संभ्रम निर्माण करणारे पंतप्रधानांचे वक्तव्य…!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी(modi) यांचे महाराष्ट्रात अनेक दौरे झाले आहेत. चौथ्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी नंदुरबार येथे त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना एनडीए मध्ये येण्याचे आवाहन केले आहे. त्यांचे हे आवाहन संभ्रम निर्माण करणारे असल्याने त्यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

प्रसार माध्यमांनी पंतप्रधानांच्या(modi) भाषणाचा विपर्यास केला असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. चारच दिवसांपूर्वी शरद पवार यांनी नजीकच्या काळात काही प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होतील असे भाकीत केले होते. त्यांनी आमच्या विचारांशी शिवसेनेचे विचार मिळते जुळते असल्याचे सांगून शिवसेना सुद्धा काँग्रेसमध्ये विलीन होईल असे संभ्रमाचे वातावरण तयार केले होते.

हाच धागा पकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षामध्ये विलीन कशाला होता, एन डी ए मध्ये या तुमची विकासाची स्वप्ने आम्ही पूर्ण करू असे सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल असे वक्तव्य त्यांनी नंदुरबार येथे केले. पंतप्रधानांच्या या आवाहनाचा उद्धव ठाकरे यांनी कडक शब्दात समाचार घेतला असून पंतप्रधान हे पराभवाच्या भीतीने खचले आहेत, म्हणून ते आम्हाला डोळा मारत आहेत पण आम्ही कदापिही त्यांच्या एनडीए मध्ये जाणार नाही. कारण त्यांनी मला नकली संतान अशा शब्दात छेडले आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना आमच्याकडे या असे केलेले आवाहन सर्वसामान्य जनतेला चक्रावून टाकणारे ठरले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ज्या ज्या वेळी महाराष्ट्रात आले त्यावेळी त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना टार्गेट केले आहे. नकली शिवसेना आणि कौटुंबिक कलहातून फुटलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना मोठे करावयाचे आहे अशी टीका त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी बोलताना केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडण्यापूर्वी आधी आठ दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भोपाळ येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषण झाले होते. त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नॅचरल करप्ट पार्टी असे म्हटले होते. 70000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर अवघ्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित दादा पवार हे भाजप बरोबर गेले. ज्यांच्यावर 70 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप होता त्या अजितदादा पवार यांना भाजपच्या बरोबर कसे काय घेतले असा प्रश्न तेव्हा अनेकांनी उपस्थित केला होता. पंतप्रधानांची ही कृती संभ्रम निर्माण करणारी होती.

आता ज्या पक्षाला नरेंद्र मोदी हे करप्ट पार्टी म्हणत होते त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला एन डी ए मध्ये येण्याचे त्यांनी केलेले आवाहन म्हणूनच संभ्रम निर्माण करणारे आहे. जो पक्ष भ्रष्टाचारी आहे त्याच पक्षाला आमंत्रण कसे काय दिले जाते असा सवाल त्यानिमित्ताने उपस्थित केला जातो आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला नकली शिवसेना असे जाहीरपणे विशेषण लावणारे नरेंद्र मोदी हे याच नकली सेनेला एनडीए मध्ये येण्याचे आवाहन कसं काय करतात?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच केवळ संभ्रम निर्माण करतात असे नाही तर भारतीय जनता पक्षाच्या अनेक नेत्यांकडून अशाच प्रकारची संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य यापूर्वी झालेली आहेत. रावसाहेब दानवे हे केंद्रीय मंत्री आहेत. त्यांनी त्यांच्या प्रचार सभेत संविधानापेक्षा कुराण श्रेष्ठ असल्याचे वक्तव्य करून ऐकणाऱ्यांनाच संभ्रमित करून सोडले होते. देवेंद्र फडणवीस हे तर अजित दादा पवार यांना आमच्या जवळपासही फिरकू देणार नाही असे वारंवार म्हणत होते. प्रत्यक्षात मात्र त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडून अजितदादा पवार यांना आपल्या शेजारीच आणून बसवले आहे.

हसन मुश्रीफ यांच्या मुंबई पुणे कोल्हापूर कागल येथील निवासस्थानावर तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रधान कार्यालयावर ईडीने अनेक वेळा धाडस टाकून काही अधिकाऱ्यांची चौकशी केली होती. मुश्रीफ यांना आता कोणत्याही क्षणी अटक होईल असे वातावरण असतानाच मुश्रीफ यांनी राजभवनावर मंत्रि म्हणून चक्क शपथ घेतली. भारतीय जनता पक्षाचे हे राजकारण सुद्धा संभ्रम निर्माण करणारेच होते. चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, गिरीश महाजन यांनीही सर्वसामान्य जनतेमध्ये संभ्रम निर्माण होईल अशी वक्तव्य केली आहेत.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉक्टर मोहन भागवत यांनी सुद्धा नवी दिल्ली येथे जामा मशीद चे प्रमुख बुखारी यांची भेट घेतली होती. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना नागपूरच्या रेशीम बाग येथील मुख्यालयात प्रमुख अतिथी म्हणून बोलावले होते. त्यांच्याकडूनही संभ्रम निर्माण करणारे वक्तव्य यापूर्वी झालेले आहे.

आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून सर्वसामान्य जनतेमध्ये आणि मतदारां मध्ये संभ्रमाचे वातावरण तयार झाले आहे. शरद पवार यांच्यातील आणि त्यांच्या पक्षातील दोषावर तसेच उद्धव ठाकरे यांच्या दोषावर जाहीरपणे टीका टिपणी करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांनाच आता आमच्याबरोबर या असे कसे काय म्हणू शकतात? असा सवाल संभ्रमित मतदारांच्या कडून उपस्थित केला जातो आहे.

हेही वाचा :

इचलकरंजी येथील चेक बोंस प्रकरणी  एकास दंडासह शिक्षा

माझं काय, हा शेवटचा… रोहित शर्माच्या वक्तव्यामुळे उडाली खळबळ

मोदी सरकार होणार मालामाल! रिझर्व्ह बँकेकडून मिळणार 1 लाख कोटी