दिवार चित्रपटाचे डायलॉग आणि अशी ही बनवाबनवी!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : अमिताभ बच्चन यांचा “दिवार”हा चा चित्रपट(film) चाळीस वर्षांपूर्वी रजत पटावर धुमाकूळ घालून गेला. महाराष्ट्रातील बहुतांशी राजकारण्यांनी, नेत्यांनी तो पाहिला असावा. आणि तो त्यांना भलताच आवडलेला असावा. बऱ्याच जणांना त्यातील डायलॉग तोंडपाठ असावेत. महाराष्ट्रातील राजकारणात सध्या त्या डायलॉगची डिलिव्हरी करून राजकीय”टायमिंग”साधले जात आहे. सर्वसामान्य जनतेला मात्र”अशी ही बनवाबनवी”या गाजलेल्या मराठी चित्रपटाची आठवण येते आहे.

शिवसेनेच्या प्रियांका चतुर्वेदी यांनी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर निशाणा साधताना दिवार चित्रपटाची(film) आठवण ताजी केली आहे. नायकाच्या हातावर”मेरा बाप चोर है”असे गोंदलेले असते. तसे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कपाळावर”मेरा बाप गद्दार है” अशी अक्षरे दिसतात. इतकी जहाल टीका प्रियांका चतुर्वेदी यांनी केली आहे. डावोस येथील गुलाबी थंडीत काय दिवे लावले हे मी सांगितले तर तोंड दाखवायला जागा उरणार नाही अशी सरळ सरळ धमकीच त्यांनी श्रीकांत शिंदे यांना दिल्यानंतर त्याचे पडसाद प्रतिक्रियांच्या माध्यमातून उमटले नाही तरच नवल.

एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्यावर जहाल टीका केल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी प्रियांका चतुर्वेदी यांना उद्देशून कडक भाषेत फटकारले आहे. तुम्ही बाई माणूस आहे म्हणून गप्प बसतो, तुमच्याबद्दलही भरपूर काही बोलता येते, पण आम्ही तसे करणार नाही. कारण ती आमची संस्कृती नाही असे शिरसाट यांनी म्हटले आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी सुद्धा या वादात उडी घेऊन प्रियंका चतुर्वेदी यांना तुमचे कोणतेही काम नसताना तुम्ही डावसला कशासाठी गेला होता, तिथल्या गुलाबी थंडीत तुम्ही काय काय केले हे सुद्धा तुम्हीच स्वतःहून लोकांना सांगा असे आव्हान दिले आहे.

दिवार चित्रपटाचे डायलॉग आणि अशी ही बनवाबनवी!

प्रियांका चतुर्वेदी ह्या शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार आहेत. त्यांच्याकडून टीका अपेक्षित आहे पण ती इतकी जहाल पातळीवरची नाही. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल बोलताना त्यांनी तारतम्य आवश्यक होते. आता प्रियांका चतुर्वेदी ज्या काही बोलल्या त्यात चुकीचे काय आहे असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित करून खालच्या पातळीवरील टीकेला त्यांनी समर्थन दिले आहे. त्या तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याबद्दल बोलतात, मी तर थेट पंतप्रधानांच्यावर बोलतो असे त्यांना सुचित करावयाचे असावे.

देशाचे पंतप्रधान, राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्या विषयी त्यांचा अपमान किंवा उपमर्द होईल असे बोलू नये असे संकेत आहेत. पण गेल्या दोन-तीन वर्षांपासून हे संकेत टाचेखाली घेतले जाऊ लागले आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी काटेवाडी या गावात अजित दादा पवार यांच्या घरात जाऊन त्यांच्या मातोश्री श्रीमती आशा ताई त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर तिथेही “मेरे पास मॉ है”हा दिवार चित्रपटातील डायलॉग अजित दादा पवार यांनी जाहीर रित्या बोलून दाखवला आहे. सर्वसामान्य जनतेचे सुदैव इतकेच की या राजकारण्यांनी अजून तरी महाराष्ट्रातल्या राजकारणात शोले चित्रपटातील गब्बर पुढे आणलेला नाही.

पंचवीस तीस वर्षांपूर्वी सचिन पिळगावकर यांचा”अशी ही बनवाबनवी”हा चित्रपट कमालीचा गाजला होता. सर्वसामान्य जनतेला या चित्रपटाची गेल्या चार-पाच वर्षांपासून पुन्हा आठवण येऊ लागली आहे. शरद पवार यांनी आम्ही विधानसभेत विरोधी बाकड्यावर बसू असे जाहीरपणे सांगून महाविकास आघाडीचे सत्ता स्थापन केली. ज्यांच्याशी शिवसेनेचे कधी जमले नाही त्यांच्याशी जमवून घेऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले.

अजितदादा पवार यांनी कधीही भारतीय जनता पक्षाचे नाव घेतले नाही. कमळाबाई असाच ते उल्लेख करत होते. आता मात्र नरेंद्र मोदी हे त्यांचे दैवत बनले आहेत. छगन भुजबळ हे तर नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करत असत. आता नरेंद्र मोदी यांच्या हातात देश सुरक्षित आहे अशी भाषा त्यांच्याकडून ऐकायला मिळते आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देणारे शरद पवार हे आता त्याच देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू लागले आहेत. अजित दादा पवार यांना कधीही आम्ही थारा देणार नाही असे मोठ्या आवाजात बोलणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अजितदादांचा गौरव सुरू आहे.

संजय राऊत, राज ठाकरे, नारायण राणे, नितेश राणे, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, प्रवीण दरेकर, प्रकाश आंबेडकर, दीपक केसरकर, उदय सामंत अशा सर्वच राजकारण्यांनी राजकारणात सोयीस्कर भूमिका घेतल्या आहेत. हे नेते पूर्वी काय बोलत होते आणि आता ते काय बोलतात याचे व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. सर्वसामान्य लोकांना कायम गृहीत धरून, त्यांच्यासमोरच या मंडळींची “अशी ही बनवाबनवी”सुरू आहे.

हेही वाचा :

कोल्हापूर जिल्ह्यात गारपिटीसह अवकाळी पावसाचा इशारा

भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? समोर आलं चिंता वाढवणारं कारण

इचलकरंजीत निवडणुकीनंतर पैजांवर पैजा : कोणी पैसे लावते तर कोणी वाहनांची पैज