बैल गेला आणि झोपा केला

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : संभाव्य दुर्घटना(accident) टाळण्यासाठी पूर्व खबरदारी घेण्याची नितांत आवश्यकता असते.तथापी अशा प्रकारची खबरदारी घेण्याची जबाबदारी नीटपणे पार पाडली जात नाही किंवा तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. आणि मग मुंबईच्या घातकोपर भागात होर्डिंग कोसळण्यासारखी मोठी दुर्घटना घडते. निष्पापंचे बळी जातात. घाटकोपर येथे घडलेल्या होर्डिंग दुर्घटनेत 18 जणांचे बळी गेले आहेत. या दुर्घटनेची जबाबदारी होर्डिंग मालक भावेश भिडे याच्यावर निश्चित करून त्याच्या विरुद्ध सदस्य मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वास्तविक या दुर्घटनेला केवळ होर्डिंग मालक जबाबदार नाही तर त्यास अनेक घटक जबाबदार(accident) आहेत. त्यांच्यावरही अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले गेले पाहिजेत. अशा प्रकारची एक दुर्घटना पुण्यातही घडली होती. त्याची सखोल चौकशी केली गेली असती, आणि अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी काय करता येईल यासाठीची एक कायमस्वरूपी उपाययोजना केली गेली असती तर मुंबईतील घाटकोपर येथील होर्डिंग कोसळण्याची दुर्घटना टाळता आली असती. पुण्यात जे घडले ते इतरत्र घडू नये याची खबरदारी प्रशासनाला घेता आली असती. पण आपल्याकडे अशा प्रकारच्या दुर्घटनांची चौकशी केली जाते आणि पुढे काहीच घडत नाही.

ज्या दुर्घटना टाळता येऊ शकतात, पण दुर्घटना घडल्यानंतर त्याचे चौकशी केली जाते याला “”बैल गेला आणि झोपा केला”” असे म्हणतात. चार-पाच वर्षांपूर्वी रायगड जिल्ह्यात सावित्री नदीवरचा पुलच वाहून गेला. मध्यरात्री हा पूल वाहून गेल्यामुळे आणि त्याची माहिती कुणालाच नसल्यामुळे अनेक वाहने सावित्री नदीत पडली आणि अनेक लोक बुडून मरण पावले. सावित्री पुल दुर्घटना घडल्यानंतर राज्य शासनाने राज्यभरातील ब्रिटिशकालीन पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश दिले. कोल्हापूर सह राज्यातील अनेक ब्रिटिशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यापैकी अनेक पूलांची डागडूजी करणे, अनेक ठिकाणी पर्यायी पूल बांधणे अशा उपाययोजना केल्या पाहिजेत अशा शिफारशी शासनाला सादर करण्यात आल्या, पण निधी अभावी या शिफारसी सध्यातरी कागदावर आहेत.

आता मुंबईत होर्डिंग दुर्घटना घडून गेल्यानंतर आणि त्यात अनेक निष्पाप व्यक्तींचे बळी गेल्यानंतर राज्यातील महापालिका क्षेत्रातील प्रशासन खडबडून जागे झाले आहे. वास्तविक महापालिका क्षेत्रातील प्रशासनाकडून जाहिरातींची होर्डिंग कुठे लावायची आणि कुठे लावायची नाहीत याचे एक धोरण निश्चित केलेले असते. शहरातील विविध भागातील शासकीय निमशासकीय आणि खाजगी जागा होर्डिंग लावण्यासाठी निश्चित केलेल्या असतात. पण हे सर्व कागदावरच असते. प्रत्यक्षात नियमाप्रमाणे होर्डिंग लावलेली आहेत का याची तपासणी किंवा चौकशी कधीच केली जात नाही. आणि मग अशा काही दुर्घटना घडल्या की मग शहरभर फिरून होर्डिंगची तपासणी केली जाते. उभार करण्यात आलेली होर्डिंग खाली वादळ वाऱ्याने कोसळून आहेत यासाठी ती किती मजबूत असली पाहिजेत याचेही काही नियम आहेत. पण तिकडेही लक्ष देण्यास प्रशासनातील अधिकाऱ्यांना वेळ नसतो.

आता महाराष्ट्रातील अनेक मोठमोठ्या शहरात होर्डिंग विषयी तेथील स्थानिक प्रशासन बैठक घेईल. धोकादायक होर्डिंग काढून घेण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. पण त्यावर कायमस्वरूपी ठोस उपाय योजना राबवल्या जातील असे नाही. आणखी काही दिवसानंतर हे प्रकरण चर्चेच्या चौकटीतून बाहेर गेले की मग पुन्हा पूर्ण दुर्लक्षच.

दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या आधी एक महिना सर्वच शहरातील स्थानिक प्रशासनाकडून शहरातील धोकादायक इमारतींची यादी तयार केली जाते. इमारतीच्या मालकांना प्रशासनाकडून इमारत खाली उतरवून घेण्याबद्दलची नोटीस जारी केली जाते. प्रत्यक्षात नोटीस दिल्यानंतर संबंधितांच्या कडून काही कार्यवाही झालेली आहे का नाही याची साधी चौकशीही केली जात नाही.

कोल्हापूरचे चे उदाहरण द्यायचे झाले तर इथल्या महापालिका प्रशासनाकडून जवळपास 400 पेक्षा अधिक धोकादायक इमारतींची यादी तयार करून संबंधितांना नोटीसा बजावल्या जातात. पण गेल्या 25 वर्षात संबंधित मालकांनी धोकादायक इमारती खाली उतरवून घेतल्या आहेत का, याची चौकशी केली जात नाही. धोकादायक झालेल्या इमारती चे मालक आणि भाडेकरू यांच्यातील वाद न्यायालयात प्रलंबित असल्यामुळे अशा धोकादायक इमारतीबद्दल प्रशासनाला काही करता येत नाही असा युक्तीवाद नेहमीच केला जातो.

पुण्यामध्ये होर्डिंग दुर्घटना घडल्यानंतर त्याची चौकशी करून, पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी काय करता येईल यासाठी एक अभ्यास गट नेमला गेला असता तर मुंबईतील दुर्घटना घडली नसती. आता चौकशी करणे म्हणजे” बैल गेला आणि झोपा केला “यासारखी आहे.

मुंबईसारख्या मोठ्या शहरात पावसाळ्यामध्ये इमारती कोसळण्याच्या घटना घडत असतात. एखादी इमारत कोसळल्यानंतर, संबंधित इमारतीच्या मालकांना आम्ही आधीच ही इमारत धोकादायक आहे याबद्दलची नोटीस बजावली होती अशी कागदी घोडी नाचवली जातात.

हेही वाचा :

‘भाजपला राजकारणात पोरंच होत नाही म्हणून गद्दार मांडीवर…’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

कोल्हापूरात जलप्रदुषणामुळे पंचगंगा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी, मनसेकडून माशांचं पिंडदान

यंदा आयपीएलचं जेतेपद कोण पटकावणार?ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यू हेडनने जाहीर केलं संघाचं नाव!