कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीत झालेल्या चुका सुधारून आगामी(success) विधानसभेच्या निवडणुकींना सामोरे जाताना अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत भारतीय जनता पक्षाने रविवारी पुण्यात झालेल्या महामेळाव्यात दिले आहेत. त्याची झलक अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाने पाहायला आणि ऐकायला मिळाली. शरद पवार यांना भ्रष्टाचार यांचे सरदार, उद्धव ठाकरे हे औरंगजेब फॅन क्लबचे नेते अशा प्रकारच्या उपमा दिल्या गेल्याने विधानसभा निवडणुकीत कशा प्रकारचा प्रचार असेल हे सांगण्याची आता गरज नाही. भ्रष्टाचार, मुस्लिमांचे तुष्टीकरण, विशाळगड अतिक्रमण, हे भाजपचे निवडणुकीतील प्रचाराचे प्रमुख मुद्दे असतील. मतांचे ध्रुवीकरण घडवून आणण्याचा जोरकस प्रयत्न भाजपाकडून केला जाईल. लोकसभा निवडणुकीतील अपयश धुवून काढण्याच्या निर्धाराने भाजप आपल्या फौजा प्रचारात उतरवणार आहे.
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा जेव्हा(success) भ्रष्टाचारावर बोलतात, शरद पवार यांच्यावर निशाणा साधतात तेव्हा तेव्हा त्यांना अशोक चव्हाण, अजितदादा पवार यांची आठवण महाविकास आघाडी कडून केली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांना भ्रष्टाचार यांचे सरदार म्हटले तेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांनी भ्रष्टाचाराचे आरोप असलेले डॉक्टर डिझाईन तुमच्याच सोबत सत्तेत बसले आहेत असा पलटवार केला आहे.
पण हीच मंडळी दोन वर्षांपूर्वी त्यांच्याच सोबत म्हणजे शरद पवार यांच्या बरोबर होती हे त्या विसरलेल्या दिसतात. त्याचबरोबर भ्रष्टाचाराचा आरोप आपण ज्यांच्यावर करत होतो तीच मंडळी आज आपल्या सोबत आहेत याचा प्रतिवाद किंवा खुलासा भाजपकडून केला जात नाही हे सुद्धा वास्तव आहे. सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही अशी अवस्था भाजपच्या नेत्यांची झाली आहे. भाजप नेत्यांच्या या अवस्थेबद्दल संघाचे मुखपत्र असलेल्या द ऑर्गनायझर आणि साप्ताहिक विवेक मधून घरचा आहेर देण्यात आला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ठोकून काढण्याचे आदेश महामेळाव्यात कार्यकर्त्यांना भाजपच्या नेत्यांनी दिले आहेत. कार्यकर्त्यांना प्रचाराचे मुद्दे देण्यात आले आहेत. विशाळगड प्रकरण आणि मराठा आरक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यावर मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न भाजपाकडून या निवडणुकीत केला जाणार आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे महायुतीच्या रडारवर आलेले दिसतील.
महाविकास आघाडी कडून या निवडणुकीत संविधान बचाव हा मुद्दा फारसा घेतला जाणार नाही. पण महाराष्ट्रावरील कर्जाचा बोजा, लाडकी बहीण, लाडका भाऊ, पैशाची लूट, विशाळगड प्रकरण, महाराष्ट्रातील उद्योगांचे गुजरातकडे होत असलेले स्थलांतरण, महाराष्ट्राचे अर्थकारण किंवा अर्थव्यवस्था पहिल्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर जाणे, शेतकऱ्यांचे प्रश्न, परीक्षा घोटाळे असे अनेक मुद्दे महाविकास आघाडी कडून या निवडणुकीत प्रचारात आणले जातील.
लोकसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवाने महायुतीचे नेते आजही भेदरलेले आहेत या मानसिकतेत महाविकास आघाडीचे काही नेते आहेत. याचा अर्थ हे नेते अजूनही मोठ्या यशाच्या आनंदातून बाहेर पडलेले नाहीत. यशाच्या गुंगीतून ते अद्याप बाहेर आलेले नाहीत. लोकसभा निवडणुकीत जे घडले तेच विधानसभा निवडणुकीतही घडेल हे त्यांचे गृहीतक त्यांना अडचणीत आणू शकते. शरद पवार यांच्यासारख्या नेता सुद्धा लोकसभा निवडणूक निकालातून अजून बाहेर पडलेला नाही.
लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक यात फरक असतो. विषय वेगळे असतात, प्रश्न आणि मुद्दे वेगळे असतात याचे भान प्रत्येक राजकारण्याला असते. अपयशाचा, पराभवाचा डाग धुऊन काढण्यासाठी भारतीय जनता पक्ष तथा महायुती अतिशय आक्रमकपणे विधानसभेच्या आखाड्यात उतरणार आहे आणि हे आक्रमकतेचे आक्रमण रोखून धरण्यासाठी महाविकास आघाडीला तेवढीच आक्रमकता दाखवावी लागणार आहे.
हेही वाचा :
मनोज जरांगेंची प्रकृती खालावली; उपोषणाचा आज तिसरा दिवस
अखेर कोल्हापूरला पुराने वेढलं! तब्बल ७८ बंधारे पाण्याखाली; ‘पंचगंगेने’ इशारा पातळी ओलांडली
‘महिन्यातून 2 ते 3 वेळा तरी मी बॉयफ्रेंडसोबत…’, Janhvi Kapoor चा धक्कादायक खुलासा