‘असल्या ट्रोलर्सवर कडक कारवाई…’, प्रसिद्ध दिग्दर्शकाने चिन्मयसाठी महाराष्ट्र सरकारकडे केली मागणी…

मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे अभिनेता चिन्मय मांडलेकरला (Chinmay Mandlekar) मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगला समोरं जावं लागलं. त्यानंतर चिन्मयने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका न करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सोशल मीडियासह मराठी सिनेसृष्टीचं वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळालं. अनेक कलाकारांनी पोस्ट करत चिन्मयला झालेल्या ट्रोलिंगच्या त्रासाचा तीव्र निषेध केला. त्याचप्रमाणे त्यांनी चिन्मयला त्याचा निर्णय मागे घेण्याची देखील विनंती केली. त्यानंतर आता एका प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने देखील चिन्मयसाठी पोस्ट करत महाराष्ट्र सरकारकडेच विशेष मागणी केली आहे.

दिग्दर्शक रवी जाधव यांनी चिन्मय मांडलेकरचा व्हिडिओ शेअर करत, त्याला झालेल्या ट्रोलिंगच्या त्रासावर तीव्र संताप देखील व्यक्त केला आहे. चिन्मयने मुलाचं नाव जहांगीर ठेवलं तेव्हा अनेकांनी कौतुक केलं होतं, तेव्हाही अनेकांनी टीका देखील केली होती. पण चिन्मयने महाराजांची भूमिका साकारल्यानंतर हे ट्रोलिंग मोठ्या प्रमाणात होऊ लागलं. अनेकांनी त्याला पाकिस्तानात जाण्याचा देखील सल्ला दिला. त्यावर अभिनेत्याच्या बायकोने व्हिडिओ करत त्यावर चोख उत्तर दिलं.

दिग्दर्शकाने महाराष्ट्र सरकारकडे केली विशेष मागणी
रवी जाधव यांनी चिन्मयचा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर ठेवला आहे. यावर त्यांनी म्हटलं की, चिन्मय आणि नेहा आम्ही सर्व सदैव आपल्या कुटुंबासोबत आहेत. असल्या ट्रोलर्सवर कडक कारवाई करण्याची विनंती मी भारतीय सायबर सेल तसेच महाराष्ट्र सरकारकडे करतो. चिन्मय आपण आपला निर्णय मागे घ्यावा ही नम्र विनंती.

अभिनेत्री गौतमी देशपांडे, दिग्दर्शक सुहृद गोडबोले, अभिनेता अक्षय वाघमारे, दिग्दर्शक समीर विद्वंस, सिद्धार्थ चांदेकर यांनी संताप व्यक्त केल्याचं पाहायला मिळतंय. चिन्मयने शेअर केलेला व्हिडिओ रिशेअर करत या कलाकार मंडळींनी चिन्मयसाठी पाठिंबा दर्शवला आहे. सध्या सोशल मीडियावर चिन्मयच्या या व्हिडिओची बरीच चर्चा आहे.

ट्रोलर्सना महाराजांच्या विचारांशी काहीही घेणंदेणं नाही – समीर विद्वंस
दिग्दर्शक समीर विद्वंसने म्हटलं की, ‘हे खूप जास्त दुर्दैवी आहे. आम्ही सगळे तू नेहा आणि जहांगीरच्या बरोबर आहोत. एक नक्की आहे की, महाराजांचं नाव घेऊन इतकं भयानक आणि वाट्टेल तसं बोलणाऱ्या ट्रोलर्सना महाराजांच्या विचारांशी आणि शिकवणीशी काहीही देणंघेणं नाही. त्यांना ते माहित असतील असंही नाही. चिन्मय एक मित्र म्हणून, कलाकार म्हणून विनंती करतो की हा निर्णय मागे घे आणि ज्या श्रद्धेने तू महाराजांची भूमिका करतोस ती करत रहा!’