हे गणराया, त्यांना सुबुद्धी दे!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : हे गणपती बाप्पा, तो विघ्नहर्ता, तू सुखकर्ता, तू दुःखहर्ता, तू बुद्धी देवता, इथल्या समस्त नेत्यांना, राजकारण्यांना(political articles), राज्यकर्त्यांना विकासावर आधारित राजकारण, सत्ता कारण करण्याची सुबुद्धी दे! सर्वसामान्य जनतेचे जगण्याची लढाई अधिकाधिक टोकदार होत असतानाही, बाप्पा तुझ्या स्वागतासाठी तो खर्च करायला मागेपुढे पाहत नाही. त्या सामान्य माणसाच्या पाठीमागे तू उभा रहा! समस्त माता, भगिनी, तरुणी, अल्पवयीन मुली यांच्यासाठी भयमुक्त वातावरण निर्माण कर! खुंटीला टांगून ठेवलेली भाषा सभ्यता परत जिभेवर आणून ठेव! बळीराजाला सुगीचे दिवस दाखव! त्याच्या मनातला जगण्यापासून दूर नेणारा पलायनवाद थांबव! ही प्रार्थना समज, तुझी आरती समज!

कालपरवा मराठवाड्यातील कुठल्याशा मांडकी नावाच्या गावातला शेतकरी पावसाने आडव्या झोपवलेल्या पिकात उभा राहून काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश करत होता. तेव्हा राजकारणी(political articles) मंडळी त्यांच्या राजकारणात व्यस्त होती. तर काहीजण अडचणीत असलेल्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पुन्हा त्याचे राजकीय भांडवलच करताना दिसले. आम्ही शेतकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून सत्ता राबवणार आहोत, सत्ता राबवत आहोत असे सांगणारे राज्यकर्ते महाराष्ट्राच्या स्थापनेपासून इथल्या जनतेने पाहिले आहेत. पण शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्याऐवजी ते बिकट होत आहेत, ते जटिल होत आहेत, हे असे काम होतंय याचे आत्मचिंतन करण्याची राज्यकर्त्यांना बुद्धी देण्याची हे गणराया कृपा कर! मांडकी गावच्या त्या शेतकऱ्याचा आक्रोश राज्यकर्त्यांच्या कानापर्यंत नेण्याची कृपा कर!

देशामध्ये महाराष्ट्र हे राज्य क्रमांक एक वर किंवा क्रमांक दोन वर असल्याचे ढोल वाजवले जातात. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात आजही असे काही ग्रामीण भाग आहेत की तेथे चालवण्यासाठी धड रस्ते नाहीत, वाहतुकीची कोणतीही व्यवस्था नाही, अशा दुर्गम वाड्या वस्त्यांवरील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जीव धोक्यात घालून पाच पाच किलोमीटर पर्यंतची शाळेला जाण्यासाठी पायपीट करतात. महाराष्ट्रात असे एक गाव आहे की तेथील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल तीन तास लागतात. त्यांची शाळेपर्यंत पोहोचण्याची अशी ही वाट बिकट वाट तूच थांबव रे!

कोल्हापूर जिल्हा हा तर राजर्षी शाहूंचा जिल्हा. पण‌ या जिल्ह्यातही(political articles) काही दुर्गम गावी आहेत. तिथे आरोग्याच्या सुविधा नाहीत. रस्ते नाहीत. प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत रुग्णाला पोहोचण्यासाठी डोली चा वापर करावा लागतो. दोनच वर्षांपूर्वी गगनबावडा तालुक्यातील एका गावातील महिला रस्त्यातच प्रसूत झाली. बाळ आणि बाळंतीण दोघांनाही मृत्यूने गाठले. गाव तिथे दवाखाना अशी घोषणा करणाऱ्या राज्यकर्त्यांना, घोषणा कृतीत आणण्याची बुद्धी दे!

गडचिरोली जिल्ह्यातील घटना तर काळजाला घर पाडणारी आहे. घरात आजारी पडलेल्या दोन छोट्या मुलांना, त्यांच्यावर औषधोपचार करण्याऐवजी गावच्या भगताकडे घेऊन जाणारे आई-वडील अंधश्रद्धे च्या आहारी गेलेले म्हणावे लागतील. भगता कडे घेऊन गेलेल्या त्या दोन चिमुकल्या मुलांचा वाटेतच मृत्यू झाला. दोन्ही मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन हे आई-वडील पंधरा किलोमीटर चालत आपल्या गावी गेले. मुलांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था नव्हतीच. अंधश्रद्धेपासून सर्वांनाच दूर राहण्याची सुबुद्धी, हे गणराया तूच देऊ शकतोस.

ओडिसा राज्यातील कुणी एक मांझीराम. सरकारी दवाखान्यात त्याची पत्नी मरण पावली. तिचा मृतदेह गावाकडे नेण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते, म्हणून तो आपल्या पत्नीचा मृतदेह खांद्यावर ठेवून गावाकडे पायी चालत निघाला होता. त्याची कोणासही दया आली नाही आणि विशेष असे की त्याच दिवशी त्या राज्याचे मुख्यमंत्री रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन करत होते.

मराठवाडा, विदर्भात जेव्हा पाऊस हवा असतो तेव्हा तो पडत नाही, आणि जेव्हा तो नको असतो तेव्हा तो हमखास कोसळतो. शेतकऱ्याला झोपवतो. शेतकऱ्याला आत्महत्येच्या मार्गाकडे जायला लावतो. राज्यकर्ते, हे शेतकऱ्याला नुकसान भरपायी देतात, पण त्यातून लागवडीचा खर्च निघत नाही. हे अवेळी पावसाचे विघ्न हे विघ्नहर्त्या तूच दूर कर!
हे गणपती बाप्पा, तुला सर्व लेकरे सारखीच. पण कुणामुखी लोणी तर कुणामुखी अंधार हे असे का? सर्वांना सुखी ठेव बाप्पा! शनिवारी तुझे आगमन होते आहे, तुझ्या स्वागतामध्ये कोणीही कोणतीही कसूर ठेवलेली नाही, सर्वजण उत्साहात आहेत. त्या सर्वसामान्यांच्या जगण्यातला उत्साह असाच अखंड राहू दे बाप्पा! तूच करता आणि तूच करविता आहेस!

हेही वाचा:

आयफोन 16 ‘या’ देशात मिळणार सर्वात स्वस्त!

हॉर्नच्या आवाजावर लहान मुलांनी केला डान्स: Video Viral

“उद्धव ठाकरे जितके भोळे तितकेच लबाड, त्यांनी मला मुद्दाम..”, शिंदे गटाच्या नेत्याचा गौप्यस्फोट