कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सकल मराठा(Maratha) समाजाला ओबीसींच्या सवलती मिळाल्या पाहिजेत. ही मागणी केंद्रस्थानी ठेवून रविवारी कोल्हापुरात मराठा समाज परिषद पार पडली. या परिषदेसाठी राज्यभरातून मराठा समाजाच्या 42 संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. सरकारशी दोन हात करण्याऐवजी सुसंवादाचे माध्यम वापरण्याचा निर्णय या परिषदेने घेतला.

आता मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या समवेत मराठा परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा परिषदेची ही भूमिका काहीशी मवाळ आहे, संयत आहे. आणि म्हणूनच जहाल भाषा वापरणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना या परिषदेपासून दूर ठेवण्याचा परिषद आयोजकांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. तथापि समस्त मराठा समाज आज तरी मनोज जरांगे पाटील यांच्या मागे असल्याचे चित्र आहे. ही परिषद म्हणजे जरांगे पाटील यांचे महत्त्व कमी करण्याच्या प्रयत्नचा एक भाग समजला जातो.
एक मराठा(Maratha) लाख मराठा अशी टॅग लाईन घेऊन मराठा समाजाने महाराष्ट्रात विराट मूक मोर्चे यापूर्वी अनेक जिल्ह्यांमध्ये काढले होते. त्यानंतर नारायण राणे समितीच्या शिफारसी नुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले होते मात्र हे आरक्षण न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर अडीच वर्षांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून सकल मराठा समाजाला आक्रमक नेतृत्व लाभले. मनोज जरांगे पाटील यांनी उभा केलेल्या आंदोलनामध्ये महाराष्ट्रातील समस्त मराठा समाज उतरला होता. आंदोलनाने एक प्रकारचा झंजावात निर्माण केला होता.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा समाजाला कुणबी म्हणून दाखला देण्याबद्दलची अधिसूचना जारी केली. ज्यांच्याकडे कुणबी म्हणून दाखला आहे त्यांच्या सध्या सोयऱ्यांना त्यांच्याकडे पुरावा न मागता कुणबी म्हणून प्रमाणपत्र किंवा दाखला देण्यात यावा अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. राज्यपालांच्या अधिसूचनेवर हरकती आणि सूचना लाखाच्या पटीत आल्या होत्या. या हरकतींवर सुनावणी झालेली नाही त्यामुळे ही अधिसूचना काढूनही नसल्यासारखी आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मराठा(Maratha) आरक्षण प्रश्नावर राज्यभर रान पेटवले होते. त्यांनी आपल्या भूमिकेत अनेकदा बदल केले. आमरण उपोषण सुरू करायचे, आता माघार घेणार नाही म्हणायचे आणि ठराविक दिवसानंतर आपले आमरण उपोषण स्थगित करायचे. सरकारला पुन्हा मुदत द्यायची आणि पुन्हा उपोषण सुरू करायचे. अशी धरसोड भूमिका त्यांनी वेळोवेळी घेतली. निवडणूक लढवायची आणि विद्यमान लोकप्रतिनिधींना पराभूत करायचे असा निर्णय घेऊन त्यांनी मुस्लिमांना बरोबर घेऊन सोशल इंजिनियरिंग चा प्रयोग करण्याचा घाट घातला होता. पण अचानक त्यांनी निवडणुकीच्या आखाड्यातून माघार घेतली. गेल्या महिन्यात त्यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले आणि ते एकतर्फी मागे घेऊन येथून पुढे आमरण उपोषण करण्याऐवजी रस्त्यावर उतरून थेट लढा देण्याची भूमिका त्यांनी जाहीर केली.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागे महाराष्ट्रातील सकल मराठा समाज एकवटला होता. तेव्हा मराठा समाजाच्या संघटना कुठे दिसत नव्हत्या. मनोज जरांगे पाटील हीच प्रमुख आणि मुख्य संघटना असल्याचे मानले गेले. त्यामुळे इतर मराठा संघटनांचे अस्तित्वच दिसून येत नव्हते. गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांचा आंदोलनातील टीआरपी कमी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर मराठा समाजातील 42 संघटना अचानक कार्यप्रवण झाल्या आहेत. त्यांनी मग मनोज जरांगे पाटील यांना वगळून कोल्हापुरात रविवारी मराठा परिषद घेतली. या परिषदेत मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे अशी थेट मागणी करण्यात आलेली नाही.
ओबीसींना दिल्या जाणाऱ्या सवलती मराठा समाजाला मिळाव्यात अशी मागणी या परिषदेच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आली आहे. याशिवाय छत्रपती शिवरायांचे समुद्रातील स्मारक तातडीने पूर्ण करावे, यासह 15 मागण्या ठरावाच्या माध्यमातून सरकारकडे करण्यात आल्या आहेत.
मराठा(Maratha) आरक्षणासाठी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मराठा परिषद घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी
एक आक्रमक नेता म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण मराठा समाज त्यांच्या मागे उभा आहे असे सध्याचे तरी चित्र आहे. या संपूर्ण मराठा समाजाला 42 संघटनांच्या झेंड्याखाली एकत्र आणण्याचा मराठा परिषदेचा हेतू आहे.
तथापि या संघटनांनी सर्व संघटनांचे एकत्रीकरण करून मराठ्यांचा हा लढा पुढे नेला पाहिजे. विशेष म्हणजे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मनोज जरांगे पाटील यांनाही विश्वासात घ्यावे लागेल. त्यांची समजूत काढावी लागेल. मनोज जरांगे पाटील यांनीही आपल्या भूमिकेत बदल केले पाहिजेत. धरसोड वृत्ती सोडून दिली पाहिजे. न्यायालयात जाऊन, शासनाशी संवाद साधून, आणि रस्त्यावर उतरून अशा तिहेरी मार्गाने मराठा आरक्षणाचा प्रश्न पुढे नेला पाहिजे. सध्या तरी रविवारी झालेल्या कोल्हापुरातील मराठा परिषदेमुळे मराठा समाजामध्येच फूट पडल्याचे दुर्दैवी चित्र समोर आलेले आहे.
हेही वाचा :
प्रचंड वेगात लाट आली अन्…! खवळलेल्या सागरात भली-मोठी बोट झाली पलटी Video Viral
सांगलीतील धक्कादायक घटना : रक्ताच्या उलट्या झाल्याने बर्फ गोळा विक्रेत्याचा मृत्यू;
माता न तू वैरिणी! आईने केली १७ वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या, आजीने लावली मृतदेहाची विल्हेवाट