राज्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत(Yojana) मोठे बदल करण्यात आले आहेत. या बदलाबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे, ज्यामुळे महिलांना अर्ज करताना आता लाईव्ह फोटो देण्याची गरज भासणार नाही. या निर्णयानुसार अर्ज प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी आणखी काही महत्त्वाचे बदलही करण्यात आले आहेत.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची(Yojana) अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेने व्हावी यासाठी 13 जुलै रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या योजनेच्या नव्या अटींमध्ये लाईव्ह फोटोसंदर्भात मोठा बदल करण्यात आला आहे. आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
नवविवाहित महिलांसाठी, त्यांच्या पतीचे रेशनकार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येईल. परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील अधिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर विवाह केला असल्यास त्यांच्या पतीचे जन्म दाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, अधिवास प्रमाणपत्र, १५ वर्षापूर्वीचे रेशनकार्ड आणि मतदान कार्ड ग्राह्य धरण्यात येणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात येईल. नागरी आणि ग्रामीण भागातील बालवाडी सेविका, अंगणवाडी सेविका, NULM यांचे समूह संघटक, मदत कक्ष प्रमुख, CMM, आशा सेविका, सेतू सुविधा केंद्र, आणि आपले सरकार सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.
अर्ज भरण्याची मुदत 31 ऑगस्ट 2024 पर्यंत वाढविण्यात आली असून, लाभार्थी महिलांना 01 जुलै 2024 पासून दर महिना रु.1500/- आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. वयोगटाची मर्यादा 21 ते 65 वर्षे करण्यात आली असून, 5 एकर जमिनीबाबतची अट काढून टाकण्यात आली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या या नव्या बदलांमुळे महिलांना अर्ज प्रक्रिया सुलभ झाली असून, लाभ घेण्यास अधिक सोयीस्कर होणार आहे.
हेही वाचा :
विधान परिषदेची निवडणूक बळी गेला जयंत पाटलांचा
गणेशोत्सव गोड होणार! शिंदे सरकारकडून मिळणार ५६० कोटींचा आनंदाचा शिधा
एमएस धोनीचं बाईक प्रेम! लाखोंच्या बाईक अन् कोट्यवधींच्या कार