कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : हवामान विषयक तज्ञ असलेल्या राष्ट्रीय आणि काही आंतरराष्ट्रीय(plans) संस्थांनी एप्रिल महिन्यात व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे भारतात विशेषता महाराष्ट्रात आणि त्यातही मध्य महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो आहे आणि झाला आहे. परिणामी कुठे साधारण पूर तर कुठे असाधारण पूर आल्याने जनजीवन विस्कळीत नव्हे तर जवळपास ठप्प झाले आहे. कर्नाटकच्या विजापूर जिल्ह्यातील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला गेला नसता तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात अति धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असती. अस्मानी संकट गडद होण्यास सुलतानी कारभारही तितकाच जबाबदार आहे. आजपर्यंत नद्यांमध्ये साचलेला गाळ काढला गेलेला नाही, ओढे आणि नाल्यांची काटेकोरपणे सफाई झालेली नाही, प्लास्टिकचा अतिरेकी वापर याचा एकत्रित परिणाम म्हणजे गंभीर पातळीवर पोहोचलेले जल संकट होय.
महाराष्ट्रातील बहुतांशी नद्यांमध्ये गाळ साचल्याने त्या उथळ झाल्या(plans) आहेत. अतिवृष्टी झाली किंवा ढगफुटी झाली की नद्यांचे पाणी लगेच पत्रा बाहेर पडते. उदाहरण द्यायचे झाले तर मुंबईच्या मिठी नदीचे देता येईल. या नदीच्या पात्रामध्येच बांधकामी झाली होती. नदीचे पात्र संकुचित, अरुंद झाले होते. या नदीला अतिक्रमणांनी मिठीतच घेतले होते. दिनांक 26 जुलै 2005 मध्ये झालेल्या कोसळ धारेने मुंबईवर आलेल्या जल संकटाने मुंबईकर भयचकीत झाले होते. या मिठी नदी मधील अतिक्रमणे, साचलेला गाळ काढून टाकल्यावर या नदीने मोकळा श्वास घेतला. त्यानंतर जल संकटाची तीव्रता सुद्धा कमी झाली.
महाराष्ट्रावर विशेषतः मध्य महाराष्ट्रावर सध्या जे जलसंकट ओढवले आहे, त्याचा शोध घेताना कोल्हापूर शहराचे उदाहरण प्राथमिक स्वरूपात देता येईल. 1989 च्या ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ढगफुटी पाऊस झाल्याने कोल्हापुरात आणि आसपासच्या परिसरात महापुराने विक्राळ रूप धारण केले होते. त्यानंतर महा पालिका प्रशासनाने पूर रेषा निश्चित केली होती. पूररेषेच्या आतील भागास रेड झोन म्हणून घोषित करण्यात आले होते. या रेड झोनमध्ये बांधकाम करण्यास प्रतिबंध करण्यात आला होता. पण त्या आधीच जयंती नाल्याच्या पात्रात काही बांधकामे झाली होती.
रेड झोन घोषित करण्याच्या आधी ओढ्यापासून साठ फुटाच्या आत अंतरात कोणत्याही प्रकारची बांधकामे करावयाची नाहीत असा नियम होता पण हे नियम धाब्यावर बसून बांधकामे झाली आणि त्यांना महापालिका प्रशासनाने परवानगी सुद्धा दिली होती. पण त्यानंतर किमान रेड झोन मध्ये बांधकामे होता कामा नयेत याची दक्षता घेणे आवश्यक होते. पण काही वर्षांपूर्वी आयुक्त म्हणून आलेल्या विजयालक्ष्मी बिदरी यांनी नियम शिथिल करून आणि काही अटी घालून रेड झोन मध्ये बांधकामांना परवानगी दिली. नागाळा पार्क परिसरात ओढ्याच्या काठावर, ओढ्याचे पात्र अरुंद करून मोठ्या प्रमाणावर निवासी संकुले आणि व्यापारी संकुले झाली. या ठिकाणी पंचगंगा नदीचे पात्र सुद्धा अगदी जवळ आहे. त्यामुळे 2019 आणि 2021 मध्ये आलेल्या जल संकटाने तिथल्या रहिवाशांना मोठा फटका बसला होता. याच परिसरात असलेल्या जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिल्या माळ्यापर्यंत महापुराचे पाणी घुसले होते.
