इथे हतबल ठरतो आहे, जादूटोणा प्रतिबंधक कायदा!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : सारासार विचार करण्याची विवेक बुद्धी (witchcraft)हरवली की, माणूस कोणत्याही गोष्टीवर अगदी सहजपणे विश्वास ठेवू लागतो. मग तो गुप्तधन, पैशाचा पाऊस या अशक्यप्राय गोष्टीच्या मागे लागतो. त्यासाठी तो कोणत्याही थराला जातो. राधानगरी तालुक्यातील कौलव गावात घडलेला प्रकार हा त्याच प्रकारचा आहे. असे प्रकार यापूर्वीही कोल्हापूर शहरासह महाराष्ट्रातील अनेक शहरे आणि ग्रामीण भागात घडले आहेत.

या प्रकारांना लगाम घालण्यासाठी महाराष्ट्राने जादूटोणा(witchcraft) प्रतिबंधक कायदा केला पण तरीही भोंदू बाबा तांत्रिक बाबा यांच्याकडून अघोरी प्रकार सुरूच आहेत आणि विशेष म्हणजे अनेक बालक बालिकांचे यामध्ये यापूर्वी बळी दिल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत. कौलव गावात कदाचित गुप्तधनाच्या आमिषाने संबंधितांनी नरबळीही दिला असता, तथापि सुदैवाने तसे काही घडलेले दिसत नाही.

श्रद्धा कुठे संपते आणि अंधश्रद्धा कुठून सुरू होते यातील सीमारेषा फारच धुसरं आणि अस्पष्ट झाल्या असल्याने अनेक जण अशक्यप्राय गोष्टी साध्य करण्याच्या मागे लागताना सारासार विचार करण्याची विवेक बुद्धी हरवून बसतात. आता एखाद्या लहान कुमारी बालिकेचा बळी दिला की चांगली संताना प्राप्त होते ही अंधश्रद्धा अघोरी, भीषण म्हटले पाहिजे. सुमारे 50 वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात संपूर्ण देशाला हादरवून सोडणारे मानवत हत्याकांड मालिका घडली होती. मानवत मधील उत्तम बाराहाते आणि रुक्मिणी बाराहाते या दांपत्याला मूल होत नव्हते. त्यांना एका भोंदू बाबांनी सांगितले की कुमारी बालिकेचा बळी देऊन तिच्या रक्ताचा अभिषेक देवीला घातला की संतान प्राप्ती होईल.

त्यावर विश्वास ठेवून बारहाते दाम्पत्याने काही जणांना पैसे देऊन त्यांच्याकडून, त्यांना या अघोरी प्रकारात सहभागी करून घेऊन हे हत्याकांड करण्यात आले होते. मानवत मध्ये दहा पेक्षा अधिक बालीकांचे अपहरण करून त्यांचे बळी देण्यात आल्याच्या प्रकाराने तेव्हा देशभर खळबळ उडवून दिली होती. राज्याचे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक मानवत मध्ये तळ ठोकून बसले होते. मानवत हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींच्या मुस्क्यावडल्यानंतर काही दिवसांनी त्याच परिसरात बाभूळतारा हत्याकांड मालिका सुरू झाली होती.

महाराष्ट्रात गुप्तधन(witchcraft) मिळवण्याच्या आमिषाने, पैशाचा पाऊस पडतो असे सांगून अनेकांना फसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने महाराष्ट्र सरकारने याबद्दल एक कठोर कायदा करावा अशी मागणी केली होती. विलासराव देशमुख हे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रात भोंदू बाबा, तांत्रिक बाबा यांच्या विरोधी कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र जादूटोणा प्रतिबंधक कायदा विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत करून घेतला होता. अशा प्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होय.

या नव्या कायद्याखाली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुन्हे नोंद करून, अनेक भोंदू बाबा, तांत्रिक बाबांना गजाआड करण्यात आले होते. तथापि या कायद्याचा प्रभावीपणे अंमल केला गेला नसल्याने अपवादात्मक खटल्यामध्येच आरोपींना अर्थात भोंदू बाबांना शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारचे गुन्हे होऊ नयेत याची खबरदारी घेण्याची जबाबदारी स्थानिक पोलिसांवर आहे पण संबंधित पोलिसांच्या कडून आपल्या हद्दीतील अशा प्रकारचे तांत्रिक बाबा भोंदू बाबा शोधून काढण्याचे काम केले जात नाही.

काही वर्षांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून काही जण कोणालातरी फसवून एका डोंगरावर आणत असत. तिथे त्याची हत्या करून त्याच्याकडे पैसा काढून घेतला जात असे. अशा प्रकारचे भीषण गुन्हे करणाऱ्या टोळीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. त्यांना सिरीयल किलर ठरवून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली.

कोल्हापूर शहरात एका गजबजलेल्या परिसरात मुख्याध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेल्याने, आपल्या घरामध्ये गुप्तधन आहे या अंधश्रद्धेतून घरातील अनेक खोल्या खोदून काढल्या होत्या. पण गुप्तधन काही सापडले नाही. अंधश्रद्धेचा पगडा अजूनही जाणवण्या इतपत लोकांच्यावर आहे. शहरातील तिकटीवर, ओढ्याच्या काठावर, पिंपळाच्या झाडाखाली, भाताचा नैवेद्य असलेल्या परड्या आजही पाहायला मिळतात. टाचण्या टोचलेले लिंबू रस्त्यावर अनेक ठिकाणी बघायला मिळतात. हा सारा अंधश्रद्धेचाच प्रकार आहे. मध्यंतरी 21 नख्या असलेल्या कासवाबद्दल अशीच अंधश्रद्धा पसरली होती. या अंधश्रद्धेतून कासवांची तस्करी वाढली होती आणि आजही ती काही प्रमाणात आढळून येते.

महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हटले जाते. कोल्हापूरला पुरोगामी विचारांची राजधानी समजली जाते. प्रत्येक गोष्ट विज्ञानाच्या कसोटीवर तपासून पाहिली पाहिजे असे सांगणारे अनेक तत्त्वज्ञ या महाराष्ट्रात होऊन गेले. पण तरीही अंधश्रद्धेचे पूर्णपणे अजूनही निर्मूलन झालेले नाही. राधानगरी तालुक्यातील कौलव गावात घडलेल्या घटनेने ते अधोरेखित झाले आहे.

हेही वाचा :

एकतर्फी प्रेमातून 23 वर्षीय तरुणीवर कैचीने सपासप वार

तंटा नाय तर घंटा नाय… ‘बिग बॉस मराठी’चा नवा प्रोमो आऊट

एक टोमॅटोची जादू, ५ मिनिटांत तयार होईल कुरकुरीत टोमॅटो डोसा