त्र्यंबकेश्वर मंदिरातील विशेष दर्शन व्यवस्था श्रावणात बंद

श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेऊन देवस्थानच्यावतीने (VIP)एक ऑगस्ट ते १० सप्टेंबर या कालावधीत राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व प्रकारची विशेष (व्हीआयपी) दर्शन व्यवस्था बंद करण्यात आली आहे.

श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वरमध्ये भाविकांची संख्या नेहमीपेक्षा कित्येक पटीने वाढते. दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागतात. या काळात त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी पहाटे पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुले राहणार असून, श्रावणातील सोमवारी पहाटे चार वाजता म्हणजे एक तास अगोदर मंदिर खुले केले जाणार आहे.

दर्शनासाठी ताटकळणारे भाविक आणि मंदिरातील सुरक्षारक्षकांमध्ये काही वेळा वाद होतात. सुरक्षारक्षकांनी भाविकांना मारहाण केल्याच्या तक्रारीही झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार देवस्थानने श्रावण महिन्यात शासन, जिल्हा प्रशासनाकडून पत्रव्यवहार होणाऱ्या राजशिष्टाचाराशी संबंधित व्यक्ती वगळता अन्य सर्व विशेष (व्हीआयपी) दर्शन १० सप्टेंबरपर्यंत बंद केले आहे.

भाविकांनी गर्दी आणि वाद टाळण्यासाठी मंदिराच्या वेळापत्रकानुसार दर्शनाची योजना करावी आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन देवस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.

हेही वाचा :

कोल्हापूरवर पुन्हा पुराचे सावट: चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज

मराठा व ओबीसी आरक्षण: “तुमचा पक्ष गुंडाळा” आंबेडकरांचे पवार-ठाकरे यांना खडे बोल

“जातीवरून देशविभाजनाचा काँग्रेसचा प्रयत्न” – किरेन रिजीजू यांची घणाघाती टीका