जयंत पाटलांचा पत्ता कट होणार? राष्ट्रवादी हालचालींना वेग

मुंबई: नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला(political news) मोठा फटका बसला असून, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाला गंभीर धक्का सहन करावा लागला आहे. या पराभवाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी पक्षाने हालचाली सुरू केल्या आहेत. पराभूत उमेदवार आणि जिल्हास्तरीय नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक येत्या 9 जानेवारीला मुंबईत होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार(political news) यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक होणार आहे. या बैठकीत विधानसभा निवडणुकीतील पराभवाचा सविस्तर आढावा घेतला जाणार आहे. पक्षांतर्गत नाराजी, उमेदवारीच्या वाटपावर झालेल्या तक्रारी आणि आगामी राजकीय रणनीती यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.

शरद पवार यांच्या पक्षात, गेल्या काही दिवसांपासून काही आलबेल नसल्याच्या चर्चा सुरू आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावरही अनेकांची नाराजी आहे. त्यामुळे पक्षाच्या काही प्रमुख नेत्यांनी विधानसभा निवडणुकीतील अपयशासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना जबाबदार धरले आहे. उमेदवारांच्या निवड प्रक्रियेमध्ये स्थानिक नेत्यांच्या सूचना दुर्लक्षित केल्याचा आरोप होत आहे. निवड समितीकडून आलेल्या काही नावांवर फुली मारल्यामुळे नाराजी वाढली आहे.

विशेषतः नाशिक जिल्ह्यात, जिथे पक्षाचे पूर्वी सहा आमदार होते, तिथे फक्त पाच जागांवर उमेदवार उभे करण्यात आले. सामाजिक समतोल राखण्यातही त्रुटी राहिल्याचा आरोप नेत्यांनी केला आहे. देवळालीसारख्या मतदारसंघात पक्षाने चांगली तयारी केलेली असतानाही ती जागा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाला सोडल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

9 जानेवारीच्या बैठकीत जयंत पाटील यांच्यावर पराभवासाठी जबाबदारी टाकली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. पराभूत उमेदवार आणि उमेदवारीला डावललेले नेते आपली नाराजी व्यक्त करू शकतात. तसेच, पक्षाचे भविष्यातील धोरण आणि महाविकास आघाडीसोबतच्या सहकार्याबाबतही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षाच्या राजकीय दबावामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला काही महत्त्वाच्या जागांवर माघार घ्यावी लागल्याचा आरोपही केला जात आहे. यासंदर्भात खासदार संजय राऊत यांच्या दबाव तंत्रामुळे पक्षाला अडचणीत आल्याची चर्चा आहे. मुंबईत होणारी ही बैठक पक्षासाठी भविष्यातील दिशादर्शन ठरेल, असे मानले जात आहे.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाने १० जागांवर लढत ८ जागांवर विजय मिळवला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश मिळालं नाही. पवार गटाने ८६ जागांवर उमेदवार उभे केले होते, पण फक्त १० जागांवरच विजय मिळवता आला. विधानसभा निवडणुकीतील या अपयशामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटात राजकीय हालचालींना वेग आला आहे, आणि प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या शक्यतेची चर्चा सुरु आहे.

येत्या ९ जानेवारीला मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे राष्ट्रवादी शरद पवार गटाची एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जागी नवीन चेहऱ्याला संधी दिली जाऊ शकते. जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिट लक्षात न घेता तिकीट वाटप केल्याचा आरोप पक्षातील काही सदस्यांनी केला आहे.

याशिवाय, जयंत पाटील महायुतीत सामील होणार असल्याचे दावेही केले जात आहेत. त्यामुळे गटात सुरू असलेल्या नेतृत्व बदलाच्या हालचाली पाहता, पक्षात सर्व काही सुरळीत नसल्याचे दिसून येत आहे. पक्षात संभाव्य फूट टाळण्यासाठीच जयंत पाटील यांची गच्छंती होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. ९ जानेवारीच्या बैठकीत नेमका काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

हश मनी प्रकरणात ट्रम्प जाणार तुरुंगात: जाणून घ्या अमेरिकन कोर्टाने काय म्हटले?

BSNL ची ही सेवा लवकरच होणार बंद, लाखो युजर्सवर परिणाम!

शाहरुखनं लग्नाच्या 33 वर्षांनी मक्केला जात गौरी खानचं धर्मपरिवर्तन केलं? Viral Photo मुळे खळबळ