कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सध्या संपूर्ण महाराष्ट्र तहानलेला आहे. अनेक मोठ्या शहरात पाणी (water)कपात करण्यात आली आहे. मराठवाड्यात तर पाणीटंचाईने भीषण रूप धारण केले आहे. पिण्याच्या पाण्यासाठी सर्व सामान्य जनतेच्या”तोंडचे पाणी पळाले”असताना कोल्हापूर सह बहुतांशी जिल्ह्यातील पालकमंत्री हे प्रचारातून आलेला थकवा दूर करण्यासाठी परदेशात गेले आहेत. काहीजण सहलीला अज्ञात स्थळी गेले आहेत. आणि हंडाभर पाण्यासाठी ग्रामीण भागातील महिलांची पायपीट सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात राजापूर बंधाऱ्यावर पाणी चोरले जाऊ नये म्हणून चक्क पोलिसांचा पहारा ठेवण्यात आला आहे. याच बंधाऱ्यावर काही वर्षांपूर्वी बंधारा फोडण्यासाठी आलेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत फायरिंग केले होते.
महाराष्ट्र कर्नाटकच्या सीमेवर शिरोळ नजीक राजापूर येथे शेवटचा कोल्हापूर टाईप बंधारा आहे. या बंधाऱ्यातून पुढे कर्नाटकच्या हद्दीत पाणी(water) सोडले जाते. सध्या कर्नाटकातही अनेक गावे तहानलेली आहेत. त्यांना याच बंधाऱ्यातून पाणी सोडले जाते. पण कोल्हापूर जिल्ह्यातही विशेषता शिरोळ तालुक्यात पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे राजापूर बंधाऱ्यातून पुढे पाणी सोडले जात नाही. आठ दिवसांपूर्वी कर्नाटक हद्दीतील काही जणांनी या बंधाऱ्याचे बर्गे काढून कर्नाटक हद्दीत पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. पाटबंधारे विभागाच्या हे लक्षात येताच पुन्हा बर्गे बसवून विसर्ग बंद करण्यात आला आहे.
बंधाऱ्याच्या पलीकडच्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पिण्यासाठी पाण्याचा विसर्ग पुन्हा सुरू केला जाऊ शकतो, या बंधाऱ्यातील पाणी कर्नाटकच्या हद्दीत पळवले जाऊ शकते, अर्थात कोल्हापुरातील पाण्याची कर्नाटकातील लोकांच्याकडून चोरी होऊ शकते म्हणून तेथे सध्या पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यांच्या सोबतीला पाटबंधारे विभागाचे दोन कर्मचारीही ठेवण्यात आले आहेत.
वीस वर्षांपूर्वी महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचा हा कोल्हापूर जिल्ह्यातील शेवटचा कोल्हापूर टाईप बंधारा फोडण्यासाठी कर्नाटकातील शेतकऱ्यांचा एक जमाव तेथे आला होता. तर या जमावाला प्रतिबंध करण्यासाठी राजापूर येथील ग्रामस्थ जमा झाले होते. या दोन्ही गटांमध्ये तणाव निर्माण झाला होता. कोणत्याही क्षणी हे दोन जमाव एकमेकाला भिडतील असे वातावरण तयार झाले होते. तेव्हा मात्र दोन्ही जमावांना पांगवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी तेव्हा हवेत फायरिंग केले होते. तशीच स्थिती आता तयार झालेली आहे.
कर्नाटक हद्दीतील लोकांना राजापूर बंधाऱ्यातील पाणी(water) हवे आहे. तर महाराष्ट्रातील अर्थात राजापूर येथील ग्रामस्थांनाही पाणी हवे आहे. प्राधान्य इथल्या शेतकऱ्यांसाठी आहे. कर्नाटक हद्दीतील गावांचा पिण्याच्या पाण्याचा तेथील शासनाने प्रश्न सोडवला नाही तर राजापूर बंधाऱ्यावर तणावग्रस्त वातावरण निर्माण होऊ शकते. म्हणूनच खबरदारीसाठी तिथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे.
कोल्हापूर जिल्हा हा तसा जलसमृद्ध जिल्हा म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या जलसमृद्ध जिल्ह्यात काही गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. तर मग मराठवाडा परिसरात पाणीटंचाई किती भीषण असेल याची कल्पनाच करता येत नाही.
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात शेकडो गावांमध्ये पाणीबाणी आहे. शेकडो टँकरच्या माध्यमातून सध्या या गावांना पाण्याचा पुरवठा केला जातो आहे. सध्या महाराष्ट्रात जो पाणीसाठा आहे तो पिण्यासाठीच वापरला जाणार आहे. तोही आता जपून वापरावा लागणार आहे. महाराष्ट्रात मान्सून वेळेत दाखल झाला तर पाणीटंचाईची तीव्रता कमी होणार आहे.
यंदा पाणीटंचाईचे संकट हळूहळू तीव्र होत असताना, राज्यकर्ते, राजकीय नेते हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त होते. पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे कसे जाणार यावर निवडणूक काळात चर्चाच झाली नाही. सर्वांनी निवडणूक प्रचाराला प्राधान्य दिले होते.
आता महाराष्ट्रातील निवडणुका संपल्या, पण अनेक मंत्री तसेच पालकमंत्री प्रचाराचा थकवा घालवण्यासाठी परदेशात रम्य ठिकाणी गेलेले आहेत. टंचाईग्रस्त गावातील महिला डोक्यावर हंडा घेऊन पाण्याच्या शोधासाठी पायपीट करताना दिसत आहेत. विहिरींनी तळ गाठलेला आहे.
झिरपणारे पाणी वाटीत घेऊन हंड्यात ओतले जात आहे. मान्सून दाखल होऊन तो कोसळेपर्यंत या परिस्थितीत काही फरक पडणार नाही. भविष्यात पाण्यासाठी युद्धे होतील असे म्हटले जाते, ती वेळ येऊ नये यासाठी आत्तापासूनच पाणी आडवा पाणी जिरवा हे अभियान युद्धपातळीवर सुरू केले पाहिजे.
हेही वाचा :
‘या’ 5 राशींसाठी जून महिना असणार भाग्यशाली; मिळणार चिक्कार पैसा
महाराष्ट्रात अँटी मोदी करंट, ‘या’ जागांवर बसणार महायुतीला ब्रेक
शरद पवार गटाला मोठा धक्का; पक्षातील तरूण चेहरा साथ सोडणार?