कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ”खोट्याच्या कपाळी कुऱ्हाडीचा घाव”अशी मराठी(plan) मध्ये एक म्हण आहे आणि ती पुणे येथील खेडकर कुटुंबासाठी तंतोतंत लागू पडते. खाजगी गाडीवर अंबर दिवा लावण्याचा मोह आवरता आला नाही आणि रुबाब दाखवण्यासाठी केलेल्या या साध्या चुकीमुळे एकापेक्षा एक गुन्हे सदृश्य प्रकार किंवा गुन्हेच उघडकीस आले आहेत. त्यामुळे प्रस्थापित असलेल्या इथल्या व्यवस्थेविषयी, केंद्रीय स्पर्धा परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेविषयी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आणि त्याच्या केंद्रस्थानी प्रशिक्षणार्थी आय. ए. एस. अधिकारी पूजा मनोरमा दिलीप खेडकर या आहेत. त्यांना तातडीने बडतर्फ करण्याची मागणी निवडणूक आयोगाचे निवृत्त मुख्य आयुक्त ज्येष्ठ सनदी अधिकारी वाय एस कुरेशी यांनी केली आहे.
मंत्री, आय ए एस, आय पी एस तसेच इतर तत्सम सेवेतील अधिकाऱ्यांना त्यांच्या खाजगी(plan) किंवा शासकीय वाहनांवर लाल किंवा अंबर दिवा लावण्यास कायमस्वरूपी मनाई करण्यात आली आहे. असे असतानाही आयएएस परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्र केदार मिळालेल्या पूजा खेडकर यांनी स्वतःच्या खाजगी गाडीवर अंबर दिवा लावला. ते पुण्याच्या पोलीस वाहतूक नियंत्रण शाखेच्या नजरेत आले. त्यांनी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली आणि त्यानंतर खेडकर कुटुंबीयांच्या एकापेक्षा एक सुरस कथा बाहेर पडू लागल्या. त्यातील काही कथा थेट केंद्रीय स्पर्धा परीक्षा यंत्रणेला धडकू लागल्या. परिणामी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष श्री सोनी यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. देशात हे प्रथमच घडले आहे.
पूजा खेडकर यांचा नंबर दिवा प्रकरण बाहेर आल्यावर सर्वसामान्य माणसाने चक्रावून गेले पाहिजे किंवा त्याचा व्यवस्थेवरचा विश्वासच उडून गेला पाहिजे असे अनेक प्रकार समोर आले आहेत. माहितीच्या अधिकाराखाली एका सामाजिक कार्यकर्त्यांनी पूजा खेडकर यांच्या विषयी काही धक्कादायक माहिती पुढे आणली आहे. त्यातून शासन यंत्रणेचा एक भयानक चेहरा पाहायला मिळाला आहे. 17 लाख रुपयांचे घड्याळ, काही कोटी रुपये किमतीचे आलिशान निवासस्थान, किमान शंभर कोटी रुपयांची धनसंपदा, स्थावर मालमत्ता असताना पूजा खेडकर यांना वार्षिक आठ लाख रुपये उत्पन्न असल्याचा दाखला मिळाला. कोणतेही व्यंग नसताना त्या दिव्यांग असल्याचा दाखला त्यांना मिळाला.
ओबीसी म्हणून बनावट दाखला त्यांना उपलब्ध झाला. केंद्रीय लोकसेवा आयोगाला हे दाखले सादर करताना पूजा खेडकर यांनी बनावट आय. डी., बनावट मोबाईल क्रमांक, संशयास्पद नाव, अशी बरीच काही बनावट कागदपत्रे दिली आहेत. त्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाची तसेच केंद्रीय स्पर्धा परीक्षा यंत्रणेची घोर फसवणूक केली आहे आणि हे सर्व काही आता गंभीर गुन्ह्यात परावर्तित झाले आहे. नवी दिल्लीत त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूजा खेडकर यांना शासकीय, निमशासकीय व्यवस्थेमधील सहीचा अधिकार असलेल्यांनी मदत केली असून त्यांच्यावरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत.”नीट, नेट, सेट, टेट,”आदी परीक्षेत घोटाळे होतात किंवा झालेही आहेत. नीट परीक्षेतील घोटाळा तर सर्वोच्च न्यायालयात दाखल आहे. पण आता सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या केंद्रीय स्पर्धा परीक्षेलाही अशा प्रकारचा चुना लावला गेला आहे. पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांची तसेच त्यांच्या पत्नी मनोरमा यांची अँटी करप्शन च्या वतीने चौकशी केली जाणार आहे. राजपत्रित अधिकारी असताना दिलीप खेडकर यांच्यावर लाचखोरीच्या आरोपावरून गुन्हे दाखल केले होते. आता तिसऱ्यांदा त्यांची चौकशी होईल. त्यांच्या पत्नी मनोरमा या सध्या खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक झालेल्या आहेत.
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी असलेल्या पूजा खेडकर यांनी त्यांच्या खाजगी वाहनावर अंबर दिवा लावला नसता तर किंवा तो लावूनही ट्रॅफिक पोलीस तसेच आरटीओ अधिकारी यांच्या नजरेत आला नसता तर पूजा खेडकर प्रकरण कधीच बाहेर आले नसते.
पुण्याच्या कल्याणी नगर परिसरात घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात अग्रवाल कुटुंबाकडून त्यांच्या ड्रायव्हरला तू तुझ्या अंगावर हा अपघाताचा गुन्हा घे अशी जबरदस्ती केली नसती किंवा ड्रायव्हरचे अपहरण करून त्याला डांबून ठेवले नसते तर हे प्रकरणच गांभीर्याने पुढे आले नसते. मुंबईच्या वरळी येथे मिहीर शहा यांच्याकडून घडलेल्या हिट अँड रन प्रकरणात अपघात ग्रस्त वाहन पोलिसांच्या हाती लागले नसते तर या प्रकरणातील गांभीर्य पुढे आले नसते इतकेच काय मिहीर शहा यांच्या ऐवजी दुसऱ्याच कुणाच्या नावावर हा गुन्हा दाखल झाला असता. पण या दोन्ही प्रकरणात एक चूक झाली आणि अनेक गंभीर बाबी समोर आल्या. पुण्यातच ससून मध्ये घडलेले ड्रग माफिया ललित पाटील प्रकरणही एका सामान्य चुकीतून चव्हाट्यावर आलेले आहे.
हेही वाचा :
‘धर्मवीर – 2’ चा काळजाचा ठाव घेणारा ट्रेलर लॉन्च! सोहळ्याला शिंदे-फडणवीसांसह दिग्गजांची हजेरी
कोल्हापूर जिल्ह्यात पुढील तीन तासात मुसळधार पावसाचा इशारा
डोळ्यांमध्ये प्रचंड वेदना, अचानक दिसणे झाले बंद, प्रसिद्ध अभिनेत्रीबरोबर नेमकं काय घडलं?