कोल्हापूरच्या(Kolhapur) राजकारणात भाजप खासदार धनंजय (मुन्ना) महाडिक आणि काँग्रेस नेते सतेज (बंटी) पाटील यांचे राजकीय वैर नवे नाही. दरम्यान, आता महाडिक -पाटील यांच्या दरम्यानचा वाद आता पुढच्या पिढीत जाणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय. कारण कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज पाटील कोल्हापूर दक्षिणचे आमदार आहेत. त्यामुळे कोल्हापूर दक्षिणमध्ये कृष्णराज महाडिक वि. ऋतुराज पाटील असा सामना रंगणार असल्याचे बोलले जात आहे. कारण कोल्हापूर अशा होर्डिंग्ज लागवण्यात आले आहेत.
धनंजय महाडिक म्हणाले, कृष्णराज महाडिक(Kolhapur) हे मराठीतले सर्वात लोकप्रिय युट्युबर आहेत. त्यांची लोकप्रियता अफाट आहे, त्यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो लोकांनी येऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. ते युवा आहेत त्यांच्यात ऊर्जा आहेत. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणामध्ये येऊन त्यांना भेटलेले आहेत. त्यांच्या प्रेमाखातर कोल्हापूर शहरात विविध बोर्ड लावण्यात आलेले आहेत. नुकत्याच लोकसभेच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तीन लोकसभा मतदारसंघाची माझ्यावर जबाबदारी होती. या तीन पैकी दोन जागांवर महायुतीच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे.
पुढे बोलताना धनंजय महाडिक म्हणाले, कोल्हापूरमध्ये लोकसभेत महायुतीच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांना बोलवून पराभवाची कारण शोधण्याचे काम आम्ही सुरू केलेला आहे. भविष्यात येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत आपण सामोरे कसं जायचं याच्यावर विचार विनिमय सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महायुती सोबत राष्ट्रवादी काँग्रेस होती आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यात चांगलं काम केलेलं आहे. आजच्या बैठका म्हणजे भविष्यातील विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम आहे, असं म्हणायला हरकत नाही.
येणारी विधानसभा सुद्धा आम्ही महायुती म्हणूनच लढवणार आहोत. अजून तीन ते चार महिन्याचा कालावधी आहे. या दरम्यान जे काही बदल होतील ते वरिष्ठ पातळीवर होतील त्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा नाही. शक्तिपीठ हा महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यामधून जातो त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या जमिनी जाणार आहेत हे स्पष्ट झालेला आहे. त्यामुळे ज्या लोकांच्या भावना आहेत त्या डावलून आपण काम करावं याच्याशी आम्ही सहमत नाही.
आम्ही सर्वांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना याची कल्पना दिलेली आहे या मार्गाला स्थगिती मिळावी अशी आमची भूमिका आहे. मनोज जारांगे पाटलांनी ज्या मागण्या केलेले आहेत त्याच्यावर काम सुरू आहे. लवकरच त्यावर राज्य शासन निर्णय देईल, असं आश्वासनही महाडिक यांनी दिले.
हेही वाचा :
विधानसभेच्या दोन आमदारांचे राजीनामे, आणखी चार आमदार राजीनामा देणार!
मनोज जरांगे ‘किंगमेकर’; शरद पवार गटाच्या खासदाराच्या बॅनरवर झळकला फोटो
इचलकरंजी, हातकणंगले मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी? मंत्रीपदासाठी ही नावे आघाडीवर…..