केशवराव भोसले नाट्यगृह संशयाची आग धुमसतेय!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : बरोबर 110 वर्षांपूर्वी रसिकांच्या सेवेत दाखल झालेले, रंगभूमीला(theater) समर्पित केलेले पूर्वाश्रमीचे पॅलेस थिएटर आणि विद्यमान संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह हे गेल्या गुरुवारी अग्नी स्वाहा झाले. राजर्षी शाहू महाराजांचे हे जिवंत स्मारक होते. भरजरी घटनांचे, स्वप्नांचे ते मुक साक्षीदार होते. या मुख साक्षीदाराच्या आकस्मिक मृत्यूने कोणीही हळहळला नाही असा माणूस, रसिक आणि कलाकार महाराष्ट्रात शोधून सापडणार नाही. आणि म्हणूनच एका नाट्यगृहाच्या मृत्यूबद्दल सार्वत्रिक पातळीवर संशय व्यक्त केला जातो आहे. कोल्हापूर शहरात किंवा महाराष्ट्रात अनेक इमारती आणि घरांना यापूर्वी आगी लागल्या आहेत. पण त्याबद्दल अशा प्रकारचा संशय घेतला गेलेला नाही. खासदार शाहू छत्रपती हे सुद्धा या आगीची सीबीआय कडून चौकशीची मागणी करतात याचा अर्थ संशयाची आग कुठेतरी धुमसते आहे.

केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग कुस्ती या दोन्ही शाहूकालीन(theater) वास्तूंच्या दुरुस्तीसाठी, नूतनीकरणासाठी शासनाने काही वर्षांपूर्वीच सात कोटी रुपयांचा निधी दिला होता पण रसिक आणि कुस्ती शौकीन हे झालेल्या कामाबद्दल समाधानी नव्हते. गेल्या वर्षी कुस्ती मैदानाची एका बाजूची दगडी भिंत कोसळून एक निष्पाप महिला मृत्युमुखी पडली. त्यामुळे मैदानाच्या मजबुतीकरणाबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्या घटनेची साधी चौकशी केली नाही किंवा संबंधित कंत्राटदाराला त्याचा जाबही विचारला नाही.

मैदानाची भिंत कोसळण्याची घटना अगदी ताजी असतानाच नाट्यगृह जळून खाक झाले. दोन्ही वास्तूवर झालेल्या खर्चाचा काही समाजसेविक संघटनांनी हिशोब मागितला होता पण तो दिला गेला नाही. नाट्य संस्थांनीही नाट्यगृहाच्या नूतनीकरणाबद्दल समाधान व्यक्त केले नव्हते. वातानुकूलित यंत्रणेच्या दर्जाबद्दल शंका उपस्थित केल्या गेल्या होत्या. आता त्याचा आणि आगीचा संबंध लावला जातो आहे. आता या अग्निकांडाची प्रशासकीय पातळीवर चौकशी सुरू आहे आणि प्राथमिक अहवाल येत्या एक-दोन दिवसात अपेक्षित आहे.

पोलीस, महापालिका, अग्निशामक दल, आणि विमा कंपनी यांच्याकडून ही आग कशी लागली याची चौकशी किंवा त्याचा तपास सुरू आहे. महावितरण कंपनीने नाट्यगृहाला लागलेली आग ही शॉर्टसर्किटमुळे लागलेली नाही असा अभिप्राय दिलेला आहे. त्यामुळेच या आगी विषयी संशय व्यक्त केला जातो आहे. न्याय वैज्ञानिक तज्ञांकडूनही या आगीची चौकशी सुरू आहे, तपास सुरू आहे.

या तज्ज्ञांच्या एका टीमने घटनास्थळी येऊन राखेचे, तसेच जाळीत झालेल्या इतर वस्तूंचे नमुने घेतले आहेत. पण अशा प्रकारच्या वैज्ञानिक तपासणीतून काही निष्पन्न होते असे नाही. मंत्रालयास लागलेल्या आगीची चौकशी अशाच पद्धतीने करण्यात आली होती पण त्यातून काही हाती लागले नाही. मंत्रालयास लागलेल्या आगीनंतर शासकीय आणि निमशासकीय तसेच सार्वजनिक उपयोग यांच्या वास्तूंचे फायर ऑडिट होण्याचे आदेश राज्य शासनाने दिले. त्यामुळे फायर ऑडिट करून घेणे हे सक्तीचे आणि अनिवार्य ठरविण्यात आले आहे.

केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीची अतिशय गांभीर्याने राज्य शासनाने दखल घेतली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ तसेच अन्य काही मंत्री यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. असे पूर्वी कधी घडले नव्हते. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या आगीची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

विद्यमान खासदार शाहू छत्रपती यांनी केंद्रीय तपास यंत्रणांकडून(theater) अर्थात सीबीआयकडून या अग्निकांडाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनीही काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत. म्हणूनच संशयाची आग धुमसत आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाची वास्तु आहे तशी बांधण्याचा सर्वांचा आग्रह आहे. या ऐतिहासिक वास्तूचे नकाशे किंवा डिझाईन कदाचित भूमी अभिलेख कार्यालयात असू शकतील. किंवा ज्यांनी ही वास्तू बांधली ते कंत्राटदार श्रीयुत पंडित यांच्या वारसांकडे सुद्धा ऐतिहासिक दस्तावेज म्हणून 110 वर्षांपूर्वीचे नकाशे किंवा डिझाईन असू शकतात.

नाट्यगृह उभा करण्यासाठी निधीची कमतरता नाही. राज्य शासनाने 20 कोटी रुपये मंजूर केले आहेत. विमा कंपनीकडून किमान सात कोटी रुपये उपलब्ध होतील आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मानधनातून पाच कोटी रुपये उपलब्ध होणार आहेत. म्हणजे पैशाची कमतरता नाही. हे बांधकाम करण्यासाठी एखाद्या त्रयस्थ संस्थेची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती केली जावी. कोल्हापुरातील वास्तुशास्त्रज्ञांच्या सहकार्याने हे नाट्यगृह याच्या वर्षाभरात पुन्हा रसिकांच्या सेवेला येईल अशी अपेक्षा आहे.

केशवराव भोसले नाट्यगृह आणि शाहू खासबाग कुस्ती मैदान यांच्या नूतनीकरणावर झालेल्या खर्चाबद्दल काहीजण शंका व्यक्त करत आहेत आणि म्हणूनच माजी खासदार युवराज संभाजी राजे छत्रपती यांनी नाट्यगृह बांधकामात टक्केवारीचा वास आला तर मी कुणालाही सोडणार नाही असा इशारा दिला आहे. एकूणच खासदार शाहू महाराज यांच्यासह काहीजण या आगीबद्दल संशय व्यक्त करताना दिसतात. असा संशय का घेतला जावा याचे संबंधित यंत्रणेने आत्मचिंतन केले पाहिजे.

हेही वाचा :

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर न्यायालयीन लढाई: सुनावणी पुढे ढकलली

विनेश फोगटच्या रौप्यपदकाच्या प्रतीक्षेत आणखी वाढ; क्रीडा लवादाचा निर्णय १६ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

आदित्य ठाकरे यांचा शिंदे सरकारवर हल्लाबोल: “हे सरकार महाराष्ट्रातून नव्हे, तर गुजरातमधून चालवलं जातं