हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये पंचरंगी(division) लढत निश्चित आहे. महाविकास आघाडीकडून माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून माजी खासदार राजू शेट्टी, महायुतीकडून खासदार धैर्यशील माने, वंचित बहुजन आघाडी कडून डी.सी पाटील आणि शेतकरी संघटनेचे रघुनाथ पाटीलअसे पाच उमेदवार रिंगणात आहेत. मागील लोकसभा निवडणुकीत मत विभाजनाचा फॅक्टर सेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या पथ्यावर पडला होता. आता तोच फॅक्टर इथे महत्त्वाचा होण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीला स्वाभिमानी शेतकरी(division) संघटनेचा धसका आहे. स्वाभिमानीला रघुनाथ पाटील, रयत क्रांतीचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा; धैर्यशील मानेंना, सत्यजित पाटील-सरूडकर यांचा धसका आहे. वंचित बहुजन आघाडीचे निर्णय मत, या सर्वांचा कौल सांगून जाणारा आहे. हीच परिस्थिती सध्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आहे.
हातकणंगले मतदारसंघात हातकणंगले, शाहूवाडी, इचलकरंजी व शिरोळ तर सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर व शिराळा अशा सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. शाहूवाडीत जनसुराज्यचे विनय कोरे, हातकणंगलेत काँग्रेसचे राजू अवाळे, इचलकरंजीत प्रकाश आवाडे (अपक्ष), शिरोळमध्ये राजेंद्र पाटील-यड्रावकर (अपक्ष), इस्लामपूरमध्ये जयंत पाटील (राष्ट्रवादी), शिराळ्यात मानसिंग नाईक (राष्ट्रवादी) हे आमदार आहेत.
हातकणंगलेची निवडणूक ही आजपर्यंततरी दुरंगी स्वरूपाची झाली होती. यामुळे निवडणुकीचे आडाखे बांधणे सोपे होते. यावेळी मात्र वाढलेले दिग्गज उमेदवार राजकीय विश्लेषकांना देखील विचार करायला भाग पाडत आहेत. सध्या कोण-कोणाबरोबर, आतून कोणाचा पाठिंबा आणि जाहीर पाठिंबा कोण कोणाला देणार यावरून मतांची गोळा बेरीज करण्यात अनेक जण व्यस्त आहेत. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर लढतीचे चित्र स्पष्ट होईल.
आजी-माजी आमदार, खासदार आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशा दिग्गज प्रमुख चार जणांच्या लढतीमुळे हातकणंगले लोकसभामतदार संघात कमालीची उत्कंठा आणि चुरस निर्माण झाली आहे. नाट्यमय घडामोडींमुळे मतांच्या आकडेमोडीत सातत्याने होणारे बदल, देश पातळीवर शेतकरी चळवळीच्या माध्यमातून राजू शेट्टी यांच्या रूपाने पुढे आलेले नेतृत्व आणि यावेळी एकाकी झुंज देण्याची आलेली वेळ, बहुतांश पक्षांमध्ये अंतर्गत नाराजी, उमेदवारीवरून नाराजीनाट्य, अशा अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघाची निवडणूक उमेदवारांची सत्त्वपरीक्षा पाहणारी ठरेल.
हातकणंगलेत नेमका हाच उमेदवार विजयी(division) होईल, असे सांगणे मोठे धाडसाचे होणार आहे. विद्यमान खासदार धैर्यशील माने, माजी खासदार राजू शेट्टी, माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांच्यामुळे निवडणूक चुरशीची होणार हे स्पष्ट झाले आहे.
नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने रणनीति निश्चित केली आहे. केंद्र सरकारच्या विकासाच्या मुद्द्यावरच मतदारसंघात ठळकपणे प्रचार होत आहे. तर, मतदारसंघ ऊस पटट्यात येत असल्याने ऊसदरासंदर्भात केंद्र आणि राज्याची शेतकरी विरोधी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टींकडून ठासून सांगितली जात आहे.
कारखानदार एकत्र आले असून शेतकरी आपल्याबरोबर असल्याचे शेट्टी सांगत थेट केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांवर बोट ठेवत आहेत. सहा विधानसभा मतदारसंघांचा हातकणंगले लोकसभा हा एक मतदारसंघ आहे. मतदारसंघात इचलकरंजी सर्वात मोठे शहर आहे. शहराच्या मतांवर सर्वच पक्षांचा डोळा आहे.
इचलकरंजीच्या पाणी प्रश्नावरुन उमेदवारांनी सावध भूमिका घेतली आहे. इचलकरंजीसारख्या मोठ्या शहरात नेत्यांच्या सभा घेण्याचे नियोजन स्थानिक पातळीवर सुरू आहे. एकूणच दिग्गज नेत्यांच्या सहभागामुळे हातकणंगलेची निवडणूक रंगतदार होणार आहे, हे स्पष्ट असले तरी निकालावरून राजकीय विश्लेषक ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत.
प्रकाश आवाडे यांनी उमेदवारी जाहीर करून बंडखोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्री शिंदे यांनी रातोरात आवाडेंचं बंड थंड केलं. आता सर्वजण सोबत लढणार आहेत. पण, शेवटच्या दिवसापर्यंत हा ‘टेम्पो’ ठेवणे महायुतीला कठीण आहे. हातकणंगलेमध्ये उमेदवारांची वाढती संख्या, अंतर्गत हेवेदावे, गटबाजी, पर्यायी उमेदवार आणि विधानसभेच्या निवडणुकीची आखणी या पार्श्वभूमीवर मतविभागणीचा धोका निर्माण झाला आहे. मतविभागणी कशा पद्धतीने होणार यावर निकालाचे चित्र अवलंबून असेल.
हेही वाचा :
उमेदवारांच्या संपत्तीची कोटीच्या कोटी उड्डाणे….!
मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होणार? ‘कचा-कचा’ वक्तव्य भोवणार
अभिनेत्रीचा अपघात; तुटली हाताची दोन हाडं, पतीने सोशल मीडियाद्वारे दिली माहिती