अब्दुल सत्तार यांची काँग्रेसशी जवळीक; आघाडीच्या उमेदवाराणा घरी जाऊन भेट 

 लोकसभेच्या जालना मतदारसंघात महाविकास आघाडीचे डॉ. कल्याण काळे यांनी पाच टर्म खासदार असलेल्या भाजपच्या रावसाहेब दानवे यांचा पराभव केला (member). तब्बल 1 लाख 9 हजार मतांनी दानवेंचा पराभव करत काळे यांनी 2009 मध्ये झालेल्या थोडक्यात पराभवाची परतफेड केल्याची चर्चा या निमित्ताने होत आहे.

कल्याण काळे यांच्या विजयात अनेक अदृश हातांची मदत झाल्याचे दिसून आले आहे. यात शिवसेनेचे राज्यातील अल्पसंख्याक विकास व पणन मंत्री अब्दुल सत्तार यांचे नाव प्रामुख्याने घेतले जात आहे. स्वतः सत्तार यांनी काही दिवसांपुर्वी कल्याण काळेंच्या घरी जाऊन अभिनंदन करत डोक्यावर हात ठेवला होता. एवढेच नाही तर काळे माझे चांगले मित्र आहेत, त्यांना मी निवडणुकीत मदत केल्याची जाहीर कबुलीही सत्तार यांनी दिली आहे.

त्यानंतर सत्तार आणि काँग्रेसच्या नेत्यांमधील जवळीक वाढू लागली आहे. काँग्रेसचे जालन्याचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी नुकतीच अब्दुल सत्तार यांची त्यांच्या सिल्लोड येथील संपर्क कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. भोकरदन शहराला खडकपूर्णा योजनेतून पाणीपुरवठा करावा, अशी मागणी त्यांनी या भेटीत सत्तारांकडे केली. त्यांनी ही मागणी मान्य करुन तत्काळ कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आपल्यावर विश्वास आहे, तोपर्यंत आपला शिवसेनेशी प्रासंगिक करार कायम आहे, असे सांगत सत्तार यांनी सूचक इशारा दिला होता. राज्यात आणि मराठवाड्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीची पिछेहाट झाली आहे. महाविकास आघाडीला राज्यात मोठे यश मिळाले. मराठवाड्यात तर आठ पैकी सात जागा महाविकास आघाडीने जिंकल्या.

राजकारणातील या बदलत्या हवेचा अंदाज घेत सत्तार यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी धक्कादायक निर्णयाची तयारी केली आहे की काय? अशी चर्चा त्यांच्या काँग्रेस नेत्यांशी वाढत असलेल्या भेटीगाठीमुळे होऊ लागली आहे. सत्तार तसे पूर्वीचे काँग्रेसचेच, त्यामुळे त्यांचे आधीपासून काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांशी चांगले संबंध आहेत.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांनी सत्तारांची घेतलेली भेट महत्वाची समजली जाते. राजाभाऊ देशमुख यांचा कल्याण काळे यांच्या विजयात मोठा वाटा आहे. अगदी काळे यांच्या नावाची उमेदवारीसाठी शिफारस करण्यापासून संपुर्ण मतदारसंघात प्रभावी प्रचार यंत्रणा राबवण्यात देशमुखांनी महत्वाची भूमिका बजावली आहे.

भोकरदनचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्यासाठी त्यांनी सत्तारांकडे मदत मागितली आहे. सत्तारांनी त्यांच्या विनंतीला मान देत खडकपुर्णातून भोकरदन शहराला पाणीपुरवठा करण्यास तुर्त मान्यता देत यंत्रणेला सूचना दिल्या आहेत. आता ही भेट भोकरदनकरांना पाणी पाजण्यात यशस्वी होते का? हे लवकरच स्पष्ट होईल

हेही वाचा :

रोहित पाकिस्तान विरुद्ध मोठा रेकॉर्ड करण्यासाठी सज्ज

आम्हाला कॅबिनेट मंत्रिपदच पाहिजे; अजित पवार मागणीवर ठाम

घटस्फोटाची चर्चा असतानाच नताशा मुलासोबत स्पॉट, हार्दिक पांड्या याच्या..