कोल्हापुरात समरजित घाटगेंनी वात पेटवली…

लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाविकास आघाडीने(Kolhapur) धोबीपछाड दिल्यानंतर महायुतीने खडबडून जागे होताना विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. महायुतीने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराचे रणशिंग फुंकले असले तरी जागा वाटपावरून मात्र ठिणगी पडायला सुरुवात झाली आहे.

कोल्हापूरमध्ये(Kolhapur) कागल विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर तत्काळ भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी भाजपला रामराम करत थेट तुतारी फुंकण्याचा निर्णय घेतला आहे.

येत्या 3 सप्टेंबर रोजी समरजितसिंह घाटगे भाजपला रामराम राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत. शरद पवार यांच्या उपस्थितीत कागलच्या गैबी चौकात त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. दरम्यान, घाटगे यांनी तातडीने निर्णय घेत महायुतीमधील जागावाटपावरून होणऱ्या वादाचीच झलक दिली आहे.

घाटगे यांनी कोल्हापुरातून वात पेटवून दिल्यानंतर आता राज्यातील किती मतदारसंघांमध्ये महायुतीला नाराजीला तोंड द्यावे लागणार किंवा विधानसभेला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर बंडखोरीला सामोरे जावं लागणार याची चर्चा सुरू झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटातील विद्यमान आमदारांना उमेदवारी कायम राहिल्यास त्याठिकाणी भाजप नेते कोणती भूमिका घेणार किंवा बंडखोरी करणार की त्यांची नाराजी दूर केली जाणार याकडे लक्ष असेल.

आजघडीला 19 विधानसभा मतदारसंघांमध्ये महायुतीमधील भाजप आणि अजित पवार गटातील आमदार आमने-सामने आहेत. काही ठिकाणी आतापासून उभे दावे सुद्धा करण्यात येत आहेत. एकमेकांचा प्रचार न करण्यापासून ते असभ्य भाषेमध्ये टीका करण्याचा सुद्धा उद्योग सुरू झाला आहे. त्यामुळे हा वाद कसा शमावला जाणार याकडे सुद्धा लक्ष असेल. अजित पवारांच्या 19 विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याचा निर्णय अंतिम झाल्यास पुणे जिल्ह्यातील आमदारांसह नगर, लातूर, कोल्हापूर, सातारा आधी जिल्ह्यात वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे आहेत.

वडगाव शेरी, मावळ, इंदापूर, पुसद, अकोले, अमळनेर, अहेरी, उदगीर, तुमसर, अर्जुनी मोरगाव, कोपरगाव, माजलगाव, अहमदपूर, आष्टी, वाई, कागल या विधानसभा अजित पवार गटाला गेल्यास भाजपच्या नेत्यांची अडचणी होणार आहेत. पुण्यात जगदीश मुळीक, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, हर्षवर्धन पाटील नेमका कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांनी थेटपणे अजित पवारांच्या आमदाराचा प्रचार न करण्याची भूमिका घेतली आहे.

हर्षवर्धन पाटील सुद्धा दुसरीकडे नाराज असल्याची चर्चा रंगली आहे. हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी मिळणे दुरापास्त होत असल्याने ते शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याची राजकीय वर्तुळामध्ये रंगली आहे. सुप्रिया सुळे यांनी याबाबत स्वतःच वक्तव्य हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेणार का याकडे सुद्धा लक्ष असेल. दुसरीकडे, वडगाव शेरीतून भाजप नेते जगदीश मुळीक आमदार सुनील शिंत्रे यांना उमेदवारी कायम राहिल्यास कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष असेल. कोल्हापुरात चंदगडमधून अजित पवार गटाचे विद्यमान आमदार राजेश पाटील यांना उमेदवारी राहिल्यास भाजपचे शिवाजीराव पाटील काय करणार? अस प्रश्न उपस्थित झाला आहे.

दुसरीकडे, विधानसभेला महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये थेट सामना असला तरी मनसेनं स्वबळाचा नारा देत उमेदवार घोषित करण्यास सुरुवात केली आहे. राज यांनी आतापर्यंत सात उमेदवार जाहीर केले आहेत. राज्यातील छोटे मोठे पक्ष सुद्धा एकत्र येत तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. यामध्ये स्वाभिमानीचे राजू शेट्टी, प्रहारचे बच्चू कडू एकत्र येत तिसरा पर्याय देण्याचा विचार करत आहेत.

महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये (Kolhapur)जर जागावाटपावरून ठिणगी पडल्यास आणि तिसरा सक्षम पर्याय उभा राहिला तर राज्यात चौरंगी लढत होणार आहे. याचा फटका कोणाला बसणार याचे उत्तर निवडणुकीनंतरच मिळणार आहे. सद्यस्थितीमध्ये महायुतीने एकसंधपणे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रचाराचं रणशिंग फुंकलं असलं तरी जागावाटपावरून घमासान होण्याची चिन्हे आहेत.

लोकसभा निवडणुकीमध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे गटाला भाजपकडून सातत्याने सर्वेचा संदर्भ देत अधिकाधिक जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे दोन्ही गटामध्ये चांगलीच नाराजी पसरली होती. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचा दबाव स्वीकारायचा नाही, अशी भूमिका दोन्ही पक्षांनी घेतली आहे.

हेही वाचा:

सरकारने 150 पेक्षा अधिक औषधांवर घातली बंदी

नोकरीची मोठी संधी, टाटा मेमोरियल सेंटरमध्ये ‘या’ पदासाठी निघालीये भरती

अरबाज खानचा मुलगा अरहान आणि सावत्र आईचा ‘तो’ VIDEO VIRAL!