कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कठीणातील कठीण काळातून बाहेर पडताना(doctor), किंवा एखाद्या संकटाशी मुकाबला करताना एखाद्या व्यक्तीची मोलाची मदत झाली तर, अगदी देवासारखा धावून आलास, तुझ्या रूपात देवच आला असं कृतज्ञतेच्या भावनेतून म्हटलं जातं. अगदी तसंच, जीवावरच संकट दूर करणाऱ्या डॉक्टरना सुद्धा देवच मानलं जातं. ही आपली संस्कृती आहे पण हेच डॉक्टर, सगळी नैतिकता पायाखाली घेतात तेव्हा”डॉक्टर! तुम्ही सुद्धा?”अशा शब्दात सखेद आश्चर्य व्यक्त केलं जातं.
पुण्याच्या कल्याणी नगर परिसरातील हिट अँड रन प्रकरणातील मुख्य संशयित अल्पवयीन आरोपीचे वैद्यकीय(doctor) अधिकाऱ्यांनी तपासी अधिकाऱ्यांच्या शिफारशीवरून घेतलेले ब्लड सॅम्पल कचराकुंडीत टाकण्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर हिणकस पातळीवरचं नैतिक अधःपतन ठळकपणे पुढे आले आहे.
जीवित हानी करणारा अपघात घडला तर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून वाहनाची तपासणी केली जाते. त्याचप्रमाणे वाहन चालक मद्य सेवन करून वाहन चालवत होता काय याची तपासणी करण्यासाठी वाहन चालकाच्या रक्ताची चिकित्सा केली जाते. त्यासाठी त्याच्या रक्ताचा नमुना घेतला जातो. वाहन चालक मद्य सेवन करून वाहन चालवत होता हे सिद्ध झाले तर गुन्ह्याचे गांभीर्य वाढते. सदोष मनुष्य वधाच्या कायद्याखाली कमाल पातळीवरची शिक्षा संबंधिताला होऊ शकते. आणि म्हणूनच वाहन अपघात गुन्ह्यात वाहन चालकाचे रक्त तपासले जाते.
पुण्यातील हिट अँड रन प्रकरणातील बिल्डर पुत्राला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार त्याची ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. हा बिल्डर पुत्र मद्याच्या प्रभावाखाली किती होता हा वैद्यकीय पुरावा प्राप्त करण्यासाठी बिल्डर पुत्राच्या रक्ताची तपासणी करण्यासाठी त्याच्या रक्ताचे नमुने घेतले होते.
संशयीत आरोपीच्या शरीरातील रक्ताचा अंश काढून घेताना वैद्यकीय अधिकाऱ्याच्या समोर पोलीस किंवा पोलीस अधिकारी असतात. पोलिसांनी तिथे हजर असलेच पाहिजे असा नियम सुद्धा आहे. या नियमाप्रमाणे रक्ताचा अंश काढून घेतला असेलही.
नंतर प्रयोग शाळेत त्याची चिकित्सा करताना तपासी अधिकारी उपस्थित नसतात. त्यामुळे प्रयोगशाळेत नेमके काय घडते हे प्रयोगशाळे बाहेर समजत नाही. बिल्डर पुत्राचा जो रक्तगट आहे त्याच रक्तगटाचा नमुना दुसऱ्या मद्यपान न केलेल्या व्यक्तीच्या शरीरातून काढून घेण्यात आलेला असावा. त्यामुळेच संशयीत आरोपी बिल्डर पुत्राचे घेण्यात आलेले ब्लड सॅम्पल संबंधितांनी बाहेर फेकून दिले आहे. संपूर्ण देशभर गाजत असलेल्या या हिट अँड रन प्रकरणात संशयित आरोपीचे ब्लड सॅम्पल कचराकुंडी टाकण्याचा हा प्रकार अतिशय धक्कादायक म्हणावा लागेल.
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांना ससून रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या वर संशय आहे. कदाचित या प्रकरणात त्यांना सुद्धा संशयीत आरोपीस वाचवण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून अटक केली जाऊ शकते.
काही महिन्यापूर्वी ड्रग माफिया ललित पाटील याला मर्यादेच्या पलीकडे जाऊन सवलत दिल्याच्या आरोपावरून ससून रुग्णालयातील दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांना तपास अधिकाऱ्यांनी अटक केली होती. आता पुन्हा ससून रुग्णालय हिट अँड रन प्रकरणात चर्चेत आले आहे.
हिट अँड रन प्रकरणात अगदी सुरुवातीपासूनच संशयित बिल्डर पुत्राला वाचवण्याचा प्रयत्न काही जबाबदार अधिकाऱ्यांनी केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. आता तर या प्रकरणात अतिशय महत्त्वाचा मानला गेलेला पुरावाच नष्ट करण्याचा प्रयत्न ससून रुग्णालयातील संशयित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कडून झालेला आहे आणि तो नैतिक पातळीवर अक्षम्य आहे.
शेक्सपियरच्या एका नाटकात सीझरचा अतिशय जवळचा मित्र असलेल्या ब्रुट्सने, त्याच्या विरुद्ध कारवाई केली तेव्हा सीझर आश्चर्याने त्याला म्हणाला होता”ब्रुट्स यु?”डॉक्टर तुम्ही सुद्धा या नावाचे एक नाटक रंगभूमीवर आले होते. समाजात अतिशय आदराचे स्थान असलेल्या आणि देवाचे दुसरे रूप मानले गेलेल्या डॉक्टरकडून नैतिक पातळीवरील अधःपतन झाले तर, डॉक्टर!तुम्ही सुद्धा? अशा शब्दात सखेद आश्चर्य व्यक्त केले जाते.
खुनासारखा अतिशय गंभीर गुन्हा करणारे बहुतांशी आरोपी हे मद्य सेवन केलेले असतात. तथापि त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करताना त्यांच्या रक्ताचा नमुना घेतला जात नाही. कारण संशयित आरोपी हा दारूच्या अंमलाखाली होता, हा बचावाचा मुद्दा होऊ शकतो. म्हणूनच सर्वात गंभीर गुन्ह्यातील संशयित आरोपींचे रक्ताचे नमुने घेतले जात नाहीत.
हेही वाचा :
कोल्हापूर जिल्ह्यात किरकोळ वादातून वृद्ध आईचा मुलाने केला खून
IPL संपली आता रंगणार टी-२० वर्ल्डकपचा थरार! केव्हा होणार टीम इंडियाचे सामने?
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची विदेशात होणार धमाल; अख्खं बॉलिवूड राहणार बंद