पुन्हा, पुन्हा तोच आग्रह आधी “चेहरा” जाहीर करा!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : एकदा तुझा चेहरा, आरशात बघ! तुझ्या चेहऱ्यावरची(face) माशी सुद्धा हलत नाही, तुझा चेहरा पनवती आहे असं चेहऱ्याबद्दल नेहमी बोलायला जातं. समाजात चेहरा असलेली माणसं असतात, कारण त्यांना समाज ओळखत असतो. काही माणसे बिल चेहऱ्याची असतात. कारण त्यांना समाज ओळखत नाही. काहींचा चेहरा मनातून जाता जात नाही, ते मनावर कोरलेले असतात.

गर्दीला चेहरा (face)नसतो पण गर्दीतला प्रत्येक माणूस वेगळा असतो, तो आपला चेहरा घेऊनच गर्दीत असतो. गर्दीचा एक भाग बनूनही तो स्वतंत्र असतो. एकूणच चेहरा हा महत्त्वाचा आहे. तो कोणाचा आहे हे त्याहून महत्त्वाचे आहे. तो कोणत्या पदावर आहे, कोणत्या पदासाठी त्याचा विचार केला जातो किंवा विचार केला जाणार आहे यावर बरंच काही अवलंबून असतं. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून “मुख्यमंत्री पदाचा चेहरा” या विषयावर प्रामुख्याने महाविकास आघाडीत चर्चा सुरू आहे.

विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना सर्वसामान्य मतदारांच्या समोर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठेवला पाहिजे. म्हणून मग महाविकास आघाडीने आधी चेहरा जाहीर करावा अशी ठाकरे गटाच्या संजय राऊत यांनी सर्वप्रथम मागणी केली होती. तेव्हा आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार यांनी महाविकास आघाडी हाच मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आहे असा खुलासा करून संजय राऊत यांचा” चेहरा “पाडला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करा, ज्याचा चेहरा जाहीर केला जाईल त्याला आमचे समर्थन असेल असे आवाहन केले होते. त्यानंतर काँग्रेसचे नाना पटोले यांनी ज्यांचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असे स्पष्ट शब्दात सांगितले होते.

आता ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनीही विधानसभा निवडणुकीच्या आधी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करावा, त्याचा विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना फायदा होईल असे सुचवले आहे. एकूणच मुख्यमंत्री पदाचा चेहरा आधी जाहीर करण्यात यावा किमान तो चार भिंतीच्या आत ठरवण्यात यावा अशी मागणी ठाकरे गटाकडून वारंवार केली जात आहे.

‌ काही दिवसांपूर्वी काही संस्थांनी विधानसभेच्या निवडणुकीत “मतदारांचा कौल(face) कोणाकडे आहे” याची पक्षनिहाय आकडेवारी जाहीर केली होती. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळतील असा हा कौल आहे.
आता राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी, नाना पटोले यांनी एका सर्वेक्षणाचा हवाला देऊन विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा राष्ट्रीय काँग्रेसला मिळतील.

ठाकरे गटाच्या शिवसेनेला 35 चा आकडा गाठता येणार नाही असे म्हटले आहे. म्हणजे त्यांच्याच म्हणण्यानुसार सर्वात जास्त जागा मिळवणाऱ्या पक्षाकडे मुख्यमंत्रीपद जाईल, याचा अर्थ ते काँग्रेसकडे जाईल असा होतो. नाना पटोले यांनी अप्रत्यक्षरीत्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर काँग्रेसचा दावा सांगितलेला आहे. ठाकरे गटाला मुख्यमंत्रीपद मिळणार नाही असे त्यांनी सुचित केलेले आहे.

ज्याचे आमदार जास्त त्याचा मुख्यमंत्री असे काही महाविकास आघाडी अंतर्गत ठरलेले नाही. आमदारांची संख्या कमी असलेल्या पक्षाकडे सुद्धा मुख्यमंत्री पद जाऊ शकते असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट करून ठाकरे गटाच्या आशा ,आकांक्षांना बळ दिले आहे.

निवडणुकीच्या निमित्ताने मतदारांच्या समोर जाताना निवडणुकीनंतर आमचा नेता कोण असेल हे आधीच सांगणे
योग्य ठरते. म्हणून बहुतेक राजकीय पक्ष निवडणुकीच्या आधी आमचा नेता कोण असेल याचा चेहरा मतदारांच्या समोर ठेवतात. अशा चेहऱ्यांचा प्रभाव मतदारांच्या वर पडत असतो. त्याचा राजकीय पक्षांना लाभही होत असतो. महाराष्ट्राच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मात्र महाविकास आघाडीने आणि महायुतीने मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल हे जाहीर केलेले नाही. याचा अर्थ निवडणुकीच्या निकालानंतरच मुख्यमंत्री कोण असेल हे महाराष्ट्राला समजणार आहे.

हेही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याला आंदोलनाचे ग्रहण

इचलकरंजीत खाकी वर्दीतील हफ्तेखोरी: पोलीस प्रशासन काय कारवाई करणार?

‘लाडक्या बहिणीं’ना 1500 तर ‘लाडक्या लेकीं’ना 101000; ‘लेक लाडकी’ योजना आहे तरी काय?