज्य शासनाने अकराशे कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर त्याचे सादरीकरण करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर तब्बल अकरा वर्षांपूर्वी जाहीर करण्यात आलेल्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर(Temple) परिसर विकास आराखड्याला मुहूर्त कधी लागणार? या संदर्भात जिल्ह्याचे दोन्ही खासदार आणि बारा आमदार आवाज का उठवत नाहीत? असा आता संतप्त सवाल सर्वसामान्य जनतेकडून व्यक्त करण्यात येऊ लागला आहे.

नाशिक येथे दर बारा वर्षांनी कुंभमेळा आयोजित केला जातो. प्रत्येक कुंभमेळ्याच्या वेळी केंद्र आणि राज्य शासनाकडून शेकडो कोटी रुपयांचा निधी त्यासाठी उपलब्ध करून दिला जातो. यंदाही अकराशे कोटी रुपये त्यासाठी खर्च केले जाणार आहेत. त्याला कुणाचेही हरकत असण्याचे कारण नाही. पण अशाच प्रकारचा विकास आराखडा अकरा वर्षांपूर्वी तत्कालीन महसूल मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर केला होता. आणि आतापर्यंत 80 कोटी रुपयांच्या पुढे निधी शासनाकडून उपलब्ध झालेला नाही. मिळालेला निधी नेमका कशावर खर्च करण्यात आलेला आहे हे सुद्धा कळावयास मार्ग नाही.
एकूण विचार केला तर करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर(Temple) परिसर विकास आराखडा एक इंचानेही पुढे गेलेला आहे असे कोणीही म्हणणार नाही. मंदिर परिसर विकास आराखड्यासाठी जवळपास 400 मिळकती शंभर टक्के, 50% आणि अंशतः बाधित होणार आहेत. बाधित होणाऱ्या मिळकतींचे सर्वेक्षण दहा वर्षांपूर्वीच करण्यात आलेले आहे आणि आत्तापर्यंत एकही घर तहसीलदारांच्याकडून संपादित करण्यात आलेले नाही.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कडून अधून मधून संबंधितांच्या बैठका घेतल्या जातात. त्यात काही निर्णय सुद्धा होतात पण त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्यात बाधित होणाऱ्या मिळकती काही जणांनी देण्यास सशर्त तयारी दाखवलेली आहे. जे आपल्या मिळकती देण्यास तयार आहेत त्यांच्या तरी मिळकती संपादित करणे आवश्यक आहे. तथापि मिळकती संपादनाचे कामही अद्याप सुरू झालेले नाही.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर हे दहशतवादी संघटनांच्या हिट लिस्ट वर आहे. त्यामुळे दरवर्षी केंद्रीय सुरक्षा पथक कोल्हापुरात येते. मंदिर सुरक्षिततेची माहिती घेते. नव्याने काही सूचना केल्या जातात. मंदिराची सुरक्षितता केंद्रस्थानी ठेवून हा परिसर विकसित केला जाणार आहे.
सरासरी दररोज किमान 50 हजार धार्मिक पर्यटक करवीर निवासिनी अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरात येत असतात. त्यांना आवश्यक असलेल्या सोयी सुविधा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीकडून तसेच महापालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जात नाहीत. इथे येणाऱ्या धार्मिक पर्यटकांना कार पार्किंग सह इतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे.
मंदिरा(Temple) भोवतालचे रस्ते चांगले नाहीत. विशेषतः घाटी दरवाजा समोरचा रस्ता अतिशय खराब आहे. मंदिर परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते भवानी मंडप पर्यंतचा भाऊसिंगजी रोड सर्विस लाईन साठी खोदण्यात आला होता. त्याची फक्त सध्या डागडूजी करण्यात आली आहे. पुढील महिन्यात करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सव आहे. पण हा रथ जेथून जातो तेथील रस्त्याची अवस्था दयनीय आहे.
जाहीर करण्यात आलेल्या विकास आराखड्याच्या माध्यमातून भवानी मंडप परिसराचे सुशोभीकरण केले जाणार आहे. सध्या हा आतील परिसर दुकानदारांच्या टपऱ्यांनी वेढलेला आहे. हा परिसरही स्वच्छ केला जात नाही.
मंदिर परिसर विकास आराखडा पूर्ण झाल्यानंतर करवीर निवासिनी चे मंदिर हे नेमके कसे दिसणार आहे याचे लँडस्केप अतिशय मनोहारी आहे. पण सध्या तरी हे चित्र साध्या कागदावर आहे.
नाशिक येथे ब्रम्हा विष्णू महेश यांचे एकत्रित शिवलिंग आहे. त्यामुळे नाशिकला एक प्रकारचे धार्मिक अधिष्ठान आहे. त्यामुळे कुंभमेळ्याच्या निमित्ताने दर बारा वर्षानंतर का होईना केंद्राकडून आणि राज्य शासनाकडून या शहराला शेकडो कोटी रुपयांचा निधी मिळत असतो.
त्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वर्षानंतर येणाऱ्या कुंभमेळ्याच्या आयोजना संदर्भात आणि नियोजित आराखड्याच्या संदर्भात बैठक घेतली. येत्या दोन वर्षात नाशिकचा आणखी एक विकास आराखडा पूर्ण केला जाणार आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखड्याच्या संदर्भात कोल्हापूरच्या सर्वसामान्य जनतेला ठोस असे काही सांगितले पाहिजे. कोल्हापूरची विकास विषयक चारही बाजूने कोंडी होत आहे. ही कोंडी फोडण्यासाठी कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी आवाज ठेवणे गरजेचे आहे
हेही वाचा :
दररोज फक्त ₹७ गुंतवा अन् महिन्याला ५००० रुपयांची पेन्शन मिळवा
हरभजन सिंग पुरता फसला? आर्चरला काय बोलून गेला
रस्ता क्रॉस करण्याची घाई नडली! रस्ता ओलांडताना तरुणीला वाहनाचा बसला जबर धक्का video viral