कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरात प्रतिवर्षी नोव्हेंबर आणि जानेवारी महिन्यात किरणोत्सव होतो. त्यांना “दक्षिणायण” आणि “उत्तरायण” म्हणतात. सूर्याची मावळतीची उन्हे थेट मंदिराच्या खोलवर असलेल्या गाभाऱ्यात अंबाबाईच्या मूर्तीपर्यंत पोहोचतात. त्यास खगोलशास्त्रीय पार्श्वभूमी असते. तर पाच वर्षांनी येणाऱ्या लोकशाही उत्सवात दक्षिणायन आणि उत्तरायण गाजत असते. त्यास राजकीय पार्श्वभूमी असते. विधानसभेच्या निवडणुका आणखी दोन महिन्यांनी होणार असून आत्तापासूनच दक्षिणायन आणि उत्तरायण चर्चेच्या पटलावर आले आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडून इच्छुकानी त्यासाठी जाहिरातबाजीही सुरू केली आहे.
![](https://smartichi.com/wp-content/uploads/2024/08/image-29-1024x1024.png)
”दक्षिणायण”
विधानसभेच्या दक्षिण मतदार संघात 30 टक्के शहरी भाग येतो. कोल्हापूर महापालिकेचे 28 प्रभाग या दक्षिण भागात येतात. इथे सतेज पाटील गट विरुद्ध महादेवराव महाडिक गट अशी पारंपारिक लढत होते. कधी महाडिक गट तर कधी पाटील गट इथे जिंकत आला आहे, विजयी होता आला आहे. सध्या सतेज पाटील यांचे पुतणे ऋतुराज हे विधान सभेवर दक्षिणचे प्रतिनिधित्व करतात. या मतदारसंघात भाजपला उमेदवार मिळत नसे. कुणाच्यातरी गळ्यात उमेदवारीची माळ घातली जायची. उमेदवाराचे हमखास डिपॉझिट जप्त व्हायचे. पण गेल्या वीस वर्षात इथली राजकीय स्थिती बदलली आहे. कमळ फुलू शकते इथपर्यंत भाजपने मजल मारली आहे.
महाविकास आघाडी कडून काँग्रेसचे विद्यमान आमदार ऋतुराज पाटील यांचीच उमेदवारी असणार आहे. त्यांच्या विरोधात महायुतीकडून महाडिक कुटुंबातील अमल, शौमिका, कृष्णराज यापैकी कोणी एक असू शकतात. राजेश क्षीरसागर यांचे पुत्र पुष्कराज हे सुद्धा इच्छुक आहेत. “दक्षिण वर पुष्कराज”अशी जाहिरात बाजी क्षीरसागर यांच्याकडून सुरू आहे. पण त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता खूपच धुसर आहे.
प्रश्नांना “उत्तर” हवेच!
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात काही अपवाद वगळले तर शिवसेनेचाच “आवाज”आहे. दिलीप देसाई, सुरेश साळोखे, राजेश क्षीरसागर यांनी अविभाजित शिवसेनेचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले आहे. सध्या काँग्रेसच्या श्रीमती जयश्री जाधव ह्या इथल्या आमदार आहेत. त्यांचे पती चंद्रकांत जाधव यांनी या मतदारसंघातून अविभाजित शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र क्षीरसागर यांचा पराभव केला होता. महाविकास आघाडी कडून ठाकरे गट उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी आग्रही असला तरी सतेज पाटील ही जागा सोडणार नाहीत.
जयश्री जाधव यांनी काँग्रेस कमिटी कडून उमेदवारी मागणीचा अर्ज नेला आहे. त्यामुळे त्या पुन्हा या मतदारसंघातून इच्छुक असल्याचे स्पष्ट होते. सतीश पाटील हे त्यांच्या विश्वासू वर्तुळातील माजी नगरसेवक सारंगधर देशमुख यांना काँग्रेसची उमेदवारी मिळावी म्हणून प्रयत्नशील असल्याची सध्या चर्चा सुरू आहे. देशमुख यांच्याकडून वृत्तपत्रीय जाहिरात बाजी तसेच बॅनरबाजी सुरू आहे. या मतदारसंघातून भाजपच्या सत्यजित कदम यांनी 78 हजार मते घेतली आहेत.
त्यामुळे महायुतीमध्ये महत्त्वाचा घटक असलेल्या भाजपकडून उत्तरवर हक्क सांगितला जाईल. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजेश क्षीरसागर यांच्यासाठी ही जागा भाजपकडून काढून घेतील असे सध्या तरी वातावरण आहे. कोल्हापूर उत्तर या पूर्णपणे शहरी असलेल्या मतदारसंघाचे काही प्रश्न आहेत. कोल्हापूर शहराची हद्द वाढ ही विकासाशी निगडित जुनी मागणी आहे. याशिवाय मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ, अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, राजर्षी शाहूंचे राष्ट्रीय पातळीवरील स्मारक याशिवाय भाजी पेंढारकर यांचे स्मारक असलेल्या जयप्रभा स्टुडिओची झालेली विक्री रद्द करणे असे काही प्रश्न आहेत. आणि इच्छुकांनी त्याचे”उत्तर”आधी दिले पाहिजे.
राजेश क्षीरसागर यांच्या दोन्ही पुत्रांनी मराठी चित्रपट सृष्टीचा मानदंड असलेला जयप्रभा स्टुडिओ विकत घेतला आहे. कोरोनाच्या काळात झालेला हा व्यवहार नंतर उघड झाल्यानंतर कोल्हापूर शहरातून संतापाची लाट उसळली होती. जयप्रभा स्टुडिओ प्रकरण मला माहित नाही. माझ्या मुलांनी माझ्या परस्पर तो विकत घेतला आहे असा हास्यास्पद खुलासा राजेश क्षीरसागर यांनी तेव्हा केला होता. हा स्टुडिओ परत करण्याचा शब्दही त्यांनी दिला असला तरी हा स्टुडिओ विकत घेणाऱ्यापैकी एका सदस्याने हे प्रकरण न्यायालयात प्रलंबित ठेवले आहे. उत्तरच्या आखाड्यात उतरण्यापूर्वी राजेश क्षीरसागर यांनी जयप्रभा विषयी स्पष्ट खुलासा केला पाहिजे.
कोल्हापूर उत्तर हा मतदारसंघ ठाकरे गटाच्या शिवसेनेकडून काँग्रेसकडे गेला तर शिवसेनेचे उपनेते असलेल्या संजय पवार यांचा उमेदवारीचा पत्ता कट होणार आहे. ते सुद्धा या मतदारसंघातून ठाकरे गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, पण त्यांनी अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. कागल विधानसभा मतदारसंघातून महा विकास आघाडीचे समरजीत सिंह घाटगे यांच्यावर विजयाचा गुलाल उधळूनच मी मातोश्रीवर जाणार असल्याचे त्यांनी सांगितल्यामुळे, उत्तर विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेसकडे गेल्यात जमा असल्याचे स्पष्ट होते.
हेही वाचा:
‘या’ भागात 10 दिवस दारू बंदी!…तर असं केल्यास कारवाई होणार
गणेशोत्सवाला गालबोट! मंडळाचे बॅनर लावणाऱ्या दोघांना BMW कारने चिरडलं
कोल्हापुरात लेसरमुळे तरुणाच्या डोळ्यात रक्तस्त्राव, ड्युटीवरील पोलिस हवालदाराचा उजवा डोळा लाल होऊन सूजला