जयंती नाल्याने कोल्हापूर शहराचे दोन भाग पडले आहेत. शहराच्या मध्यभागातून हा ओढा वाहतो आणि याच ओढ्याच्या काठावर बांधकामे झाली आहेत. कृष्णा नदीला पूर आला कि, पंचगंगा नदीच्या पाण्याची फुग वाढते. आणि मग जयंती नाल्याचे पाणी पंचगंगा नदी आपल्या पोटात घेत नाही. परिणामी जयंती नाल्याच्या महापुराचे पाणी नागरी वस्तीमध्ये शिरते. अनेकदा स्टेशन रोड महापुराच्या पाण्याने वेढला गेल्यामुळे काही दिवस हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला
गेला आहे.
2019 आणि 2021 मध्ये कोल्हापूर शहराचा अर्धा भाग महापुराच्या पाण्याने वेढलेला होता. यंदाही अशाच प्रकारचे जलसंकट येण्याची शक्यता अजूनही नाकारता येत नाही. कारण पंचगंगा नदीची पाण्याची पातळी वाढू लागली आहे. धोक्याची पातळी तर तिने दोन दिवसापूर्वीच ओलांडली आहे.
महाराष्ट्रातील अनेक महानगरांमध्ये कोल्हापूर शहरासारखीच परिस्थिती आहे. महानगरातील प्रशासनाने बांधकामांना परवानगी देताना, कोणत्याही प्रकारची खबरदारी घेतलेली नाही, बांधकाम नियमावली कडे दुर्लक्ष केलेले आहे म्हणूनच आज जल संकट ओढवलेले आहे.
गेल्या वर्षी हवामान विषयक अभ्यासक संस्थांनी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला होता तथापि तो काही प्रमाणात फसला. त्यामुळे गेल्या वर्षी कोल्हापूर सह महाराष्ट्रातील धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नव्हती. परिणामी यंदा मार्च महिन्यातच अनेक जिल्ह्यांना पाणी टंचाई भासू लागली होती. शेकडो गावांना टँकरच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला गेला. कोल्हापूर सह अनेक महानगरात पिण्याच्या पाण्यात कपात केली होती.
कोल्हापुरात एक दिवस आड पाणीपुरवठा केला गेला होता. जलसमृद्ध असलेल्या कोल्हापूरला प्रथमच पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागले होते. सुदैवाने यंदा पावसाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत बहुतांशी धरणे ही भरत आलेली आहेत. मुंबई शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी सातही धरणे जवळपास भरलेली किंवा भरत आलेली आहेत. तथापि आजही मुंबई महापालिकेने दहा टक्के पाणी कपात केलेली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे सुद्धा धरण क्षेत्र परिसरात अतिवृष्टी झाल्याने भरत आलेली आहेत. काही धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत आहे.
राज्य शासनाने अर्थात जलसिंचन विभागाने महाराष्ट्रातील नद्यांमध्ये साचलेला गाळ काढण्यासाठी प्राधान्य दिले पाहिजे. नद्यांची खोली वाढवली पाहिजे. डोंगरांची धूप थांबवली पाहिजे. अशा काही उपाययोजना केल्या तरच भविष्यात महापराचे संकट किमान पातळीवर सौम्य होऊ शकते.
हेही वाचा :
आरारारा… खतरनाक! ‘या’ पेनी स्टॉकने पाडलाय पैशांचा पाऊस
‘लाडकी बहीण’ अडचणीत; सरकारच्या तिजोरीवर येणार ४६००० कोटींचा बोजा
शिवसेना ठाकरे गटाची ताकद वाढणार; ठाकरे गटाच्या ‘या’ दिग्गज नेत्याची पुन्हा घरवापसी