इच्छाशक्ती असेल तर गुंडाराज होईल खालसा

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : विसाव्या शतकाच्या आठव्या दशकात(gangster) म्हणजे 1980 ते 1990 या दहा वर्षात मुंबईत टोळी युद्धाने कहर केला होता. एक गुंड दुसऱ्या गुंडाला मारतोय म्हणून तेव्हाचे पोलीस प्रशासन हाताची घडी घालून गप्प बसले नव्हते. अगदी कठोर उपाय योजना तितक्याच कठोरपणे राबवून टोळी युद्ध संपुष्टात आणले होते. मुंबईच्या भूमिगत जगतावर पोलिसांनी एक प्रकारची दहशत निर्माण केली होती. कोणत्याही महानगरातील गुंडाराज खालसा करावयाचे असेल तर तेथील पोलीस प्रशासनाला तशी दहशत प्रस्थापित करण्याची गरज आहे. कोल्हापूर, इचलकरंजी या दोन महानगरात गुंडगिरीचे तण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. ते मुळापासून उपटून काढण्याची गरज आहे.

एका गुंडाची हत्या दुसऱ्या गुंडाकडून होते आहे. एक गुंड(gangster) कमी होतोय. असा विचार करून पोलिसांनी बघायची भूमिका घेतली किंवा गुन्हा दाखल करून संशय येताना अटक करून त्यांना तुरुंगात धाडले म्हणजे आपले काम संपले अशी भूमिका पोलिसांनी घेतली तर गुंडगिरी, गुंडाराज वाढण्यास त्यांच्याकडून अप्रत्यक्ष मदत होईल. कारण एका गुंडाला मारण्यात दुसरे चार गुंड तयार होतात. गुंडांची निर्मिती थांबली पाहिजे अशा प्रकारच्या उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत.

चार महिन्यापूर्वी रंकाळा चौपाटीवर एका गुंडाची दुसऱ्या एका गुंड टोळीने अनेक लोकांना साक्षी ठेवून हत्या केली होती. या थरारक हल्ल्याचा एक व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.या प्रकरणातील सर्व संशयीतांना पोलिसांनी अटकही केली असून ते सर्वजण न्यायालयीन कोठाडीत आहेत. आता तर न्यायालयीन कोठडी पर्यंत म्हणजे कळंबा मध्यवर्ती कारागृहापर्यंत गुंडगिरी पोहोचली आहे. म्हणजे कारागृहाची सुद्धा भीती गुंडांना राहिलेली नाही. गेल्या वर्षभरात या कारागृहात निशिकांत कांबळे, मुन्ना उर्फ मोहम्मद अली खान या जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या कैद्यांची हत्या झाली आहे.

दोनच दिवसांपूर्वी वारे वसाहती मधील सुजल कांबळे या युवकाची नंग्या तलवारी नाचवत पाठलाग करून हत्या करण्यात आली. आता सुजलच्या मित्रांनी एक नव्हे तर दोन खून करून बदला घेण्याची शपथच सीपीआर रुग्णालयाच्या आवारात घेतली आहे. गुंडगिरी चा शेवट किती माणूस पद्धतीने होतो हे पाहून सुद्धा बदला घेण्याची शपथ घेतली जाते म्हणजे पोलीस प्रशासनाची भीतीच गुंडांना राहिली नाही असे खेदाने म्हणावे लागेल.

लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याला एस एस दानीगोंड नामाचे एक पोलीस निरीक्षक होते. त्यांच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुना बुधवार पेठ परिसरात काही तरुणांनी एकत्र येऊन”हत्यार ग्रुप”या नावाचे मंडळ काढले होते आणि तसा फलकही लावण्यात आला होता. पोलीस निरीक्षक दानीगोंड यांनी तो फलक जागेवर जाऊन उखडून काढला शिवाय संबंधित तरुणांना त्यांच्या पालकांसह पोलीस ठाण्यात बोलावून घेऊन त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्यांच्या अशा प्रकारच्या कारवाईने कोल्हापूर शहरातील गुंडगिरीशी निगडित नावे असणारे फलक एका रात्रीत गायब झाले होते. पोलीस अधिकाऱ्यांची तशी दहशत आज राहिलेली नाही.

शाहूपुरी पोलीस ठाण्याचे श्रीपतराव माने हे पोलीस निरीक्षक असताना त्यांनी राजारामपुरी परिसरातील एका गुंडाची मे महिन्याच्या रखरखीत उन्हात पोलीस ठाणे ते न्यायालय अशी अनवाणी दिंड काढली होती. आर के पद्मनाभन हे पोलीस अधीक्षक असताना त्यांनी याच गुंडासह अनेकांना “मोका” लावला होता. त्यानंतर हा गुंड सरळ झाला. त्याने गुंडगिरी सोडली. याचा अर्थ पोलिसांनी मनात आणले तर गुंडाराज खालसा करता येते.

काही वर्षांपूर्वी सुरेश तुरुंबेकर या रॉकेल विक्रेत्याचा सीपीआर रुग्णालयात तो बेडवर उपचार घेत असताना रुग्णालयात घुसून काही गुंडांनी त्याची हत्या केली होती. या हत्या प्रकरणातील एक संशयित आरोपी सूर्यवंशी याची हत्या सरस्वती चित्रपट गृहात, चित्रपट सुरू असताना त्याच परिसरातील काही जणांनी त्याची हत्या केली होती. हत्या करणारे हे सुरेश तुरुंबेकर याचे मित्र होते. त्यानंतर व्हीनस कॉर्नर परिसरात प्रकाश डोईफोडे, आशिष गवळी, यांची हत्या झाली होती. या सर्वच हत्या प्रकरणातील आरोपी हे कोल्हापुरातील गुंड बनले. त्यातील काहीजण नंतर नगरसेवकही झाले. गुंडगिरीत नाव झाल्यानंतर बहुतांशी मंडळींनी अवैध व्यवसाय सुरू करून करोडो रुपये मिळवले.

त्यानंतर काही वर्षांचा गॅप राहिला आणि आता पुन्हा गुंडाराज सुरू झाले. कोल्हापूर शहरात जसे गुंडाराज आहे तसेच गुंडाराज इचलकरंजी या वस्त्र नगरीत आहे. हे गुंडाराज खालसा करण्याची आव्हानात्मक जबाबदारी पोलीस प्रशासनावर आहे.

हेही वाचा :

‘..तर तुमच्याविरुद्ध वॉरंट जारी करावं लागेल’; कोर्टाची भुजबळांना तंबी!

Good News! शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; जूनमध्ये खात्यात इतके पैसे जमा होणार

माधुरी दीक्षितसाठी स्वत:ला दिले सिगारेटचे चटके; अजय देवगणचा मोठा खुलासा