शरद पवारांचा हल्लाबोल: “शिवरायांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही”

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार(political) यांनी कागलमध्ये आयोजित सभेत केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढविला. त्यांनी खास करून मालवणातील शिवरायांच्या पुतळ्याच्या भ्रष्टाचारावर कठोर शब्दांत टीका केली.

शरद पवार म्हणाले, “साठ वर्षांपूर्वी यशवंतराव चव्हाण यांनी गेटवे ऑफ इंडियासमोर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारला, जो आजपर्यंत अबाधित आहे. परंतु, काही महिन्यांपूर्वी मालवणात पंतप्रधानांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळल्याचे दिसले आहे. याचे कारण म्हणजे या पुतळ्याच्या निर्मितीत झालेला भ्रष्टाचार आहे. अशा बेशरमपणाची भूमिका घेणाऱ्यांच्या हातात महाराष्ट्र द्यायचा नाही. यांचा निकाल आपल्याला लावावा लागेल.”

शरद पवारांनी पुढे सांगितले की, “महाराजांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार करणाऱ्यांना जनता धडा शिकवेल. महाराष्ट्राच्या हिताची जपणूक करणारे, स्वच्छ आणि चारित्र्यसंपन्न नेतृत्व निर्माण करण्याची वेळ आली आहे.”

“सत्ता बदलल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”

शरद पवार यांनी राज्यातील सत्ताबदलाची गरज स्पष्ट करताना सांगितले, “महाराष्ट्र प्रगत आणि यशस्वी करायचा आहे. त्यासाठी तुम्ही आणि आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करू. कागलमधील एका व्यक्तीला सर्व काही दिले, परंतु संकटात साथ सोडली. कागलचे लोक लाचारी स्वीकारणार नाहीत आणि ज्यांनी ती स्वीकारली, त्यांना धडा शिकवतील.”

समरजितसिंह घाटगे राष्ट्रवादीत दाखल

याच सभेत भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. या प्रवेशाने कोल्हापूरातील राजकारणात नवीन समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे.

शरद पवारांनी यावेळी कागलच्या इतिहासाचा उल्लेख करत अजित पवार गटात गेलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर नाव न घेता टीका केली आणि कागलच्या जनतेला त्यांच्या लाचारीचा निषेध करण्याचे आवाहन केले.

यावेळी पवारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांवर कडाडून टीका करत जनता योग्य तो निर्णय घेईल, असा विश्वास व्यक्त केला.

हेही वाचा:

“भगवान शिवालाही करावा लागला 21 दिवसांचा उपवास: श्रीगणेशाच्या उपासनेची अद्भुत कथा”

“शेतकऱ्यांचे दु:ख समजून घ्या, ‘इव्हेंट’नुसार काम करू नका”, ठाकरे गटाची सत्ताधाऱ्यांवर टीका

सततच्या पावसाने भाजीपाला महाग; चाकवत, पोकळा, तांदळी बाजारातून गायब